आई बाबा

आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. त्यामागचे कारण हे असते कि त्यांचे मुलांवर विनाअट प्रेम असते. आणि मुलांना हे प्रेम त्यांच्या व्यतीरीक्त आणखी कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांचे सगळे लाड-कौतुक पुरवीतात आणि त्यांना सर्वकाही पूरे पडावे ह्याकरीता रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्या विषयी आदर आणि विश्वास निर्माण होतो. त्या कारणाने मुलांना पालकांच्या सर्व गोष्टी योग्यच वाटतात आणि ते त्यांच्या आज्ञेत राहतात.

  हळूहळू मुलं मोठी आणि जाणती होतात. तेव्हा त्यांना पालकांच्या बर्‍याचशा गोष्टींचा उलगडा होतो तसेच ते जेव्हा त्यांना एक माणूस म्हणून बघू लागतात तेव्हा त्यांच्यातील बर्‍याच गोष्टी मुलांना खटकूही लागतात. परंतू पालकांना नाकारण्याची हिंमत मुलांच्यात नसते त्यामुळे मुलांच्याही अंगी हळूहळू पालकांचे गुण भिणू लागतात. अशाप्रकारे पालकांनी मुलांच्या मनावर बिंबवीलेल्या प्रत्येक गोष्टी आपोआपच पुढच्या पिढिकडे जातात आणी अशाप्रकारे त्या घराण्याची विशिष्ट ओळख निर्माण होते.

    एका सर्वसामान्य कुटूंबाचे उदाहरण घेतल्यास त्यांची एक चाकोरीबद्ध जीवनशैली असते. तेव्हा बर्‍याचदा ते आयुष्यात विनाकारण येणार्‍या संघर्षांपासून स्वत:ला लांब ठेवतात. त्यामुळे आरामस्थितीचे क्षेत्र सोडून काहीही  करण्याचे सामर्थ्य आणि इच्छा हे दोन्हिही त्यांच्यात नसतात. परंतू  कुटूंबाला सामान्य जीवनशैलीपेक्षा उच्च स्तरीय जीवन द्यावयाचे असेल तर आरामस्थितीचे क्षेत्र पार करणे अनिवार्य असते. अशावेळी आई बाबा कुटूंबातील सदस्यांच्या इच्छा आकांक्षांना सिमीत करण्याचा प्रयत्न करतात कारण तो मार्ग त्यांना जास्त योग्य वाटतो. आपल्या नशीबाला दोष देवून चादर पाहून पाय पसरण्याचे सल्ले ते मुलांनाही देतात. परंतू चादर मोठी करण्यासाठी स्वत:च्या दिनचर्येत जराही बदल आणण्याची त्यांची मानसिकता नसते.

  ते त्यांची ठराविक वेळेतील नोकरी करून सायंकाळी घरी येवून त्यांना खुप थकवा आल्याप्रमाणे दर्शवीतात. त्याचबरोबर थकवा घालविण्यासाठी आरामात लेटून टिव्ही बघणे किंवा फोन हातात घेवून बसणे हे त्यांचे संध्याकाळचे ठरलेले वेळापत्रक असते. त्यात त्यांना कसलाही आणि कोणाचाही हस्तक्षेप नको असतो. मुलांची विचारपूस करणे तसेच जोडीदाराशी महत्वाच्या चर्चा करण्याची त्यांना तितकीशी गरज वाटत नाही. तसेच घरच्यांशी बोलतांना सुद्धा त्यांचे इतर गोष्टींमध्ये लक्ष विभागलेले असते. कुटूंबियांच्या गरजा भागवीण्यासाठी त्यांना कसे कष्ट सोसावे लागतात ह्या गोष्टीची वाच्यता कायम त्यांच्या बोलण्यातून जाणवते. त्याचप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी बजेट च्या मर्यादा लावत असल्यामुळे मुलांनाही आपले मन मारून रहावे लागते.

    अशा पालकांच्या त्यांच्या मुलांकडून मात्र अवाजवी अपेक्षा असतात. त्या ठेवतांना ते मुलांच्या क्षमतांचाही विचार करत नाहीत. त्यांच्या अपेक्षे प्रमाणे मुलांनी गुण नाही पटकाविले किंवा शेजारच्या मुलाच्या तुलनेत कमी पडल्यास त्यांच्यातील शर्यत लावणारा पालक बाहेर येतो आणि आपल्याच मुलांना घालून पाडून बोलतो. ज्यामुळे मुलांच्या आत्मविश्वासावर त्याचा कायमस्वरूपी दुष्परीणाम होतो. 

  पालकांनी आपल्या मुलांना आपल्या आयुष्यात विशेष प्राथमिकता देवून त्यांचे आयुष्य उत्तमरीतीने घडविण्यासाठी आपल्या आरामस्थितीचा त्याग केला पाहिजे.  तसेच आर्थिक परिस्थितीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा आपले उत्पन्न वाढविण्यासाठीही जास्त मेहनत घेतली पाहिजे. कारण त्या मुलांना जगात आणण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असतो तेव्हा त्यांना काहिही कमी पडू नये ह्या गोष्टीची जबाबदारीही त्यांनी आनंदाने स्विकारली पाहिजे.  तसेच आपल्या मुलांना शहरातील नामांकीत संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला पाहिजे. किंवा इतरही त्यांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी पालकांनी सामान्य दिनचर्येचा त्याग करून स्वत:मध्ये आणखी कौशल्य अवगत करून उत्पन्नात भर घालण्याचे स्वत:शी ठाणले पाहिजे. मुलांकडून अपेक्षा करण्याअगोदर पालकांनी स्वत: त्यांच्या प्रती कर्तव्ये निभवली पाहिजे. तरच मुलांच्या मनात पालकांसाठी आणखीच आदर वाढतो. जे पालक भावनिक कारण समोर ठेवून स्वत:मध्ये सर्वतोपरी बदल आणतात आणि प्रगती करतात ते मुलांना आदर्श पालक वाटतात.

  मुलांच्या गुणपत्रिका पाहून पालक मुलांवर प्रश्नांचा भडिमार करतात. कारण मुलांनी जास्तीत जास्त गुण मिळवावे तसेच नेहमी उच्च श्रेणीत यावे हीच त्यांची इच्छा असते. जेव्हा मुलं त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यात कमी पडतात तेव्हा पालक त्यांचा अपमान  करतात आणि त्यांच्यावर मानसिक दडपण आणतात. परंतू त्याक्षणी जर पालकांनी सौजन्याने विचारपूर्वक मुलांशी संवाद साधला तर मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होईल आणि ते आणखी उत्तम करण्याचा ध्यास घेतील. त्याचप्रमाणे मुलांनी आजचा दिवस कसा घालविला ह्याकडे पालकांचे विशेष लक्ष असले पाहिजे. जर मुलांनी दिवसभरात कोणाची मदत केली असल्यास पालकांनी त्यांची भरभरून स्तुती करावी. जर त्यांनी वर्गात उभे राहून शिक्षकांना प्रश्न विचारण्याची हिंमत केली असल्यास त्यांची पाठ थोपटावी. मुलांनी  स्वत:वर गर्व वाटेल असे एकही काम दिवसभरात केले असल्यास त्यांना मायेने जवळ घेवून त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक करावे. अशाप्रकारे जेव्हा पालकांचे मुलांविषयी पडणारे प्रश्न बदलतात तसेच दृष्टीकोन बदलतो तेव्हा तेव्हा ते मुलांसाठी आदर्श पालक ठरतात.

  त्याचप्रमाणे घर हे आईचे हक्काचे क्षेत्र असते आणि मुलं आई बरोबर जास्त वेळ घालवितात. तेव्हा मुलांविषयीचे लहान मोठे निर्णय घेण्याचे अधिकार सर्वप्रथम आईच्या हाती असले पाहिजे. यदाकदाचीत आईचा एखादा निर्णय चुकलाही असल्यास तरिही मुलांसमोर वडीलांनी त्यास तुच्छ ठरवू नये. कारण त्यामुळे आईच्या निर्णयाचा आणि तिच्या क्षेत्राचा मुलांपुढे मान राखल्या जातो. त्यानंतर पालकांनी एकत्र येवून त्या गोष्टीवर तोडगा काढावा. अशाप्रकारे घरात स्त्रियांचे स्थान किती महत्वाचे असते आणी पालकांचे आपसातील आदरयुक्त व मैत्रीपुर्ण नाते ह्या दोन महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकल्या जातो. हेच संस्कार पुढे मुलं त्यांच्या आयुष्यात अंमलात आणतात. पालकांचे हे वर्तन मुलांसाठी आदर्श ठरते.

  मुलांना ह्या जगात आणून आणि त्यांचे पालन पोषण करून पालकांचे कर्तव्य संपत नाही. तर मुलांनी योग्य माणूस बनून उत्कृष्ठ समाज घडविण्यास मदत करावी असे जर पालकांना वाटत असेल तर पालकांनीही मुलांपुढे  आपल्या कर्तुत्वाने एक आदर्श निर्माण केला पाहिजे. त्यांना स्वत:ला सर्वप्रथम आपण समाजाचे व देशाचे देणेकरी आहोत ह्याची जाणीव झाली पाहिजे. अन्यथा एक भावनाशुन्य आणि प्रतिस्पर्धांचा भाग असलेला समाज घडविण्यास बेजबाबदार पालकच कारणिभूत ठरतील.

  घर हे मुलांसाठी जीवनाचे धडे देणारी एक शाळाच असते आणि शिक्षक असतात आई आणि बाबा. तेव्हा पालकांनी स्वत:च्या वर्तनाप्रती कायमच जागृक असले पाहिजे. आदर्श पालक बनण्यासाठी जे जे बदल स्वत:मध्ये करणे अनिवार्य आहेत ते आपणहून त्यांनी केले पाहिजे. मुलांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी पालकांनी त्यांना नेहमीच आदरयुक्त वागणूक दिली पाहिजे. सर्वप्रथम मुलांचे स्वत:विषयी असलेले मत सुधारेल तेव्हाच समाजात नेतृत्व करणारे युवक बाहेर येतील. पालकांच्या हातून घडलेल्या दुर्लक्षीत चुकांचे दुष्परीणाम मुलांना आणि मुलांच्याही मुलांना सहन करावे लागतात. तेव्हा पालकांनी स्वत:वर काम करणे अत्यंत गरजेचे आहे.               

1. मुलांवर सिमीत जीवनशैली जगण्यास दबाव टाकत नाहीत

    मुलं लहान असतांना त्यांच्या मनात अनेक इच्छा जागृत होतात. त्यांच्या मित्राकडे असलेल्या सर्व गोष्टी त्यांना हव्या हव्याशा वाटतात. त्या घेण्याची पालकांची क्षमता नसली तरिही मुलांना काहीही फरक पडत नाही. ते पालकांकडे हट्ट करतात. एकीकडे पालक त्यांच्या सर्वसाधारण जीवनशैलीत तग धरून असतात आणि आरामस्थितीत राहून जीवन जगत असतात. तसेच त्यांना त्यात काहीही  बदल करावासाही वाट्त नाही. तर दुसरीकडे  मुलांना मन मारून व असुवीधांमध्ये जगावे लागते. मुलांच्या इच्छांना पालक त्यांच्या तोकड्या उत्पन्नात सिमीत करण्याचा प्रयत्न करतात. परंतू त्यांच्या इच्छा आकांक्षांना आपल्या प्रगतीचे कारण बनवत नाहीत. ज्या मुलांना त्यांनी जगात आणले त्यांना सर्वोत्कृष्ठ जीवन देण्यासाठी स्वत:च्या रिकाम्या वेळेस उत्पादनक्षम बनवून उत्पन्नात वाढ करणे त्यांना अशक्य होवून बसते.

   आदर्श पालक ते असतात जे स्वत:च्या जीवनात महत्वाकांक्षी असतात. त्यांच्या जीवनास व्यर्थ जावू देत नाहीत. ध्येय गाठणे आणि पुन्हा नवे ध्येय ठरवीणे हे त्यांचे आवडते काम असते. आपल्या मुलांच्या इच्छा आकांक्षांना सिमीत करत नाहीत तर त्यांना पुर्ण करण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घेतात. आणि मुलंही आवडीने अशा पालकांचे अनुकरण करतात.

2. आई – वडील एकमेकांच्या क्षेत्राचा मान राखतात.

    जेव्हा आई आणि वडील दोघेही एकमेकांच्या क्षेत्राचा मान राखतात तेव्हा घराचे संतुलन बिघडत नाही. आणि घरात एक आदर्श वातावरण निर्माण होते. आईला मुलांविषयी बारीक सारीक गोष्टी ठाऊक असतात. ज्या वडीलांना माहित नसतात. जेव्हा आई मुलांना त्यांच्या कडून झालेल्या चुकांवरून रागवीते अशावेळी मुलं वडीलांचा आधार घेतात. वडीलांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया देण्या पूर्वी आईशी चर्चा करून संपुर्ण वृत्तांत जाणून घेतला पाहिजे. त्याचबरोबर हे आईचे क्षेत्र आहे तेव्हा आई जे म्हणेल त्याचा मुलांनी मान राखावा आणि तिने घेतलेला निर्णय योग्यच असणार हे वडीलांनी मुलांना पटवून द्यावे. ह्यातून मुलांना घरातील आईचे क्षेत्र आणि त्याचे महत्व कळते.

   पालकांनी त्यांच्या आपसातील नात्यातून पुढच्या पिढीस समंजसपणाचे धडे द्यावे. जेणेकरून पुढे ते स्त्रियांचा आदर करतील. आणि त्यांना घरातील स्त्रियांचे महत्व कळेल. अशाप्रकारे घराला परिपुर्ण स्वरूप देण्याचे आदर्श काम पालकांनीच करावे.

3.मुलांना इतर मुलांची उदाहरणे देत नाहीत

  पालक त्यांच्या आयुष्यात जे मिळवू शकले नाही. त्या सर्व गोष्टींची अपेक्षा ते आपल्या मुलांकडून करतात. किंवा ते स्वत:च प्रतिस्पर्धांचा भाग बनलेले असतात आणि त्याचे ओझे मुलांच्या कोवळ्या मनावर टाकतात. अशावेळी इतर मुलांची उदाहरणे देवून मुलांना प्रतिस्पर्धांमध्ये टिकून राहण्यास भरीस पाडतात. कारण मुलांनी बाजी मारल्यास पालकांना समाजात मान उंच करून मिरवता येते हा देखील त्या  मागचा हेतू असतो. मुलं पालकांच्या शब्दास नाकारू शकत नाहीत आणि क्षमता नसतांनाही प्रतिस्पर्धांमध्ये उतरतात. अशावेळी मुलं न दिसणार्‍या ताण तणावास आयुष्यात आमंत्रण देतात. जो त्यांच्या आरोग्यावर दुष्परीणाम तर करतोच त्याचबरोबर त्यांच्यातील लहान मुलास संपवून टाकतो.

   पालकांनी घरात मुलांना खेळीमेळीचे वातावरण द्यावे. ज्यात मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. आणि त्या दरम्यान त्यांचा कशात रस आहे हे अलगद जाणून घ्यावे. तसेच त्या दिशेने वाटचाल करण्यास मुलांची मदत करावी. अशाप्रकारे मुलांच्या संमतीने आणि कोणत्याही जीवघेण्या प्रतिस्पर्धांच्या ताणा शिवाय मुलांचे भवितव्य घडत जाते आणि असे पालक मुलांसाठी आदर्श पालक ठरतात.

4. घरात प्रेमळ पालकांची भुमिका निभावतात.

  पालकांनी त्यांच्या कर्तुत्वाने बाहेरच्या जगात कितीही प्रसिद्धी मिळवली असली किंवा यश संपादन केले असले तरिही त्यामुळे घरात मुलांना त्यांचा दरारा वाटू नये. किंवा त्यांच्या यशाच्या तुलनेत आपण कमी पडतोय ही भावना मुलांच्या मनात जन्म घेवू नये. ह्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. ते पालक असले तरिही त्यांच्याकडूनही एक माणूस म्हणून चुका होण्याची शक्यता असते. तेव्हा त्यांनी त्या मोठ्या मनाने मान्य करून त्या विषयी दिलगिरी व्यक्त करावी. मुलांना काही कारणांनी अपयशाचा सामना करावा लागल्यास त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन मोकळे करावेआणि त्यांच्यावर विश्वास दाखवावा. आपल्या मुलांच्या इच्छा पुर्ण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आणि त्यासाठी आपण सक्षम आहोत ह्यासाठी पालकांनी कृतज्ञ असावे.

  पालकांनी स्वत:मधील लहान मुलास जागृत ठेवल्यास ते त्यांच्या मुलांना आणखी जास्त समजू शकतील. परंतू तेच जर बालीशपणे वागले तर मुलांपुढे कोणताही आदर्श निर्माण करू शकणार नाहीत. असे पालक मुलं आणि त्यांच्यात फक्त तणावपुर्ण वातावरण निर्माण करू शकतात.

   जे पालक आपल्या कुटूंबाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतात. ज्यांना मुलांच्या भावनांची भाषा जास्त कळते. जे जबाबदार्‍यांना ओझे समजत नाहीत. जे कुटूंबाच्या आवश्यकतेनुसार स्वत:मधे बदल आणण्यास तयार असतात. जे आयुष्यात स्वत:ला सिद्ध करून चार भिंतींना घराचे स्वरूप देतात. जे कुटूंबियांसमोर कायम विनम्र असतात. मुलांना आयुष्यात सक्षम बनविने हे आपले प्राथमिक कर्तव्य समजतात. वेळ पडल्यास स्वत:कडे कमीपणा घेतात. जे मुलांचे बालपण जपतात. आणि मुलांच्या तारुण्यात त्यांचे मित्र बनतात. त्यांचे हात मुलांवर उगारण्यासाठी नाहीतर त्यांना आशिर्वाद देण्यासाठी उठतात. ते मुलांसाठी आदर्श पालक असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *