
आपल्या संस्कृतीत स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. कारण निसर्गाने स्त्रियांना जे वात्सल्य, मातृत्व तसेच मांगल्याचं लेणं बहाल केलेलं आहे ते अतुलनीय आहे. ह्या देणग्या त्यांना आणखीच श्रेष्ठ बनवीतात. स्त्रिया त्यांच्या मायेने चार भिंतींना घराचे स्वरूप देतात. तसेच घरात हसतमुखाने वावरणार्या स्त्रिया त्या घरासाठी प्रगतीचे द्वार उघडतात. एक सुसंस्कृत स्त्रि संपुर्ण घराला सुसंस्कृत बनवीते. स्त्रिचे पावीत्र्य, तिची सात्वीकता, तिचे सद्वीचार आणि तिचे संस्कार तिच्यातील अनमोल अलंकार असतात. हे अनमोल अलंकार स्वत:च्या अंतर्मनात ल्यालेली स्त्रि लक्ष्मी प्रमाणे भासते.
स्त्रिच्या पावित्र्यापुढे कोणतीही वाईट प्रवृत्ती टिकाव धरू शकत नाही. जेव्हा तिच्या सहनशिलतेची परिसीमा होते. तेव्हा स्त्रि शक्तीचे रूप धारण करते. परंतू तिच्या इतके साधे सरळही कोणी नाही.त्यामुळे स्त्रि सामंजस्याचे मुर्तीमंत उदाहरण देखील आहे. तरीही ती मनाने खंबीर आणि कणखर असते. कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगी स्त्रिया न डगमगता ठोस पावले उचलतात. त्यामुळे स्त्रि गृहिणी असो अथवा नोकरदार, व्यवसाय करणारी असो अथवा अंतराळ विरांगणा घराला तिचा कायम भक्कम आधारच वाटत असतो. त्यांच्याशिवाय घराला काडीमात्रही अर्थ उरत नाही. अशा ह्या कणखर स्त्रिया घराला त्यांचे आर्थिक योगदान लाभावे म्हणून घरातील जबाबदार्या सांभाळत त्याचप्रमाणे त्यांची होणारी शारिरीक दमछाक ह्याला न जुमानता दुहेरी आघाड्या पेलतांना दिसतात. जवळपास सर्वच क्षेत्रात त्यांचे कौशल्य बघावयास मिळते. मजूरी करून घराचा आधार बनणार्या स्त्रि पासून ते अंतराळात पाऊल ठेवण्यापर्यंत सर्वत्र स्त्रियांचे आज वर्चस्व आहे.
अशाप्रकारे आजच्या युगातील स्त्रिया सर्वार्थाने कुटूंबाचा आधार बनल्या आहेत. आपल्या आसपास अशी उदाहरणे सापडतील जिथे आई-वडीलांच्या माघारी घरातील मोठ्या मुलीने आपल्या लहान भावंडांचा सांभाळ केला. त्यासाठी तिने आपल्या सर्व व्यक्तीगत स्वप्नांचा त्याग करून त्वरीत आपल्या पायावर उभे राहणे पत्करले. पूर्वी पालक मुलींना एक मोठी जबाबदारी म्हणून मोठे करत असत. तसेच ती मोठी होवून लग्नायोग्य झाली कि तिचे लग्न लावून आपल्या अंगावरची जबाबदारी तिच्या पतीच्या अंगावर टाकून मोकळे होत असत. परंतू आता मुला-मुलीत भेद केल्या जात नाही. मुलींनाही मुलांप्रमाणे सर्व गोष्टीत तरबेज करण्यात येते. विदेशात जावून शिक्षण घेण्याचे धाडसही आजच्या मुली करतांना दिसतात. त्यामुळे स्त्रिया दिवसेंदिवस सक्षम आणि आत्मविश्वासू होत चालल्या आहेत. त्यांचे विश्व आता चार भिंतींच्या आत सिमीत राहिलेले नाही.
ज्यांनी एका स्त्रिला आई म्हणून समजून घेतले ते राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे अजरामर उदाहरण आहे. ज्यांनी स्त्रिला एका बहिणीच्या रूपात समजून घेतले ते मुक्ताई आणि ज्ञानेश्वर माऊली चे उदाहरण आहे. ज्यांना एक स्त्रि मैत्रीण म्हणून कळली ते श्रीकृष्ण आणि राधा ह्यांचे उदाहरण आहे. आणि ज्यांनी स्त्रिला पत्नीच्या रूपात जाणले ते राम आणि सिता ह्यांचे उदाहरण आहे. अशाप्रकारे पुरातन काळापासून प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रिचे भक्कम योगदान असल्याचे बघण्यात येते. त्याचप्रमाणे स्त्रि-पुरूष हे संसाराची दोन चाके असतात. ही दोनही चाके सक्षम असली कि संसाराचा गाडा सहजपणे चालतो. परंतू कधी कधी जीवनात आणिबाणीची स्थिती निर्माण होते. अशावेळी एक चाक सक्षमपणे उभे राहीले कि दुसर्याला सावरण्यास वेळ मिळतो. अशाप्रकारे ते दोघे मिळून त्यांच्या संसाराची घडी विस्कटू देत नाही.
तेव्हा घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान ही आजच्या काळाची गरज समजली पाहिजे. कारण आजची वाढती महागाई बघता घरात कमविणारे हात आणि स्त्रोत एकापेक्षा जास्त असले पाहिजे. तरच आपण उत्तम रितीने जीवन व्यापन करू शकतो. तसेच आपली जीवनशैली उंचावू शकतो. स्त्रिया काही कलागुणांमध्ये निपुण असतात किंवा त्यांच्यात एखाद्या व्यवसायाचे कौशल्य असते. तसेच त्यांच्याकडे शिक्षणाचा आधारही असतो. ज्या माध्यमातून त्या घरात मिळकत आणण्याचा विचार करू शकतात. त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया गृहिणी आहेत त्यांच्याकडेही पुरेसा रिकामा वेळ असतो. त्या आपल्या वेळेला विविध मार्गाने निर्मीतीक्षम बनवू शकतात. एकंदरीत स्त्रियांचा घरासाठी आर्थिक योगदानाचा निर्णय कुटूंबासाठी मोठा आधार ठरू शकतो. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी स्वाभिमानाने जगण्याचे साधनही.
1. स्त्रियांचा आत्मसन्मान जपला जाईल.
जेव्हा स्त्रिया घरात आपले आर्थिक योगदान देतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास द्वीगुणीत होतो. कारण त्या आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झालेल्या असतात. त्यांच्या विचारांना स्वातंत्र्य लाभते. जेव्हा त्या स्वकमाईने कुटूंबास आधार देतात तेव्हा त्या स्वत:च्याच नजरेत उंच होतात. स्त्रिया ह्या मुळात स्वाभिमानी असतात. परंतू कमवीण्यासाठी काहीही न करणे त्यांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण करते. अशावेळी कोणीही आपला अपमान करू नये. म्हणून त्या घरातील कामात जास्तीत जास्त मेहनत घेतात. जेणेकरून ह्या ना त्या मार्गाने त्यांना कुटूंबाचा आधार बनता यावे. तेव्हा प्रत्येक स्त्रि ने स्वत:च्या आत्मसम्माना खातर शक्य असल्यास घराला आर्थिक योगदान देण्यासाठी स्वमिळकतीचा विचार करावा. तसेच आपल्या स्वाभिमानाला जपावे.
2. कुटूंबाची सुरक्षा वाढेल
घरात एकच कमवीणारी व्यक्ती असल्यास संपुर्ण कुटूंबाच्या पालनपोषणाचा भार सर्वस्वी त्या व्यक्तीवरच असतो. अशावेळी बर्याचदा कुटूंबास तडजोड करावी लागते. अथवा कुटूंबाच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी कमविणार्या व्यक्तीस क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. कुटूंबाच्या जबाबदार्या पार पाडत असतांना त्या व्यक्तीचे त्याच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. ज्यामुळे त्याच्या स्वास्थ्यसंबंधीत तक्रारी सुरू होतात. जर घरात दोन ऐवजी चार हात कमविणारे असतील तर कोणा एकावर अवाजवी भार येत नाही. तसेच घरात येणारी मिळकतही जास्त राहते. किंवा कधी काही कारणांनी एक कामावर जावू शकला नाही तरीही घरात मिळकत येणे थांबणार नाही आणि कुटूंब सुरक्षीत राहील.
3. कुटूंब सौख्य वाढेल.
पैस्याने सुख विकत घेता येत नाही. परंतू तरीही आपल्या जीवलगांचे मन राखायचे असल्यास त्यासाठी पैसे खर्च करणे हे अत्यंत प्रभावी माध्यम असते. कारण एक छोटीशी भेटवस्तू त्या सोनेरी क्षणांना आणखीच बहारदार आणि यादगार बनवीते. जेव्हा स्त्रियांना त्यांच्या विशेष दिवसावर भेटवस्तू मिळतात तेव्हा त्यांच्याही मनात आपल्या प्रिय माणसास आश्चर्यभेट देण्याची इच्छा निर्माण होते. परंतू त्यांची स्वत:ची मिळकत नसल्यामुळे त्यांना मन मारून जगावे लागते. कधी कधी त्यांच्या मनात आपल्या आई-वडीलांसाठी काही करण्याचे मनात असले तरी त्यांना विचार करावा लागतो. अशावेळी त्यांच्या स्वाभिमानास धक्का पोहोचतो. जर स्त्रिया आर्थिकदृष्टीने सबळ असतील. तर त्यांना पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य राहील. तसेच त्यांच्या आर्थिक योगदानामुळे कौटुंबिक वातावरणही आनंदी राहील.
4. समाजात स्वाभिमानी स्त्रियांची भर पडेल.
जेव्हा स्त्रिया घरात आर्थिक योगदान देतात तेव्हा त्यांचा स्वाभिमान उंचावलेला असतो. त्यांना आपल्या कुटूंबाची आर्थिक अवस्था ठाऊक असते. त्यानुसार किती बचत करणे गरजेचे आहे आणि कोठे खर्च करावा ह्याची त्यांना स्पष्टता असते. त्यामुळे एकंदरीत घरातील आर्थिक विभाग स्त्रियांच्या हाती असल्याने घरात लक्ष्मी नांदते. हा लक्ष्मीचा वारसा एक स्त्रि तिच्या नंतर येणार्या लेकी-सुनांना देते. तसेच त्यांनाही कुटूंबाची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम होण्यास प्रोत्साहन देते व सहकार्यही करते. अशाप्रकारे समाजात आपल्या पायावर उभ्या होवून स्वाभिमानाने जगणार्या स्त्रियांची भर पडते.
घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान हे घराच्या सुखासाठी व घराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आजची स्त्रि त्यात मागे राहिलेली नाही. घरातील जबाबदार्या सक्षमपणे पेलून घराबाहेरही आपले कौशल्य दाखवत आहे. स्त्रि ही खरोखरीच लक्ष्मीचे रूप आहे हे तिने आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले आहे. तेव्हा स्त्रियांच्या ह्या मोलाच्या योगदानास सलाम आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)