प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते

 मनुष्य पैसा व प्रसिद्धीच्या मोहात इतका बेभान झाला आहे कि त्याला विशाल सृष्टीच्या ताकदीचा व जादूचा विसर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तो आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी कायम धडपडत असतो. परंतू सृष्टीची जादू मात्र क्षणाक्षणाला सर्वत्र पसरत असते. तसेच त्याचे लाभही आपल्या कळत नकळतपणे आपल्या पदरात पडत असतात. आपल्या आसपास एक उर्जा निरंतर  कार्यरत असते. जी शाश्वत सत्यांच्या रूपात आपण अनुभवत असतो. दररोज सकाळी सुर्य उगवतो. वातावरणात हवा असते. जिला आपण बघू शकत नाही. मात्र तिचा अंगाला होणारा स्पर्श आपल्याला जाणवतो. प्राणवायू आपण बघू शकत नाही परंतू त्याच्याशिवाय प्राणिमात्रांचे पृथ्वीवरील  अस्तित्वही शक्य नाही. पर्वत, नद्या, समुद्र ही सृष्टीची भव्य रूपे ज्यांना आपण नाकारू शकत नाही.

   आपण मात्र आपल्या संपूर्ण जीवनाकालात आपल्या व्यक्तीगत समस्या, आपले दु:ख, आपले आनंदाचे क्षण केवळ आपल्या पुरता व एवढाच विचार करत असतो. आपण ह्या जगण्याशी,  आपल्या माणसांशी तसेच  आपल्या जीवनातील सुख-दु:खाशी संलग्न  होत जातो. परंतू शरिरास मृत्यू येणे हे मात्र अंतिम व कटू सत्य आहे. ज्याला आपल्याला आयुष्यात कधि ना कधि सामोरे जावेच लागते.  कारण  प्रवास कोणताही असो त्याचे मुक्कामाचे ठिकाण ठरलेले असते. जीवनाच्या प्रवासाचेही असेच असते. जशी झाडची पिकली पाने गळून पडतात व त्या जागी पुन्हा  नवीन लुसलुशीत कोवळी पाने येतात. हा सृष्टीचा अलिखित नियम आहे आणि तो सर्वांना लागू पडतो.

  त्याचप्रमाणे एके दिवशी आपल्याही आयुष्याचा शेवट होतो. तसेच एका पिढीचा अंत होवून नवी पिढी उदयास येते. हे चक्र असेच निरंतर सुरू राहते. तेव्हा आपण फक्त वर्तमान क्षणात जगले पाहिजे. कारण आपल्या जीवनात काल व उद्द्या ह्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. तो केवळ आपल्या मनाचा भ्रम आहे. कारण सृष्टी ही किमयागार आहे. परंतू तिच्या किमयांच्या मागचे अर्थ आपल्याला जेव्हा उलगडतील तेव्हाच आपल्याला प्रत्येक क्षणी होणार्‍या विस्मयकारकतेची अनुभूती होईल.

 जेव्हा आपले मन प्रसन्न असते व आपण आपल्या अंतर्मनाच्या माध्यमातून कल्पनेच्या जगात विहार करत असतो. किंवा कधी अति दु:खात बुडालेलो असतो. तेव्हा आपल्या विचारांना भावनांची जोड लाभते. त्यांना दर्जा प्राप्त होतो. आणि ते आपल्या जीवनात प्रत्यक्ष रूप घेवू लागतात. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा  मुर्तरूप घेवून पुर्णत्वास जातात. संतांना वृक्षवेलीत व पाषाणातही विठ्ठ्लाचे दर्शन घडत होते. प्राणिमात्रात देव दिसत होता. ह्याचा अर्थ ते सृष्टीच्या उर्जेशी एकरूप झाले होते. सामान्य माणसे त्यांची तुलना वेड्यांशी करत असत. परंतू ते मात्र सृष्टीच्या विस्मयकारक स्वरूपाशी तल्लीन होवून जीवनाचा आनंद घेत असत. त्यामुळे त्यांना त्यांच्या आसपासच्या जगाचे भानही उरत नसे.

   सामान्य माणसांची श्रीमंतीची परिभाषा मात्र भौतिक वस्तू तसेच भौतिक सुखाशी निगडीत असते. त्यामुळे ते जास्तीत जास्त संपत्ती गोळा करतात. जेणेकरून  त्यांची  नावे श्रीमंतांच्या श्रेणीत यावीत. त्याचबरोबर त्यांचे जीवन काहिही झाले तरी सुरक्षीत रहावे. परंतू जन्म मृत्यूचा हा खेळ पुर्णपणे सृष्टी च्या हाती असतो. कारण जीवनाच्या सुरक्षेची पुर्णपणे हमी असलेल्या महागड्या गाड्या तसेच सर्व सुखसुविधाजन्य व सुरक्षीत टोलेजंग इमारती पैस्याने विकत घेता येवू शकतात. किंवा जीवनाच्या बचावासाठी सुरक्षा कवच निर्माण करता येवू शकते. परंतू जेव्हा  एखाद्या जीवाचे पृथ्वीवरचे दाणा पाणि संपते किंवा त्याच्या जीवनाचा हेतू पुर्ण होतो. तेव्हा मात्र त्याने आपल्या अवतीभवती निर्माण केलेल्या सुरक्षेच्या साधनांची पूर्ण सुविधा असूनही त्याला एक क्षणही वाचवता येवू शकत नाही.

  जेव्हा भूकंप, चक्रीवादळं व महापूरासारखी नैसर्गीक संकटं पृथ्वीवर थैमान घालतात. तेव्हा त्यात माणसाच्या गरीब श्रीमंत असण्याचा भेदभाव निसर्ग करत नाही. अशा महासंकटांमधून तेच वाचतात ज्यांच्या जीवनाचा हेतू पुर्ण झालेला नसतो. त्यासाठी त्यांना विशेष सुरक्षा कवचाचीही गरज पडत नाही. कारण त्यांच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी सृष्टीने घेतलेली असते. हे अत्यंत विस्मयकारक आहे.

   मनुष्याने कितीही भौतिक श्रीमंती प्राप्त केली किंवा आकाशाला गवसणी घातली. तरिही तो निसर्गापुढे हतबल असतो. निसर्गाचे कोणतेही नियम त्याला चुकत नाहीत. तेव्हा निसर्गापुढे आपण नेहमी नतमस्तक असले पाहिजे. तसेच प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ असले पाहिजे. आपण कितीही श्रीमंत असलो तरी भूक लागल्यावर साध्या जेवणानेच आपले पोट भरते. तहान लागल्यावर जीवनदायी पाणीच आपल्याला पिण्यास लागते. त्याचबरोबर आराम करण्यासाठी जमीनीचाच आधार घ्यावा लागतो. जर ह्या तिनही गोष्टी आपल्याकडे उपलब्द्ध आहेत तर आपण स्वत:ला गरीब समजू नये. मुळात गरिबी श्रीमंती हे आपल्या मनाचे विकार आहेत.

  समाजाने निर्माण केलेले भेदभाव आहेत. कारण भौतिक  श्रीमंतीच्या आधारावर कोणीही श्रीमंत होत नाही. परंतू आपले विचार मात्र आपल्याला गरीब बनवू शकतात. तेव्हा आपल्या दिनचर्येत कृतज्ञता व्यक्त करण्यास वेळ असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या वर्तनात माणुसकीचे प्रमाण असले पाहिजे. आपण स्वत:ला घाण्याच्या बैलाप्रमाणे कामात जुंपतो. तसेच आपल्या मनात सतत त्या गोष्टींचा विचार करतो ज्यांची आपल्या जीवनात कमतरता आहे. परंतू विचार हे उर्जावान असतात. तेव्हा आपल्या  विचारांचे सकारात्मक असणे फार महत्वाचे असते. हे आपण कायम ध्यानात ठेवले पाहिजे.

   म्हणूनच जर आपल्या मुलभूत गरजा पुर्ण होत आहेत तर आपण धनवान आहोत. एक माणूस म्हणून अन्य माणसास समजण्याची क्षमता आपल्यात आहे तर आपण श्रीमंत आहोत. आपले जीवंत असणे विस्मयकारक आहे. आपण कोणत्याही भौतिक श्रीमंतीने समृद्ध नसलो तरी चालेल. परंतू आपल्या मनाला श्रीमंत बनविणार्‍या दया, प्रेम, करूणा ह्या मौल्यवान गोष्टींची आपल्याला जागृती असणे विस्मयकारक आहे.

  एका जीवातून अन्य जीवाने जन्म घेणे विस्मयकारक आहे. मनातील भावनांचे जग, डोळ्यातील अश्रू, आनंद, हसणे, रडणे हे सर्व विस्मयकारक आहे. विस्मयकारकतेचा अनुभव घेण्यासाठी केवळ आपल्याला सृष्टीशी एकरूप होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा जीवन म्हणजे एक कैद आहे. कारण इथे आपण निरनिराळ्या गोष्टी, माणसे, सुख दु:ख, अपेक्षा ह्यांच्याशी संलग्न आहोत. त्यामुळे  हेच आपल्या दु:खाचे खरे  कारण आहे.

1. दिवस व रात्र होण्यात जीवनाचा विस्मयकारक अर्थ आहे.

   दिवसामागून रात्र येणे व रात्री मागून दिवस येणे ही प्रकृतीची श्रुंखला आहे. दिवस हा कर्म करण्यासाठी असतो. तर रात्र कष्ट करून दमलेल्या व शिणलेल्या शरिरास आराम करण्यासाठी असते. त्याचप्रमाणे जेव्हा आयुष्यात दु:खाचे क्षण येतात व काळोख पसरतो. तेव्हा त्यामधून बाहेर पडण्याच्या वाटा अस्पष्ट होतात. त्यासोबतच आपल्या आशा मालवतात आणि विचारही खुंटीत होतात. दिवस उजाडण्यापुर्वीची रात्र सर्वाधिक काळोखी असते. त्यामागेही विस्मयकारक अर्थ समावलेला आहे.

  जेव्हा जीवनात कोणतिही गोष्ट चरमसिमा पार करते. तेव्हा काहितरी मोठा बदल येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच उजाडल्या नंतर सर्वकाही लख्ख दिसू लागते. आपल्या विचारांना पालवी फुटू लागते. आशा जागृत होतात. सुर्याची किरणे आपल्या मनातील आशेच्या किरणांना चमकवू लागतात. अशाप्रकारे जीवनात सुख व दु:ख एकमेकांचा पाठलाग करत असतात. आणि दोन्हीचे असणे तेव्हढेच महत्वाचे असते. त्याशिवाय जीवनाचे संतुलन राहणार नाही.

2. क्षणोक्षणी कृतज्ञता व्यक्त केल्याने विस्मयकारकता अनुभवता येते

   जेव्हा आपण आपल्या आयुष्याप्रती कृतज्ञ असतो तक्रार करत नाही.  तेव्हा आपण विस्मयकारक गोष्टींना आकर्षीत करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या कामाप्रती प्रामाणिक असतो. तसेच काम कितीही कष्टाचे असले तरिही ते करतांना आनंद घेत असतो. त्याक्षणी आपल्याला थकवा जाणवत नाही. कारण आपले भान त्यात पूर्णपणे हरपलेले असते. अशावेळी अनेक आश्चर्यकारक घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. ज्यावर विश्वास ठेवणे अवघड होवून जाते. कारण त्यामागे असलेला विस्मयकारक अर्थ आपण समजू शकत नाही.

 परंतू जेव्हा आपल्या कामाप्रती आपल्या मनात आदर नसतो, तेव्हा आपल्याला कामाचा आनंद घेता येत नाही. त्यात सेवाभाव दिसून येत नाही तर भरमसाठ तक्रारी असतात. अशावेळी आपल्या मनात जे नकारात्मक विचार येतात त्यांना आपण कळत नकळतपणे उर्जा देत असतो. आणि ते विचार मुर्त रूपात आपल्या आयुष्यात घटीत होत असतात. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्याची उत्तम सवय आपल्याला विस्मयकारकतेच्या पुनरावृत्तीच्या वेगवान टप्प्यात आणते.

3. मनापासून माफ करण्याची प्रक्रीया विस्मयकारक आहे.

  जेव्हा आपण एखाद्यास मनापासून माफ करतो तेव्हा आपण त्याच्या मनावर उपचार करतो. ही उपचार प्रक्रीया दोघांच्याही मनाला शांतता प्रदान करते. आणि त्यामुळे जसजसा काळ पुढे सरकतो. मागच्या सर्व घटनांचा आपल्याला विसर पडत जातो. किंवा त्यावर प्रतिक्रीया देण्याची आपली इच्छा शमते. त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात असलेले वाईट विचार हळूहळू निघून जातात. माफ करणे म्हणजे त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात सकारात्मकरीत्या किंवा नकारात्मकरीत्या असलेली ओढ व संलग्नता कायमची संपविणे. जेणेकरून कोणत्याही कारणांनी त्या व्यक्ती साठी आपल्या मनात विचार येवून आपल्या भावना विचलीत होवू नयेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा तेच आकर्षीत होणार नाही. ती शृंखला कायमची तोडली जाईल. हे फारच विस्मयकारक आहे.

4. वर्तमान क्षणात जगणे विस्मयकारक गोष्टींचा अनुभव देते.

  आपण वर्तमानात जो क्षण जगत असतो तिथे आपण मनापासून उपस्थित नसतो. कारण आपल्या आयुष्यावर अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा तसेच सुख दु:खाचा पगडा असतो. ज्यामधून येणार्‍या प्रतिक्रीया व  पश्चाताप करण्यात आपण आपला आताचा क्षण व्यर्थ घालवितो. त्यामुळे वर्तमान क्षणात घडत असलेल्या गोष्टींकडे आपले आपोआपच दुर्लक्ष होते. जेवण करतांना आपले लक्ष अन्य कोणत्या गोष्टीत हारविलेले असते.

  भविष्याचा विचार करतांना आपण आपल्या कल्पना शक्तीने अघटीत दुर्दैवी घटनांचा विचार करून विचलीत होतो. परंतू जो काळ मागे होवून गेला व जो पुढे येणार आहे त्याचे आपल्यापाशी काहीही प्रमाण नाही. तो केवळ आपल्या विचारात व कल्पनेत समाविष्ट आहे. सृष्टीच्या पोकळीत कोठेतरी हरवला आहे. परंतू वर्तमान क्षण जगत जगत आपले आयुष्य पुढे सरकत असते. कोणता क्षण आपल्यासाठी काय घेवून येईल ह्याची आपल्याला कल्पनाही नसते. तेव्हा आपले  संपुर्ण लक्ष आपण जगत असलेल्या वर्तमान  क्षणात केंद्रित केले पाहिजे. तेव्हाच आपण ह्या विस्मयकारक जीवनाचा आनंद घेवू शकतो.

   सृष्टीच्या विस्मयकारकतेवर भोळा विश्वास असणे म्हणजे अनंताकडून अनंताकडे जाणारी सरळ रेषा आहे. सामान्य माणसांच्या विश्वासाला जिथे स्तब्धता येते तेथे निर्माण होणार्‍या साक्षात्काराला विस्मयकारक म्हंटले पाहिजे. सुर्य चंद्रावर नियंत्रण मिळविणारे गुरूत्वाकर्षण म्हणजे विस्मयकारकता आहे. जर विज्ञान एक वाहन आहे तर त्याला चालविणारे अध्यात्म म्हणजे विस्मयकारकता आहे. तेव्हा विस्मयकारक घडत राहणे कधिही थांबणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *