
संवेदनेतून हृदयाची हृदयाशी तार जोडली जाते. माणुसकीला जाग येते. संवेदनेनेच समाजातील एका अति सामान्य परंतू जागरूक नागरिकालाही व्यक्तीगत पातळीवर महत्व प्राप्त होते. त्यामुळे माणसाच्या हृदयातील संवेदना रूपी ठेवा हाच त्याच्या माणूस असण्याची खरी ओळख आहे. आपल्या आसपासचा समाज जो मुलभूत समस्यांनाही त्यांच्या जगण्याचाच एक भाग समजून त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करतो. परंतू एका जागरूक नागरिकाच्या संवेदना मात्र त्याच समस्यांना उघडकीस आणण्याची ताकद स्वत:मध्ये ठेवतात. संवेदना अन्याय अत्याचार सहन करत जगणाऱ्यांप्रती. ज्या त्यांना माणूस म्हणून आपल्या हक्कासाठी लढण्याकरीता एकत्र आणण्याची हिम्मत बाळगतात. संवेदना मुक्या प्राण्यांप्रती ज्या समाजात त्यांच्या करीता दयाभाव पसरविण्याचे सामर्थ्य ठेवतात. संवेदना पुरुषी मानसिकतेला तसेच त्यांच्या अमानवीय व पाशवीयतेला बळी पडलेल्या स्त्रियांप्रती ज्या अशी दुष्कृत्ये करणाऱ्या नराधमांना त्यांच्या कर्मांप्रमाणे उचित शिक्षा भोगायला लावण्यास सक्षम असतात. म्हणूनच समाजाची उभारणी माणसाच्या हृदयातील संवेदनेच्या आधारावर निर्धारित झाली पाहिजे. अन्यथा समाजाची अवस्था मरणासन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या वाढत्या सिमेंटच्या जंगलांमध्ये राहून व्यवहार ज्ञानाचे व आपसात चढाओढींचे बाळकडू आपल्याला आपोआपच मिळत आहे. परंतू त्याहून दुप्पट प्रमाणात आपल्यातील परोपकाराची संवेदना मात्र दुर्दैवाने हळूहळू करून लोप पावत चालली आहे. कारण स्वत:ची पोळी शेकन्याच्या गडबडीत घासातला घास वाटून खाण्याची आपली जुनी संस्कृती आपल्याच विस्मरणात गेलेली आहे. जोपर्यंत स्वत:ला एखाद्या संकटाची झळ पोहचत नाही तोपर्यंत इतरांवर आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कळत नाही. इतके आपण पाषाण हृदयी होत चाललोय. आपली हीच बेपर्वावृत्ती समाजात अट्टल गुन्हेगारांना अत्याचार्यांना बलात्कार्यान्ना अत्यंत बेमालूमपणे आश्रय देत आहे. जे आपल्याच जगण्यातील आनंद हिरावून घेत आहेत. तेव्हा आता आपल्या पैकी प्रत्येकाला आपल्यातील संवेदनेला जागं करण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून असंवेदनशीलतेचा विरोध करण्याकरीता आपण निदान सत्याची व न्यायाची बाजू निवडून तिच्या बरोबरीने तरी अगदी धीरोदात्तपणे उभे राहू शकलो पाहिजे.
समाजातील एका जागरूक नागरिकास कमीत कमी स्वत:च्या जीवन विषयक अधिकारांचे आकलन असले पाहिजे. कारण प्रणालीचा भाग बनल्यानंतर कठोर नियमांच्या बंधनात त्याचा आवाज दडपून टाकण्यात येतो. आज जेव्हा आपण स्त्रियांवर निर्घुण अत्याचार होतांना पाहतो. तेव्हा गुन्हेगारास ताबडतोब तेवढ्याच तोडीची सजा मिळावी असे आपल्याला जीकारीने वाटते. परंतू कायद्याचे मापदंड त्या प्रक्रियेस हळूवारपणे पुढे नेतात. अशावेळी आपल्याला हतबल झाल्यासारखे वाटते. कारण कधीकधी साक्षीदारांच्या अभावामुळे गुन्हेगारावर गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे त्याला कमीत कमी सजा सुनावली जाते. तर कधी त्याला निर्दोष म्हणून मुक्त देखील केले जाते. अशाप्रकारे कठोर सजेविना गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांची गुन्हे करण्याची हिम्मत आणखीच बढावत जाते. परंतू एक जागरूक नागरिक स्वत:मध्येच सर्वशक्तीशाली असतो. कारण तो संवेदनशील असतो. आपल्या मध्यमवर्गीयांचे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कसे शोषण होते ह्याची त्याला पूर्णपणे जाणीव असते. मध्यमवर्गीयांपेक्षा खालचा वर्ग भौतिकरीत्या श्रीमंतांच्या अरेरावी युक्त वागण्याने पिळला जातो. कारण माणूस असूनही त्यांना त्यांच्याकडून निकृष्ठ दर्ज्याची वागणूक मिळत असते. अशावेळी ते जे त्यांना माणूस म्हणून सहजासहजी मिळत नाही. त्या सर्व गोष्टी ते आपल्यातील राक्षशी प्रवृत्तीच्या मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते आपोआपच गुन्हेगारीच्या जगात ओढले जातात. कोणीही आईच्या पोटातून राक्षस म्हणून जन्म घेत नाही. परंतू एका निरागस बालरूपास त्या चिखलात ढकलण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. ज्याकरीता हा संवेदना रहित समाजही तेवढाच जबाबदार आहे. म्हणून एका जबाबदार व जागरूक नागरिकाने कायम आपले डोळे उघडून समाजात वावरले पाहिजे. त्याला त्याच्या देशबांधवांवर होणारे अन्याय खटकले पाहिजेत. त्याविरोधात त्याला आपल्या मार्गांनी आवाज उठविता आला पाहिजे. कारण संवेदनायुक्त आवाज समाजात जागरूकता पसरविण्यास पुरेसा ठरतो. अशाप्रकारे आपल्या सहृदयतेने त्याला इतरांनाही संवेदनशील बनविता आले पाहिजे. तेव्हाच रंजल्या गांजलेल्यांना गुन्हेगारीच्या दलदलीतून काढून माणुसकीकडे वाळवीने शक्य होईल.
माणूस म्हणून परस्पर सम्मान हा प्रत्येक माणसाचा जन्म सिद्ध अधिकार आहे. परंतू जातीवरून पेशावरून भौतिक श्रीमंतीवरून अपंगत्वावरून रंगावरून माणसा माणसांमध्ये भेदभाव निर्माण झालेले आहेत. त्याकरीता जात व पेशा ह्या गोष्टी तर विशेष ग्राह्य धरल्या जातात. जो वर्ग निकृष्ठ दर्ज्याची कामे करतो. त्यांना घालून पाडून बोलून व टाकाऊ वागणूक देवून त्यांचा आत्मसम्मान अक्षरशा ठेचला जातो. अपंगांकडे केवळ सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. माणसाच्या रंगावरून त्याला अपमानित केले जाते. जाती वरून तर अजूनही माणसांना निषिद्ध करण्यात येते. अशाप्रकारे माणसाकडे फक्त माणूस म्हणून पाहणे आपण आता सोडलेले आहे. आपल्या नजरेत एकतर त्यांच्या साठी लाचारीचे भाव असतात. किंवा आपण त्यांच्यासाठी विशेष मत बनविलेले असते. परंतू आपण जर समाजाप्रती संवेदनशील होवू शकलो तर करुणामयी हृदयाचे धनी होवू. करुणामयी हृदय कोणत्याही प्रकारचे मत अपेक्षा लालसे शिवाय माणसाला फक्त माणूस म्हणून बघण्याचे स्वत:मध्ये सामर्थ्य ठेवते. ते थेट माणसाच्या हृदयाशी संपर्क साधू शकते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मापदंडाच्या बंधनांना झुगारून प्रत्येक माणसांच्या मनातील दु:खांवर आपल्याद्वारे फुंकर घातली जावू शकते. ज्यामुळे मनातील विकार जे एका पात्रतेनंतर माणसाला गुन्हा करण्यास प्रवृत्त करत असतात. त्यांना टोक गाठण्यापासून थांबविता येवू शकते. कारण अतीव दु:ख तळागळाची परिस्थिती वाईट संगत शिक्षेद्वारे दिल्या जाणाऱ्या शारीरिक यातना तसेच भेदभावाची वागणुक ह्या सर्व गोष्टी माणसाच्या आत्मसम्मानाला वारंवार मलीन करत असतात. ज्यातून समाजात गुन्हेगारीचे सावट निर्माण होते. तेव्हा संवेदनेच्या मार्गाने अशाप्रकारची परिस्थिती व मानसिकतेला आळा घातला जावू शकतो. तसेच गुन्हेगारीपासून समाजाची मुक्तता करता येवू शकते.
