हुतात्म्यांच्या गौरवगाथा

आपण आपल्या शालेय जीवनाकरीता आजीवन ऋणी राहिले पाहिजे. कारण त्या संस्कारक्षम वयात आपल्या गुरुजनांनी आपल्या मनावर १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी ह्या दोन ऐतिहासिक तारखांचे महत्व असे प्रस्थापित केले. जेणेकरून आजही आपण त्या पवित्र दिवसावर मातृभूमीच्या सम्मानासाठी आपल्या देशाचा गौरव असलेल्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी आतुर होतो. आपले जण गण मन हे राष्ट्रगान गातांना आपला माथा अभिमानाने उंच होतो. त्यामुळेच देशप्रेमाचा हा अनमोल वारसा आपल्या नंतरच्या पिढीच्या सुपूर्द करतांना आपल्या मनात स्फुरण निर्माण होते. कारण तिरंगी ध्वज हा विविधतेतील एकतेचे एकमेव प्रतिक आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच बंधुभावाचा सर्वधर्मसमभावाचा माणुसकीचा समानतेचा संस्कृतीचा खांब रोवला जातो. तेव्हा फक्त ह्या दोन तारखांच्या निमित्तानेच नाहीतर इतरही वेळी तिरंग्याला स्पर्श करण्यापूर्वी त्यामागचा थोर इतिहास पुन्हा पुन्हा जाणून घ्यावा. त्याच्यासाठी हसत हसत आहुती देणाऱ्यांची शुभानावे जाणून घ्यावीत. कारण मृत्यू तर प्रत्येकासच येतो. परंतू मृत्यूनंतर ज्याच्या शरीराचा तिरंगा पांघरून सम्मान केला जातो. त्याचे जीवन स्वार्थत्यागाने थोर झालेले असते. तेव्हाच तेवढ्या भव्य साम्मानास तो पात्र ठरतो. आज जरी आपण स्वातंत्र्याची सुवर्णसकाळ सुदैवाने पाहिलेली असली. तरी तिला स्वत:च्या रक्ताने सिंचून आपल्याला दाखविणारे मात्र ती पाहू शकले नाहीत. तेव्हा आपण फक्त तिरंगा मिरवीन्यापुरते व मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेण्यापुरते ह्या दोन दिवसांना पाहू नये. तर सर्वार्थाने देशाचा पाईक होण्यास सदैव झटत राहावे.

 त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून माणुसकीला प्रोत्साहन द्यावे. कारण माणुसकीनेच मानवी जीवनाचा दर्जा उंचावू शकतो. सर्वप्रकारच्या विविधतेने नटलेला आपला देश हा फक्त माणुसकीच्या व्यासपीठावरच एकरूप होवू शकतो. कारण एकमेकांना समजून घेणे एकमेकांची मदत करणे एकमेकांसाठी आपल्या हृदयात करुणा बाळगणे गरीब श्रीमंत व जातीभेदास निषिद्ध मानने ह्या सर्व गोष्टी आपल्यात खऱ्या अर्थाने भाईचारा निर्माण करत असतात. अन्यथा समाजात सर्वत्र भेदभावाचे साम्राज्यच विस्तारलेले असेल. तेव्हा प्रत्येक देशाबांधवाने व्यक्तीगत पातळीवर एकमेकांशी माणुसकीपूर्ण वर्तन करण्यास स्वत:ला जाणीवपूर्वक सक्ती केली पाहिजे. कारण आपल्या दरम्यान केवळ त्या एकाच गोष्टीमुळे हृदयाचे हृदयाशी ऋणानुबंध जुळले जावू शकतात.  

  आपण आजवर स्वातंत्र्यदिन तसेच गणराज्यदिन उत्साहात साजरा होतांना पाहिले, त्यात सहभागी झालो, आणि आजतागायत त्या आठवणींचा आपल्याला कधिही विसर पडला नाही. त्याचप्रमाणे इतिहासाचा अभ्यास करतांना परिक्षेत उत्तीर्ण होण्या पुरते क्रांतीकारकांनी गाजविलेले  शौर्य तारखांसमवेत पाठांतरीत केले. परंतू कधिही आपण देशासाठी त्यांनी केलेल्या पराकोटीच्या त्यागाची व प्राणार्पणाची सखोलता समजू शकलो नाही. त्यांच्या धाडसाच्या व पराक्रमाच्या गाथा ऐकून आपल्या हृदयात स्फुरण निर्माण झाले नाही. कारण गुलामगिरीचे चटके आपण कधी अनुभवलेच नाहीत. परंतू स्वाभिमानाने पेटून उठलेल्या क्रांतीकारकांना मात्र गुलामगिरीचे जगणे इतके नकोसे झाले होते कि त्यापुढे त्यांना परकीय  शासनकर्त्यांकडून  होणारा पराकोटीचा छळ व अत्यंत क्रूरपणे दिल्या जाणाऱ्या शारिरीक यातना त्यांना क्षुल्लक वाटत असत. स्वातंत्र्याच्या ह्या लढ्यात जनसामान्यांचाही आक्रोश आणि अनेकांचे बलिदान सामावलेले आहे. जो कठिण काळ त्यांनी अनुभवला त्याची कल्पना करणेही आपल्यासाठी अशक्य आहे. तेव्हा आपण आजीवन त्यांचे ऋणी असले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या बलिदानास मनापासून अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अभिमानाने व उत्साहात साजरा केला पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांपर्यंत देशप्रेमाचा व देशभक्तीचा ज्वलंत संदेश पोहोचत रहावा. 

