मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा

एका मुलीचे मुलगी असणे ही तिच्या वरचीच एक मोठी जबाबदारी आहे. कारण मुलगी ही निसर्गाची अलैकिक देण असते. जिच्यावर सृजनाचे कार्य पार पाडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असते. त्यानंतर बालसंगोपन बालसंस्कार करण्याचा महत्वाचा टप्पा देखील त्यांच्याच जबाबदार हातात असतो. तेव्हा एका मुलीचा जन्म हा अनेक भूमिकांच्या माध्यमातून अनेक उद्देश्य पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. एकप्रकारे परोपकाराचे जगणे त्यांच्या जन्मानेच त्यांना बहाल केलेले असते. म्हणूनच मुलींनी स्वत:ला कधीही एक राजकुमारी समजू नये. तर स्वत:ला एका राणीच्या अभिवृत्तीने बघावे. कारण एक राजकुमारी कायम तिच्या आयुष्यात राजकुमाराच्या येण्याची स्वप्न बघत असते. त्याच्याकडून विविध अपेक्षाही बाळगते. परंतू एक राणी मात्र स्वत: शाषणकर्ती असते. नेतृत्वकर्ती सुद्धा असते. त्याचबरोबर स्वत:वर विश्वास ठेवणारी असते. ती साम्राज्य उभारू शकते. कारण ती सर्वदृष्टीकोनाने कणखर असते. तिच्या शब्दाला व तिच्या निर्णयांना सर्वमान्यता असते. एकंदरीत ती माणूस म्हणून स्वत:मध्येच परिपूर्ण व परिपक्व असते. त्यामुळे तिच्या आयुष्यात येणारा पुरूष हा तिची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यासाठी नाहीतर जिवाभावाच्या मित्राच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने तिला पूरक म्हणून जुळला जातो. जणूकाही एखाद्या कर्तुत्ववान राजाप्रमाणे. तेव्हा मुलींनी आपल्या जन्मताच संयमी असण्याला बौद्धिक चातुर्याची जोड दिली पाहिजे. आपल्या विचारांना व भावनांना मजबूत बनविले पाहिजे. त्यांनी आपले हृदय कोमल बनवू नये तर करुणेने व्यापून टाकावे. आपल्या मनात दयाभाव जागवावा. अशाप्रकारे त्यांनी त्यांच्यातील माणुसकीला समाजासाठी जमेची बाजू बनवावे.

मुलींचे सौंदर्य देखील दोन भागात विभागलेले असते. कोणतीही मुलगी आपल्या अंतर्गत सौंदर्याने समृद्ध असली. म्हणजेच जर ती आपल्या आंतरिक विशेषताप्रती जागृत असली तर तिची आभा आपोआपच तेजस्वी असते. मग तीचे बाह्यरूप देखणे नसले तरी त्याने काहीही फरक पडत नाही. परंतू आजच्या युगात मनाच्या सौंदर्यापेक्षा मुलींच्या बाह्यरूपावरच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. कधीकधी तर त्यांच्या त्याच सुंदरतेच्या आसक्तीमुळे कित्येकांच्या मनातील राक्षसही जागृत होत असतो. ज्यामधून त्या सौंदर्याचा विध्वंस करण्याच्या अमानवीय हेतूने acid attack सारखे माणुसकीला काळीमा फासणारे गुन्हे घडत असतात. जे एका मुलीचे आयुष्य कायमचे उध्वस्त करून टाकतात. त्याशिवाय एखाद्या सौंदर्यवती मुलीस तिची जागा दाखवून देण्याच्या नीच हेतूने विकृत प्रवृत्तीची माणसे त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना बेअब्रू करत असतात. नोकरदार मुलींना तर त्यांच्या बाह्यारूपाकडे आकर्षित होणार्यांपासून नियमितपणे खूप मानसिक त्रास होत असतो. ह्यावरून मुलींच्या सौंदर्याचा सम्मान राखला जात नाही. तर ते कसेही करून आपल्या वर्चस्वाखाली आणून त्याचा उपभोग करण्याचा तुच्छ हेतू मनात बाळगला जातो हे लक्षात येते. अशाप्रकारे मुलींचे शारीरिक सौंदर्य हे तोपर्यंत त्यांच्या करीताच एक मोठी समस्या झालेले असते. जोपर्यंत ते सांभाळण्याकरीता त्यांनी स्वत:ला आपल्या आंतरिक गुणवत्तेने तयार केलेले नसते. तेव्हा प्रत्येक सौंदर्यवती मुलींनी किंबहुना सर्व स्त्रीवर्गानेच स्वत:ला सर्वप्रथम उच्च मूल्यांनी अलंकृत केले पाहिजे. ज्यामुळे त्या स्वत:मध्येच आत्मविश्वासू होत जातील. त्यांना माणूस म्हणून स्वत:ची किंमत कळलेली असेल. त्या मजबूत व्यक्तीगत मूल्यांनी स्वत:च्या चारित्र्याला जपू शकतील. त्या स्वत:चा आदर करतील. त्या स्वत:च्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतील. त्याचप्रमाणे त्या फक्त आपल्या स्वार्थासाठी काहीही झाले तरी आपली अब्रू वेशीवर टांगणार नाहीत. अशाप्रकारे मुलींनी आपल्या शारीरिक सौंदर्याला आंतरिक कणखरपणाची जोड देणे. ही सर्वस्वी त्यांची व्यक्तीगत जबाबदारी समजली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचा आंतरिक चांगुलपणा हा कोणामधीलही राक्षशी प्रवृत्तीवर मात करण्यास प्रभावी ठरलाच पाहिजे. जेणेकरून त्यांचे सौंदर्य त्यांच्याकरीता अभिशाप नाहीतर त्यांची एक सशक्त बाजू ठरेल.

आपण आपल्या शरीरावर वस्त्र परिधान करण्यामागचा हेतू हा सर्वस्वी शरीराचे संरक्षण करण्यासोबतच सभ्यतेकडे निर्देशित होतो. म्हणूनच आपण इतर प्राण्यांप्रमाणे आपसात केवळ लिंगभेदानुसारच वर्तन करत नाही. तर आपल्या जीवनातील विविध नात्यांच्या माध्यमातून त्यापलीकडेही जावून मानवी जीवनास एका उच्च स्तरावर नेवून ठेवतो. ज्यामुळे आपल्याला एकमेकास सन्मानाने व स्वच्छ भावनेने पाहणे सुद्धा शक्य होते. परंतू आजच्या युगात मुलींचे लोकप्रिय शैली अनुसार अंगावर तोकडे कपडे घालून अवाजवी अंगप्रदर्शन करणे. तसेच जागोजागी फाटलेले कपडे अंगावर वापरण्याचे चलनही मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. किंबहुना आताच्या लोकप्रिय शैलीची समज असण्यालाही आताच्या पिढीत अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. तरीही आज समाजात मुलींच्या कपडे निवडण्याच्या आवडीवर विविध नकारात्मक मत मांडली जातात. त्याचप्रमाणे समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या स्वैराचारास देखील मुलींनी घातलेल्या तोकड्या कपड्यांमुळेही अधिक चिथावणी मिळते. असेही मानले जाते. ज्यामुळे मुलींनी अतिशय लहान कपडे घालण्यापासून स्वत:ला थांबविले पाहिजे. असे कित्येकांना मनापासून वाटते. परंतू आज आपल्याला मिळालेल्या व्यक्ती स्वातंत्र्यामुळे असे बंधन कोणावरही जबरदस्तीने लादता येवू शकत नाही. तरीही ह्या विषयावर सखोल दृष्टीकोन टाकला असता समाजात सर्व प्रकारचे लोक वावरत असतात. हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यातील काही मुलींच्या स्वातंत्र्याला सकारात्मकरीत्या दाद देत असतात. तर काही आपल्या नजरेतील विकृतीस त्यांच्या छोटे कपडे घालण्यावरच अधिक बिम्बवीतात. तेव्हा अशा परिस्थितीत मुलींची जबाबदारी ही आहे कि त्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा स्वत:हून ओळखाव्यात. आपल्या कोणत्याही वर्तनाने कोणामधील छुपा राक्षस जागृत होणार नाही. ह्या गोष्टीची दक्षता सुद्धा त्यांनी घ्यावी. कपड्यांची निवड करतांना एकवेळ चलन बाजूला ठेवून वेळ ठिकाण सोबत व प्रसंगाचे भान मात्र नेहमी ठेवावे. संगतीच्या दबावात येवून किंवा केवळ आवड म्हणून मर्यादांचे उल्लंघन कदापि करू नये. तसेच त्यांनी केवळ शरीराच्या मोहात अडकून स्वत:ला सीमित करण्यापेक्षा आपल्या मनाचे सौंदर्य वाढवून माणसाच्या विचारातील विकृतीवर मात करावी. अशाप्रकारे मुलींमधील समंजसपणामुळे समाजाचे संतुलन राखण्यास मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे स्त्रीत्वाच्या पावित्र्याने समाज शुद्धतेकडे वळला जावू शकतो.

समाजात पुरुषप्रधान संस्कृती तसेच पुरूष स्त्रियांपेक्षा सर्वार्थाने वरचढ असा समज कितीही अस्तित्वात असला. तरीही आज स्त्री पुरूष समानतेवर जवळपास सर्वच क्षेत्रात स्त्रियांच्या सामर्थ्याने शिक्कामोर्तब केलेला आहे. निसर्गाने स्त्री पुरूष केवळ असा लिंगभेद करून त्यांना एकमेकांसाठी पूरक बनविले होते. जेणेकरून दोघांमधील विविध क्षमता एकत्र येवून त्यातून अनेक असाध्य गोष्टी साधल्या जाव्यात. परंतू समाजाने मात्र त्यांच्यात सर्व बाबतीत तुलना करून स्त्री पुरूष भेदभावाला आमंत्रण दिले. तरीही आज व्यक्ती स्वातंत्र्यामुळे स्त्रियांनी आपल्या समानतेच्या हक्काला प्राप्त करण्याचा जणूकाही ध्यासच घेतलेला आहे. परंतू भेदभावाचे विचार हे अद्द्यापही मुळाप्रमाणे मनामनात पसरलेले आहेत. त्यांचा समूळ नायनाट झालेला नाही. परिणामस्वरूपी त्यामुळेच मुलींना आपण मुलांच्या तुलनेत शारीरिक दृष्ट्या दुबळे आहोत. अशी अंतर्मनाच्या कोपऱ्यात कोठेतरी अजूनही जाणीव होत असते. म्हणून काही कामे केवळ मुलंच करू शकतात किंवा काही कामे केवळ मुलीच करू शकतात. असे अगदी ठोसपणे ग्राह्य धरले जाते. तेव्हा मुलींची जबाबदारी ही आहे कि त्यांनी आपल्या आंतरिक क्षमतांवरही आपला दृष्टीकटाक्ष टाकावा. कारण त्या प्रसंगाचे भान ठेवून व भावनेच्या माध्यमातून अनेक कठीण कामांनाही यशस्वीरीत्या न्याय देवू शकतात. जशी शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ तसेच मुलींच्या आंतरिक कणखरते व संयमामुळे त्यांच्या नाजूक दिसणाऱ्या शरीरालाही कोणत्याही परिस्थितीत कार्यशील राहण्याचे बळ मिळत असते. किंबहुना एखादे भावनिक कारण तर मुलींच्या कार्यक्षमतेत अधिकच भर घालत असते. तेव्हा मुलींनी स्वत:हून सर्वकाही शिकण्याची तयारी दाखविली पाहिजे. स्वत:ला आपण मुलगी असल्याच्या सीमित विश्वासात समरस करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्यातील असीमित क्षमतेची त्यांना स्वत:ला कल्पना नसल्यामुळे ह्या भेदभावाच्या जाळ्यात त्या स्वत:हून अडकतात. परंतू त्यांनी समाजाने त्यांच्यासाठी विणलेले हे जाळे आपल्या आत्मबळाने नष्ट करून स्वातंत्र्य व समानतेच्या निळ्याशार भव्य आकाशात स्वाभिमानाने विहार केला पाहिजे.

मुलींमधील सात्विकता व मातृत्वाचे गुणविशेष हे कोणातही सकारात्मक परिवर्तन आणण्यास अत्यंत प्रभावी ठरत असतात. त्याचप्रमाणे घराघरातून आईवर वडीलांकडून होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार देखील एक मुलगीच सखोल समजू शकते. कारण मुलगी ही तिच्या जन्माअगोदर होवून गेलेल्या आजी पणजीच्या आयुष्यातील वेदनांचा सार असते. तेव्हा तिचा जन्म हा एका उच्च हेतू पुरस्सर झालेला असतो. जेणेकरून इतिहासाची पुनरावृत्ती होवून जन्मो जन्मीचा प्रवास करून आलेल्या त्या आत्म्यास योग्य धडा व न्याय मिळावा. अशी निसर्गाचीच सदिच्छा असते. अशाप्रकारे कोणतीही मुलगी ही मागे होवून गेलेल्या सर्व पिढ्यातील स्त्रियांसाठी एक आशेचा किरण घेवून जन्मास आलेली असते. म्हणून तिने जागृतीने जीवनाला सामोरे जावून आपल्यावरच्या ह्या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी स्वत:ला सर्वार्थाने तयार केले पाहिजे. व्यर्थ गोष्टींना आपल्या जीवनात थारा न देता आपल्या जन्मास सार्थक केले पाहिजे.

1. समस्त स्त्रीवर्गाप्रती जबाबदारी

स्त्रियांच्या मांगल्याचा व मातृत्वाचा सम्मान हा उघड उघड तसेच एकांतात सुद्धा झालाच पाहिजे. ह्याच हक्क प्राप्तीसाठी स्त्रियांचा लढा आजन्म सुरू असतो. कारण स्त्रिया प्रेमापेक्षा अधिक सम्मानाच्या भुकेल्या असतात. त्याच एका हेतू पुरस्सर त्या जन्मभर आपल्या हृदयाचा कस लावून कर्तुत्वाचा ठसा उमटवत जातात. तरीही त्यांची ती तीव्र इच्छा पूर्ण होईलच ह्याची खात्री नसते. कारण हीच स्त्रीजन्माची आजवरची करूण कहाणी आहे. म्हणूनच स्त्रीजन्म म्हणजे एकप्रकारचा तप असतो. जो त्यांनाच आतून बळकट व तेजस्वी बनवीत जातो. तेव्हा ह्या जगात मुलगी म्हणून जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस आपल्या जन्मामागचा गहिरा अर्थ कळलाच पाहिजे. जेणेकरून समस्त स्त्रीवर्गाची आपल्या सन्मानासाठीची धगधगती मशाल अशीच निरंतर कर्तुत्ववान व स्वाभिमानी मुलींच्या हातात सुरक्षित रहावी. अशाप्रकारे मुलीचा जन्म हा एकप्रकारे जबाबदारीचा डोंगर असतो. त्याला पार केल्यावरच त्यांची थोरवी गाईली जाते.

2. समाजाप्रती जबाबदारी

आज समाजाची अवस्था दुषित विचारांच्या व विकृत नजरांच्या साम्राज्यामुळे अतिशय खराब झालेली आहे. नियमितपणे मुलींच्या बाबतीत कानावर पडणाऱ्या त्यांच्यावरच्या दुष्कृत्यांच्या घटना आपले जगणे नकोसे करत असतात. कारण जी आपल्याकरीता फक्त एक बातमी असते. ते लाजिरवाणे कृत्य कोणा एका कोवळ्या मुलीने प्रत्यक्षात सहन केलेले असते. तीच्या घरच्यांनी तिच्या वेदना स्वत: अनुभवलेल्या असतात. आपण मात्र एक बातमी म्हणून त्या घटनेस वाचतो किंवा पाहतो. त्यामुळे काही क्षण आपल्या हृदयाचा ठोकाही चुकतो. त्या मुलीसाठी आपण हळहळतो. त्यानंतर आपल्या जगात पुन्हा व्यस्त होतो. कारण देवाच्या कृपेने ती घटना आपल्याशी संबंधीत नाही ह्या विचारानेच आपल्या मनाला शिथिलता मिळते. अशाप्रकारे दुर्दैवाने ती वेळ चुकूनही आपल्यावर जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत आपण त्यातून कोणताही धडा घेत नाही. म्हणून आज मुलींचे आयुष्य समाजानेच दुर्भर केलेले आहे. तेव्हा आता त्यासाठी प्रत्येक मुलीने स्वत:लाच तयार केले पाहिजे. त्यांनी स्वत:च्या बचावाकरीता शक्ती पेक्षा युक्तीचा वापर अधिक केला पाहिजे. आपल्या अंतर्मनातील विशेशतान्ना उजागर केले पाहिजे. स्वत:ला उच्च मूल्यांनी समृद्ध केले पाहिजे. आपल्या कोणत्याही कृत्याने अशा विकृत मानसिकतेला आणखीच खतपाणी मिळणार नाही. ह्या गोष्टीची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वत:च्या संरक्षणास स्वत:लाच एका योद्ध्याच्या स्वरूपात आपल्या पातळीवर तयार केले पाहिजे. अशाप्रकारे मुलींच्या जबाबदारीपूर्ण वर्तनाने राक्षशी प्रवृत्तीला काहीप्रमाणात आळा बसू शकतो.

3. स्वत:प्रती जबाबदारी

मुलगी आपल्याबरोबर स्त्रीत्वाची पवित्र व सर्वशक्तीमान उर्जा घेवून जगत असते. ह्याची जाणीव तिला असो किंवा नसो परंतू हे शाश्वत सत्य आहे. तेव्हा मुलींनी आपल्या आयुष्यात अंतर्मनाचा प्रवास करण्यापासून स्वत:ला कधीही थांबवू नये. कारण त्यांचे शारीरिक सौंदर्य व रूप हे नश्वर आहे. ते वयानुसार रोगामुळे किंवा आणखी कशामुळे ढळत जाणे निश्चित आहे. परंतू त्यांनी जर आपल्या आंतरिक विशेषतांवर काम केले तर त्यांची सौंदर्याची परिभाषा ही सीमित राहणार नाही. त्या आत्मप्रेमाने व्यापून जातील. अशाप्रकारे स्वत:वर वीणाअट प्रेम करणारी मुलगी ही आपल्या आसपास सदैव सकारात्मक उर्जा प्रसारित करत राहील. ज्यामुळे घरादाराला तसेच नियमितपणे त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांना नवचैतन्याची उभारी मिळेल. तेव्हा मुलींची स्वत:प्रती ही जबाबदारी आहे कि त्यांनी आपल्या शरीराची काळजी नक्की घ्यावी. त्याला शुद्ध हेतूने सजवावे. परंतू कधीही आपल्या शरीराच्या माध्यमातून स्वत:ला आकर्षणाचा भाग बनवू नये. तर स्वत:ची किंमत करून, स्वत:ला स्वाभिमानाच्या अलंकाराने सजवून तसेच मिळालेल्या स्वातंत्र्याचा शुद्ध अर्थ लावून स्वत:ला सम्मानास पात्र बनवावे. जेणेकरून राक्षशी प्रवृत्तींची त्यांना अशुद्ध करण्याची सहजा सहजी हिम्मत होणार नाही.

4. स्वातंत्र्याच्या जगण्याप्रती जबाबदारी

आज व्यक्ती स्वातंत्र्यामुळे स्त्रियांचे जीवन मर्यादित राहिलेले नाही. तर त्याचा उंबरठ्या बाहेरच्या जगातही मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. ज्यामुळे समाजात महत्वाकांक्षी स्त्रियांची भर पडली. ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. परंतू त्या महत्त्वाकांक्षेने स्त्रियांना कदापि स्वार्थी बनवू नये. तसेच त्यांच्या मनात पुरुषांसाठी स्पर्धाही निर्माण होवू नये. अन्यथा अहंकाराने त्या आपल्या विनम्रतेस गमावून बसतील. जी त्यांची खरी ओळख आहे. तेव्हा मुलींची ही जबाबदारी आहे कि त्यांनी स्पर्धा व अहंकाराला आपल्या प्रगतीचे कारण बनवू नये. त्यासाठी इतरांना आपल्यापेक्षा कमी सुद्धा लेखू नये. तर त्यांची प्रगती ही सर्वसमावेशक असावी. त्यांनी आपल्या आसपासच्या लोकांनाही प्रगती करण्यास प्रोत्साहित करावे. त्याचप्रमाणे आपल्या पद व रुतब्याने इतरांवर नकारात्मकरीत्या वर्चस्व गाजवू नये. तर त्या माध्यमातून सर्वांच्या फायद्याचे नियम प्रस्थापित करावेत . जे इतरांच्याही स्वातंत्र्यावर बंधन आणणार नाहीत.

अशाप्रकारे मुलींनी आपल्या असण्याची आपल्या जगण्याची तसेच आपल्या मुलगी म्हणून जन्म घेण्याची जबाबदारी ओळखली. तर त्या इतरांसाठी एक आशेचा किरण नक्कीच बनू शकतील. कारण आता जग त्यांच्यासाठी सुरक्षित राहिलेले नाही. तरीही त्यांच्या पंखांना उडण्याची भाषा कळलेली असल्यामुळे त्यांचे थांबणे आता केवळ अशक्य आहे. अशावेळी स्वत:ची जबाबदारी स्वत:वरच घेवून त्या आपला मार्ग निश्चित करू शकतात. आपल्या निवडलेल्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासोबतच त्यांनी स्वत:ला अगदी गर्वाने एक मुलगी म्हणूनही सिद्ध केले पाहिजे. जेणेकरून त्यांच्या सम्मानात तिळमात्रही कमतरता येणार नाही. कारण मुलींची आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याकरीता तळागळापर्यंत झालेली घसरण. ही त्यांच्या आपल्या अद्भूत जन्माप्रती अजागरूक व अज्ञानी असण्याची खुण असते. परंतू आपल्या अंतरआत्म्याच्या सम्मानासाठी त्यांनी आयुष्यात प्रत्यक्षात केलेला आत्मसम्मानाचा प्रवास हा त्यांच्या स्वत:प्रती जबाबदारी व इतरांसाठी आशेचा किरण असण्याचे प्रतिक ठरत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *