
सणासुदीचे दिवस घरात उत्साह व आनंद घेवून येत असतात. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये ह्या ना त्या कारणाने चैतन्य संचारलेले असते. कारण त्या दिवसांचे औचित्य साधून पुजाअर्चा करणे, घरात गोडधोड पदार्थांचा दर्वळ पसरणे, नवनविन वस्तू दागिने व कपड्यांची खरेदी करणे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचप्रमाणे विशेष मुहूर्त बघून संपत्ती खरेदी करणे किंवा घरात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन करणे अशा मनाला हर्षोल्हासित करणार्या प्रसंगांना आपण न्याय देत असतो. तेव्हा मंगल प्रसंग किंवा सणवार म्हंटले कि सर्वप्रथम घराची स्वच्छता व नुतनीकरण ही फार महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे ह्याच काळात घरात स्वच्छता मोहिमेसही सुरवात होते. कारण घरात स्वच्छता नसेल तर इतर कशालाही काहिही महत्व उरत नाही.
हा ऑनलाईन चा काळ आहे. तेव्हा सर्वकाही हाकेच्या अंतरावर आहे. आपण घरी बसून फोनच्या माध्यमातून संपर्क केल्यास पाहिजे ते उपलब्ध करून घेवू शकतो. पेस्ट्कंट्रोल तसेच डीप क्लिनींग करणार्या कंपनीही आहेत. त्यांना पाचारण केल्यानंतर काही तासात त्यांचे कर्मचारी येवून घराची समाधानकारक स्वच्छता देखील करून देतात. त्याचप्रमाणे त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि मेहनतही करावी लागत नाही. ह्या धावपळीच्या युगात घराच्या स्वच्छतेसंबंधीत थोडा जास्त खर्च करण्याची तयारी असल्यास हा एक आरामदायक मार्ग सहज उपलब्ध आहे. परंतू आपण जर दुसरा मार्ग अवलंबण्याची तयारी दाखविली तर थोडेफार कष्ट नक्की पडतात. परंतू आपल्या घराच्या कानाकोपर्यांची जेवढी समज आपल्याला असते त्याचप्रमाणे आपण त्या कामात जितक्या भावना ओततो ते कोणी अन्य करणे अशक्य आहे.
पुर्वी दिवाळीच्या निमीत्ताने घरात वार्षिक स्वच्छता करण्यात येत असे. तेव्हा घरे व घरातील जमीन मातीची असायची. त्यामुळे पावसाळा ओसरल्यावर घराची अवस्था तितकीसी चांगली नसायची. तेव्हा वर्षातून एकदा दिवाळसणाचे निमीत्त काढून घराची स्वच्छता करणे गरजेचे असायचे. ज्यात ठेवणीतील वस्तू, भांडी, अंथरूणे, ठेवणितील धान्याचा साठा ह्या सर्व गोष्टी स्वच्छ करून व कडक उन्हात वाळवून ठेवण्यात येत होत्या. तसेच खराब झालेल्या भिंतींना चुन्याच्या मिश्रणात रंग टाकून रंगविण्यात येत असे आणि जमिनीला शेणाने सारविण्यात येत असे. घराच्या सखोल स्वच्छते मागे कारणे काहिही असली तरी त्यामागे असलेले वैज्ञानिक कारणही महत्वाचे आहे. वातावरणातील ओलाव्यामुळे ठेवणीतील वस्तू तसेच धान्याचा साठा ह्यांना बुरशी लागण्याची व किड लागण्याची शक्यता असते. भिंतींनाही ओलसरपणा आल्याने त्यांच्यावरही कृमी किटकांचे साम्राज्य वाढते. त्याचा तेथे राहणार्या माणसांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. तेव्हा वार्षिक स्वच्छतेमुळे घराचा बचाव होतो. म्हणूनच ही स्वच्छता सर्वदृष्टीकोनातून लाभदायक आहे.
आजच्या काळात घरातील महिला नोकरीच्या निमीत्ताने घराबाहेर पडतात. असे असतांना घरात वार्षिक स्वच्छता करणे त्यांना डोक्याला ताप वाटतो. परंतू करणे अनिवार्य असल्यामुळे एकप्रकारची औपचारिकता समजून स्वच्छता वरवर आटोपण्याचा प्रयत्न करण्यात येतो. किंवा मजूराच्या मार्फत करण्यात येते. परंतू ज्या महिला गृहिणी आहेत त्या ह्या कामाकडे जातीने लक्ष देतात. वार्षिक स्वच्छता ही थकविणारी बाब तर आहेच त्याचबरोबर मजेशीरही आहे. कारण कपाटं साफ करतांना त्यातून निघणार्या जुन्या वस्तू, मुलांचे लहानपणीचे कपडे, जुन्या फोटोंचे अल्बम बघून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. काम करत असतांना गप्पा रंगतात. आणि हसत खेळत स्वच्छता पार पडते.
स्वच्छ केल्याने कपाटांना नविनपणा येतो. अनुपयोगी वस्तूंमुळे तुडूंब भरलेली कपाटे रिकामी होतात. अनुपयोगी वस्तू बाहेर काढल्यामुळे नविन वस्तूंसाठी कपाटात जागाही निर्माण होते. बाहेर काढलेल्या वस्तू नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या स्वाधीन केल्यास त्यांच्या मार्फत त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यात येतात. अशाप्रकारे वार्षिक स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व आहे.
वार्षिक स्वच्छतेमुळे ज्याठिकाणी दररोज सफाई होवू शकत नाही अशा सर्व ठिकाणांवर जमलेली धूळ, जाळे, तसेच उंदरांनी धुडगूस घातल्यामुळे पसरलेली अस्वच्छता उघडकीस येते. घराचा कानाकोपरा स्वच्छ होतो. घरात प्रसन्न वाटू लागते. कारण घर हे घरातील जुनाट वस्तू ज्या वर्षो न वर्ष निरुपयोगी पडून असतात. त्यांची नकारात्मक उर्जा पकडून असते. ज्यामुळे घरातील माणसांमध्ये भांडणं होणे तसेच घराची आर्थिक व्यवस्था कोलमडणे अशा गोष्टींची शृंखला निर्माण होते. म्हणूनच घराची मनापासून स्वच्छता केल्यामुळे घरातील वातावरण हलके होते. कारण त्यामुळे घरातील नकारात्मक उर्जेचा नायनाट होत असतो. स्वच्छ झालेल्या घराला रोशनाई, फुलांच्या माळांनी केलेली सजावट, दारातील रांगोळी व दारांना लावलेली तोरणे शोभून दिसतात. तसेच घरात सकारात्मकता पसरते.
सणासूदीच्या ह्या मंगल काळात घराच्या स्वच्छतेबरोबर मनात साठलेला द्वेष व मत्सराचा कचराही काढून टाकला पाहिजे. ज्यामुळे नात्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत मिळते. त्यासोबत नात्यांची विणही घट्ट होते. कारण काळ पुढे सरसावतो आहे. त्याच्या समवेत आपणही चालत राहिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीत गुंतून पडणे मग ते प्रेम असो, वैर असो किंवा अपेक्षा असो आपल्याला महागात पडू शकते. भावनांच्या आवेगात वाहत जाणे आपल्याला अडकवून ठेवू शकते. जे कोणासाठीही हितकारक नाही. तेव्हा स्वच्छता ही घराची असो अथवा मनाची करणे आवश्यक आहे.
1. वार्षिक स्वच्छतेमुळे घराचा कानाकोपरा सुरक्षीत होतो.
आपण रोजच्या धावपळीत सर्वत्र लक्ष देवू शकत नाही. वरवर स्वच्छता करून मोकळे होतो. परंतू वार्षिक स्वच्छता ही सखोल असते. ज्या वस्तू रोजच्या वापरात नसतात त्यांनाही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वच्छ करून व कडक उन्ह दाखवून नंतर ठेवण्यात येते. त्याशिवाय मोठ्या लाकडी सामानाच्या मागे व कपाटांच्या मागे जमा झालेला कचरा साफ करण्यात येतो. त्याचप्रमाणे खिडक्या व पडद्यांवर साठलेली धूळ जी आरोग्यास नुकसानकारक असते व्हॅक्युम क्लिनरच्या सहाय्याने काढण्यात येते. अस्वच्छ जागेवर लक्ष्मीचा वास नसतो असा समज आहे. त्या कारणाने का होईना घरात समृद्धी यावी तसेच घरातील माणसांना आरोग्य लाभावे ह्या अपेक्षेने आपण वार्षिक स्वच्छता केली पाहिजे. त्याचबरोबर घरात उंदरांचा वावर असेल तर अस्वच्छतेसोबत उग्र दर्पही पसरतो. किंवा उंदरांनी अनेक वस्तूंचे नुकसानही केले असल्याचे आपल्या निदर्शनात येते. ह्या सर्व गोष्टी वार्षिक स्वच्छतेच्या दरम्यानच लक्षात येतात. व त्यावर उपाय योजनाही करता येवू शकतात.
2. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो
वार्षिक स्वच्छतेच्या दरम्यान जुन्या वस्तू ज्यात फोटो अल्बम, जूने कपडे, वह्या, पुस्तके बाहेर येतात व त्यांच्याशी जुळलेल्या आठवणींना उजाळा मिळतो. मुलांचे लहान वयातील कपडे आठवण म्हणून जपून ठेवलेले असतात. जुन्या वह्यांच्या माध्यमातून त्यांची लहान असतांनाची लिखावट व आताची लिखावट ह्यांच्यात फरक दिसतो. जुन्या वस्तू ज्या आता तितक्यास्या उपयोगाच्या नसतात तरीही त्यामागे असलेल्या आठवणींमुळे त्यांना फेकून देण्याचे धैर्य होत नाही. अशा रितीने वर्षातून एकदा का असेना जुन्या आठवणींमध्ये रमणे प्रत्येकास आवडते.
3. महत्वपुर्ण वस्तू व अनुपयोगी वस्तू वेगळ्या केल्या जातात.
वार्षिक स्वच्छतेच्या दृष्टीने वस्तू बाहेर येतात. पुन्हा त्यांना निट करून जोपासून ठेवण्यात येते. काही महत्वाची दस्ताऐवज, जुन्या आठवणी म्हणून जोपासलेल्या वस्तू, तर काही कधि कधी उपयोगास पडणार्या वस्तू वगळता आणखी बरेच सामान असते जे आपण उगाचच बाळगलेले असते. त्या सामानाच्या गर्दीने कधी कधी महत्वाचे सामान सापडेनासे होते. अशा निरुपयोगी वस्तू वेगळ्या काढून ठेवल्यास जर त्या मधल्या काळात आपल्या काहिही उपयोगात आल्या नाहीत तर कायमच्या टाकून द्याव्यात. अशारितीने घरात संतुलन राखले जाईल. तसेच कचरा जमा होणार नाही. त्यासोबत महत्वाच्या वस्तू कोठे ठेवल्या आहेत हे ही उत्तमरीतीने लक्षात राहिल. त्यामुळे आपल्या वेळेची बचतही होईल.
4. गरजूंची मदत करता येवू शकते.
वार्षिक स्वच्छतेत जुन्या बेडशिट, चादर, ब्लॅंकेट, भांडी, जुने व लहान झालेले कपडे निघतात. त्यांच्या जागी आपण नविन घेण्याच्या योजना बनवितो. परंतू निघालेल्या वस्तूही इतरांच्या कामी येवू शकतात. कारण आपले असे देश बांधव आहेत ज्यांच्या मुलभूत गरजाही पुर्ण होवू शकत नाहीत. त्यांनाही बदलत्या हवामानाचा त्रास होतो. तेव्हा वर्षाकाठी अशा वस्तू जमा करून एका ऑर्गनायझेशनच्या स्वाधीन कराव्यात. त्यामुळे कित्येकांची मदत होवू शकते. कामगार वर्ग, बेघर बांधव, अनाथालये अशी असंख्य ठिकाणे अशा सामानाची वाट बघत असतात. खराब झालेल्या वस्तू न देता चांगल्या दर्ज्याच्या वस्तू द्याव्यात. जेणेकरून काही महिने तरी त्यांना त्या उपयोगात येतील. वस्तू देतांना त्यामागच्या भावना महत्वपुर्ण असतात. कोणी गरजू असला तरी त्याची माणूस म्हणून किंमत कमी होत नाही. तेव्हा माणुसकीच्या नात्याने गरजूंना मदत करता येवू शकते.
वार्षिक स्वच्छता अनेक दृष्टीकोनातून महत्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही सामानाचे किंवा वस्तूचे आयुष्य वाढते. घराच्या कानाकोपर्यातील अस्वच्छता दूर होवून घरातील वातावरण निरोगी होते. माणसांचे आरोग्य जपले जाते. त्याचबरोबर घरातील वातावरण सकारात्मक होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि अनेक गरजूंची मदत करता येवू शकते. तेव्हा वार्षिक स्वच्छता मनापासून करावी जेणेकरून आपल्या हातून ह्या सर्व गोष्टी घडतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)