1. आपल्या परिचितांचे वर्तुळ सर्वतोपरी स्वच्छ असावे ही काळजी घेतली पाहिजे
आताच्या काळात आपल्याला सामाजिक होण्यासाठी वाव मिळावा म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक मंच असतात. त्याद्वारे आपण आपल्यातील कलाकौशल्य विविध विषयांवरील मार्गदर्शन आपल्या समस्या जगापुढे सादर करून आपले परिचित व अपरीचीतांचे एक वर्तुळ तयार करू शकतो. ज्यात आपल्याला पसंत करणारे व आपल्या सादरीकरणावर प्रतिक्रिया पाठविणारे सदस्य असतात. परंतू आता आपण एका जागरूक नागरिकाच्या नात्याने आपल्या त्या समुहात संवेदनाशीलता आणली पाहिजे. समाजातील मुख्य समस्यांवर आपसात वार्तालाप केला पाहिजे. त्यावरील तोडग्यांवर विचार विनिमय केला पाहिजे. समुहात स्त्रियांचा सहभाग असल्यास त्यांना गलिच्छ धारणेने कोणत्याही पद्धतीने त्रास देणाऱ्यास समूहाबाहेर केले पाहिजे. अशाप्रकारचे जबाबदारीपूर्ण वर्तन करणे हे आपल्या सर्वांचे आपल्या देशभागीणींच्या सुरक्षेसाठी महत्वाचे कर्तव्य आहे.
2. घरात नातेसंबंध सुदृढ असावे ह्यासाठी झटले पाहिजे
आपण आपल्या घराला एक अशी जागा बनविले पाहिजे जिथे दिलासा प्रोत्साहन विश्वास ह्यासोबत आपल्या माणसांचे मनही मोकळे होवू शकेल. कारण ह्या सर्व गोष्टी नातेसंबंधांना ऑक्सिजन प्रदान करत असतात. घराद्वारे हे ऑक्सिजन घरातील माणसांना मिळाले नाही तर नातेसंबंधांची आपसातील वीण सैल होत जाते. अशावेळी घरास घरपण राहत नाही. कारण घरातील माणसे घराबाहेर जावून आपआपले मानसिक सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रसंगी जास्तीत जास्त शक्यता असते कि ते वाईट संगतीच्या जाळ्यात अडकतील. तेव्हा समाज हिताच्या दृष्टीकोनातून ही धोक्याची घंटा आहे. कारण त्यातूनच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. म्हणून नातेसंबंधांना उत्कृष्ट वेळ देवून त्यांच्यात भावना ओतून तसेच समंजसपणाने त्यांचे जतन करावे. जेणेकरून एक जागरूक कुटुंब बनून समाजाचा स्तर उंच करण्यात आपला खारीचा वाटा असावा.
3. आपल्याद्वारे माणुसकीचे जतन व्हावे ह्याकरीता प्रयत्नशील राहावे
आज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी समाजाला घाणेरडे बनविले आहे. त्यामुळे स्वत:ला माणूस म्हणून घेण्याचीही लाज वाटते. कारण आपण माणूस असूनही आपल्या हातून माणुसकीचे जतन केले जात नाही. आपल्यातील स्वार्थ रूपी राक्षसाने आपल्या मनातील विवेकावर मात केलेली आहे. ज्याचे दुष्परिणाम सर्वत्र अनुभवास येत आहेत. आपण फक्त स्वत:च्या इच्छा स्वार्थ लालसा ह्या गोष्टींमध्ये आंधळे होवून आपल्यामुळे इतरांना होणाऱ्या असुविधा त्रास ह्याकडे सहज दुर्लक्ष करतो. अशाप्रकारे आज आपण माणुसकीला ह्या जगातून हद्दपार करण्यास निघालो आहोत. तेव्हा आता जरा उसंत घेवून प्रत्येकाने स्वत:कडे बघण्याची आवश्यकता आहे. तरच आपल्या लक्षात येईल कि आपण माणुसकीचा उंच स्तर सोडून अत्यंत तळागळाची पातळी गाठली आहे. परंतू पुन्हा माणुसकीचा स्तर गाठायचा असेल तर मात्र स्वत:च्या हृदयात सर्वप्रथम डोकावून पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे निपचित पडलेल्या आपल्या संवेदनेला पुन्हा जागे केले पाहिजे.
4. करुणामयी हृदय जोपासले जावे हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावे
माणसाच्या हृदयात देवाचा वास असतो. तेव्हा त्याने कायम आपले हृदय निकोप व करुणामयी असल्याची स्वत:शी खात्री करून घ्यावी. तेव्हाच त्याच्या मनात आपल्या आसपासचे दु:ख पाहून अन्याय अत्याचाराच्या काळ्या धुराने समाजात पसरलेला काळोख पाहून जगण्यातील वेदना पाहून परोपकाराच्या संवेदना जागरूत होवू शकतील. कारण त्या संवेदनेतूनच कधी ना कधी थोर महात्मे जन्म घेतील. तसेच पुन्हा एकदा हे माणसानेच निर्माण केलेले दु:खाचे वासनेचे अविश्वासाचे भीतीचे साम्राज्य समूळ घालवून समाजाला स्वातंत्र्याच्या सोनेरी छटा लावतील. अन्यथा राक्षशी प्रवृत्तीच्या प्रकोपाने सामाजिक स्तर कालांतराने आणखीच निकृष्ट दर्ज्याचा होत जाईल. जिथे स्त्रियांचे स्वतंत्रपणे श्वास घेणे कायमचे अशक्य होईल. तेव्हा आता हृदयात करुणा जागविली पाहिजे. जेणेकरून आपल्याला स्त्रियांकडे माणूस म्हणून बघणे सोपे होईल. त्यानंतरच त्यांच्या विकासाला ग्राह्य धरण्यात येईल. तसेच कोणालाही त्यांच्यावर विकृत मार्गाने मात करून पुरूषार्थाचे सुख उपभोगावेशे वाटणार नाही.
हृदयातील संवेदनेला जागे करून आज ह्या समाजाला आव्हान करावेशे वाटते. कि क्षणिक वासनेच्या पूर्ततेसाठी कर्तुत्ववान स्त्रियांना आपले शिकार बनविणाऱ्या नराधमांना पाठीशी घालून समाजाला काय निष्पन्न होणार आहे. पुन्हा एखादी चिमुकली एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री त्याची पुढची शिकार ठरणार आहे. आपल्या घरात आई बहीण मुलगी असतांना बाहेरच्या जगात स्त्रियांची अशाप्रकारे होत असलेली अवहेलना त्यांच्या शरीराची विटंबना आपण पाहू तरी कसे शकत आहात? तेव्हा आता प्रत्येक जागरूक नागरिकाने आपले साहस दाखविण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांवरील अत्याचाराकरीता गुन्हेगारास शक्य तितक्या लवकर कठोरातील कठोर शाषण मिळावे ह्याकरीता अट्टाहास करण्याची गरज आहे. अन्यथा जिथे स्त्रियांना परस्पर सम्मान दिला जात नाही अशा समाजाचे लयास जाणे ठरलेले आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)