    गुलामगिरीच्या त्या कठीण काळात परकीय शासनकर्त्यांनी संपुर्ण भारतास तुरूंगाचे रूप दिले होते. त्याचबरोबर ते भारतियांना नोकराचे जीवन जगण्यास भरीस पाडत होते. स्त्रियांना रोजगाराचे आमिष दाखवून त्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवत होते. तसेच त्यांच्या स्वाभिमानास आणि आत्मसन्मानास पायदळी तुडविले जात होते. परंतू भारतमातेच्या विरपुत्रांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना आपल्या मायभूमीतून सळो कि पळो करून सोडले आणि त्यांनी आपल्या आया बहिणींची अब्रू राखली. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही. स्वत:च्या घरादारावर निखारे ठेवले. स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात प्राणांची आहुती देतांना ते जराही मागे हटले नाहीत. परंतू गुलामगिरीची झळ येणार्‍या पिढ्यांपर्यंत पोहचू दिली नाही. 

  स्वातंत्र्याची सुवर्णसकाळ पाहण्यासाठी ते नसतील हे त्यांना ठाऊक असूनही त्यांच्या कार्यात आणि जोशात कधि खंड पडला नाही. तरुणांनी त्यांचे तारुण्य देशासाठी पणास लावले आणि वेळ पडल्यावर हसत हसत फासावरही चढले. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे होते परंतू हेतू मात्र एकच होता तो म्हणजे देशाचे स्वातंत्र्य. अशाप्रकारे केवळ स्वाभिमानाच्या व आत्मसम्मानाच्या ताकदीवर त्यांनी स्वातंत्र्य खेचून आणले. कोणी जहाल तर कोणी मवाळ होते परंतू सर्वांचे ध्येय मात्र एकच ते म्हणजे देशाचे स्वातंत्र्य. त्यामुळे वैचारिक मतभेद असूनही विचारांची एकजूट झाली  आणि परकीयांना आपला देश सोडावा लागला. . अखेरीस 15 ऑगस्ट 1947 ह्या दिवशी भारतास स्वातंत्र्य मिळाले.

  आज आपण स्वतंत्र भारतात मोकळेपणाने श्वास घेतोय. परंतू कधिकधि ह्या गोष्टीची खंत वाटते कि गुलामगिरीच्या जगण्याचा अनुभव न घेतल्यामुळे आताच्या पिढीस स्वातंत्र्या चे महत्व पुरेपूर कळले नाही. स्वातंत्र्य म्हणजे नंदनवन जिथली गोड फळे मिळून मिसळून प्रत्येकाने चाखली पाहिजे. त्यावर व्यक्तीगत हक्क न दाखविता प्रत्येकास त्याचे सुख मिळावे तसेच कोणिही त्यास ओरबाडून व हिसकावून घेवू नये ह्याची खबरदारी प्रत्येक नागरीकाने घेतली पाहिजे. परंतू आज आपण आपल्या व्यक्तीगत आयुष्यात इतके व्यस्त झालो कि सामाजिक जबाबदार्‍यांची आपल्याला जाणीवच उरलेली नाही. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावतांना आपले विचारच खुंटीत झाले. ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे.

  ही पवित्र भूमी जिला आपण माता संबोधतो ती परकियांच्या बेड्यांनी जखडलेली असतांना आणि सर्वसामान्यांचे हाल होत असतांना एका आईस जाग आली. तिने आपल्या पति समवेत स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते अद्भूत दांपत्य म्हणजे थोर जिजामाता व शहाजीराजे भोसले होते. त्यांचे अपत्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते स्वप्न पुर्णत्वास नेले. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, स्वराज्य म्हणजे सुख, स्वराज्य म्हणजे स्त्रियांचा सम्मान व सुरक्षा, स्वराज्य म्हणजे अत्याचाराविरुद्ध कठोर न्याय, स्वराज्य म्हणजे स्वाभिमान. एका आईच्या अशा प्रकारच्या असामान्य विचारातून घरा घरातून शिवाजी जन्मास आले. स्वराज्याचा हा वारसा पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीकडे सोपविण्यात आला. तसेच स्वराज्य टिकवीण्यासाठी गरज पडल्यास आपल्या शरिराचा नैवेद्द्यही दिला जावा हे विचार त्यांच्या मनात रुजविण्यात आले. आणि त्या ज्वलंत विचारांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सत्यात उतरवीले. तब्बल चाळीस दिवस औरंगजेबाच्या क्रुर छळास हिमतीने सामोर जावून स्वराज्यासाठी बलिदान दिले. तेव्हा आपण विरपुत्रांच्या ह्या शौर्यगाथांना आपल्या हृदयाच्या तळापासून स्मरणात असू द्यावे.

     परकियांच्या अत्याचारा विरुद्ध पेटून उठणारे क्रांतिकारी युवक ज्यात अनेकांची नावे आपल्याला ठाऊकही नाहीत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्यांनी स्वत:हून स्वातंत्र्याची खडतर आणि काटेरी वाट निवडली आणि त्या वाटेवर अनवाणी पायांनी अखंड मार्गक्रमण करत राहीले. पराकोटीचा निस्वार्थभाव, डोळ्यातील लखलखते तेज, उच्च स्वाभिमान आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले हृदय ज्यात फक्त स्वतंत्र भारताचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी हसत हसत हौतात्म्य पत्करले. म्हणूनच जे देशासाठी कामी आले त्यांच्या जीवनाचे सोने झाले.

   हे  स्वातंत्र्यरूपी  पंचपक्वान्नाचे ताट  आता आपल्या हाती आहे. ते  सांभाळण्यासाठी आपल्याला योग्य माणूस बनण्याची  गरज आहे. स्वार्थी आणि  भावनाशुन्य असून चालणार नाही. आपल्या आसपास पसरलेली वाईट प्रवृत्ती, स्त्रियांवर होणारे अत्याचार, मुलभूत गरजांचा तुटवडा, जीवघेण्या प्रतिस्पर्धा, गरीब-श्रीमंती मुळे समाजात झालेले विभाजन, बेरोजगारी ह्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करावयाचा असेल तर क्रांतिकारकांच्या शौर्यकथा आपल्या वाचनात आणल्या पाहिजे. ज्यामुळे आपल्या अंगी धैर्य आणि सामर्थ्य येईल. आजच्या तरुण पिढीस जागृत करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी कसून प्रयत्न केले पाहिजे. केवळ गुणवत्ता यादीत येण्यासाठी चढाओढ करण्यापेक्षा व मनात मोठ्या पदाच्या खुर्चीचा मोह बाळगण्यापेक्षा देश सेवेच्या भावनांना आपल्या हृदयाशी कवटाळून आपल्या कारकिर्दीतून व कार्यातून आपल्या देशबांधवांच्या उपयोगी पडण्याचे बीज येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयात रुजवले पाहिजे. 

1. हुतात्म्यांच्या गौरवगाथांचा मुलांवर संस्कार करतांना उल्लेख असावा

   आज आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षण देवून पैसा आणि प्रसिद्धिच्या मागे धावणे शिकवतो. परंतू त्यांनी स्वार्थरहीत जीवन जगावे असे वाटत असल्यास त्यांच्यावर लहानपणापासून योग्य संस्कार झाले पाहिजे. जर आई-वडीलांनी मुलांच्या कोवळ्या वयात स्वातंत्र्यविरांच्या शौर्याच्या गोष्टींचा उल्लेख मुलांशी संवाद साधतांना केला तर त्या मुलांचे विचार सामान्य राहणार नाहीत. त्यात शौर्याची ठिणगी असेल. त्यांचे मन संवेदनशील असेल. त्यांना केवळ आपल्या पुरते जगणे रुचणार नाही. त्यांचे मनही देशासाठी काहितरी करण्यास तळमळेल. आणि अशाप्रकारे एका आदर्श समाजाचा पाया उभारला जाईल.

2.तरुणांमध्ये स्वाभिमान आणि आत्मसन्मान असावा.

  शिक्षण क्षेत्रात अवाजवी प्रतिस्पर्धांमुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य दुर्बल होत चालले आहे. कारण खुद्द शिक्षकच अभ्यासात हुशार असलेल्या आणि हुशार नसलेल्या मुलांची आपसात तुलना करतांना दिसतात. उच्च श्रेणीत पास होणे म्हणजे यश व त्याच्या खाली येणे म्हणजे अपयश हे मुलांच्या डोक्यात भरवीणारे पालकच असतात. त्यामुळे केवळ अभ्यासाच्या क्षमतेवरून मुलांविषयी मत बनवीले जाते. आणि त्यांच्या मधील इतर कलागुणांकडे दुर्लक्ष करण्यात येते. शिक्षकी पेशा सगळ्यात आदर्श मानला जातो. जर शिक्षकांनी त्यांच्या कार्यास उत्पन्नाचे साधन न समजता एक कर्तव्य म्हणून पाहिले तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना वाव मिळेल. ते त्यांच्या विशिष्ट गुणांवर काम करून भविष्यात उंची  गाठतील. त्यांचे स्वत:विषयीचे मत चांगले राहील. आणि त्यामुळे त्यांच्यात स्वाभिमान बघायला मिळेल. तसेच आत्मविश्वासाने ते त्यांचे व्यक्तीमत्व उभारतील.

3. तरुणांमध्ये उद्द्योजक मानसिकता वाढवावी.

  आजची तरुण पिढी उच्च शिक्षण घेवून आणि पदवीधर होवून उत्कृष्ठ नोकर्‍या मिळविण्यासाठी धडपडत आहे. कारण त्यांच्या पुढे जीवनात स्थिरस्थावर होण्याचा तो एकच मार्ग आहे. मुलांची ही मानसिकता घडविण्यास कोठेतरी पालक आणि शिक्षकच जबाबदार आहेत. बहुदा सगळेच पालक मुलांना हाच मार्ग दाखवितात. परंतू  बोटावर मोजण्याइतके पालक मुलांच्या अंगी असलेले कौशल्य बघतात. आणि त्या कौशल्यांना चरितार्थाचे साधन बनविण्याचे बळ आपल्या मुलांना देतात. उद्द्योजक मानसिकतेमुळे स्वतंत्र जीवन जगता येवू शकते. आपल्या कामात सेवाभाव आणून आपण इतरांसाठी आधारस्तंभ बनू शकतो. जेव्हा आपण कोणतेही काम जास्तीत जास्त मिळकतीच्या स्वार्थी हेतूने करतो तेव्हा आपण त्या कामाचे गुलाम होतो. परंतू एखादे काम करतांना आपल्याला आनंद मिळतो कारण त्यामागे सेवाभाव आणि निस्वार्थभाव असतो. अशावेळी आपली मानसिकता एखाद्या उद्द्योजकाप्रमाणे असते.

4.स्त्रियांच्या मान-सन्मानास महत्व असावे.

   आपल्या देशास आपण मातेचा दर्जा दिला आहे. तेव्हा इथे माता-भगिनींचा खास मान ठेवला गेला पाहिजे. स्त्रियांनी प्रत्येक युगात आपली अनोखी छाप सोडली आहे. ज्या काळात जशी गरज पडली त्यांनी आपले स्वरूप बदलवीले आहे. आणि वेळोवेळी अग्निपरीक्षांना सामोरे गेल्या आहेत. रणरागिनी स्त्रिया, समाजसुधारक स्त्रिया, अंतराळ विरांगणा स्त्रिया, सोशल वर्कर स्त्रिया, व्यवसायीक स्त्रिया, पंतप्रधान आणि राष्ट्रपती राहिलेल्या स्त्रिया अशाप्रकारे स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. तेव्हा त्या मानाच्या मानकरी आहेत. त्यांच्या मातृत्वाचा आणि मांगल्याचा नेहमी आदर ठेवला गेला पाहिजे. स्त्रिया वेगवेगळ्या स्वरूपात नेहमी पुरूषांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या असतात. ज्या पुरूषास स्त्रियांच्या वर्तना मागचा शुद्ध हेतू कळतो त्याची निश्चीतपणे प्रगती होते. परंतू जो पुरूष स्त्रियांच्या शुद्ध हेतूस विरोध करतो तो त्याच्या आयुष्यात कोठेही पोहचू शकत नाही. तेव्हा स्त्रिया आनंदी कशा राहतील ह्याचा नेहमी विचार करण्यात आला पाहिजे.

   पारतंत्र्याच्या त्या काळात अनेक तरुण आगीचा लोळ बनून स्वातंत्र्याच्या पवित्र कार्यात सहभागी होत असत.. आणि देशासाठी विरमरण यावे व आपले नाव हुतात्म्यांच्या यादीत यावे ही तीव्र इच्छा मनी बाळगून प्रत्येक घडामोडीत सहभागी होत असत. . कारण गुलामगिरीचे ते जगणे आत्मसन्मानाच्या ठिकर्‍या उडविणारे होते. असे जीवन जगण्यापेक्षा देशासाठी लढून मरणे अनेकांनी पत्करले. आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपल्याला स्वातंत्र्याची सोनेरी सकाळ दाखविणार्‍या हुतात्म्यांच्या गौरवगाथा आपल्या येणार्‍या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता आपली आहे.  

जयहिंद     

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *