स्त्रिया आणि पुरूषी अहंकार

 निसर्गानेच स्त्रि आणि पुरूषास वेगवेगळे गुणधर्म देवून घडवीले आहे. स्त्रिया भावनाशील असतात आणि त्यांना भावनेची भाषा कळते. त्याचप्रमाणे  त्यांच्या कडे भावना व्यक्त करण्यासाठी एक अस्त्र असते ते म्हणजे त्यांचे अश्रू. स्त्रियांच्या भावना समजून घेवून  त्यांचे मन जिंकणे अत्यंत सोपे असते. याच्या  अगदी उलट पूरूष असतात. पुरूषांना शौर्य व पराक्रमाची भाषा कळते. ह्याचा अर्थ हा नाही कि ते भावनिक नसतात. तर मनाने तठस्थ आणि अहंकारी असणे हा पुरूषांचा मुळ गुणधर्म असतो. अशाप्रकारे भिन्न गुणधर्म असलेल्या स्त्री व पुरुषाला एकत्र राहणे कठीण होते. जेव्हा ते आपाआपल्या व्यक्तीमत्वात ठाम राहून जगतात. परंतू जर दोघांनीही एकमेकांच्या गुणधर्मांना समजून घेतले. तसेच त्यांचा आदर ठेवून वागण्याचे ठरवीले तर एक मध्य मार्ग निघू शकतो. ज्यामुळे त्यांच्यात एक आदर्श नाते निर्माण होण्याची पुर्ण शास्वती असते

  त्याचप्रमाणे आपली समाजव्यवस्था देखील स्त्रि पुरूषांमध्ये भेदभाव निर्माण करण्यास कारणीभूत आहे. स्त्रियांना रुढीपरंपरा आणि धर्माच्या नावाखाली पुरूषांपेक्षा वेगळी वागणूक देण्याची पद्धत अजूनही बघण्यात येते. त्यासाठी पूर्वी स्त्रियांना अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागत असे. एका घरात भाऊ- बहिण असले तर मुलीस ती परक्याचे धन आहे असे समजून लहानपणापासून घरकामात गुंतवीण्यात येत असे. तिला साधे आणि आवश्यकतेपेक्षा कमी जेवण देण्यात येत असे. लहान भावंडांच्या जबाबदार्‍या तिच्यावर सोपवून तिला शिक्षणापासून वंचीत ठेवण्यात येत असे. त्याचप्रमाणे नकळत्या वयात एखाद्या वयाने मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून तिच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद आई-वडीलांना होत असे. परंतू मुलाला मात्र घराण्याचा वारस म्हणून पूर्ण मान सम्मान बहाल केला जात असे. त्याची अंगकाठी मजबूत व्हावी म्हणून त्याला पोष्टीक आहार देण्यात येत असे. त्याचे सगळे लाड पुरवील्या जात असत. त्याच्या शब्दाला घरात किंमत दिली जात असे. अशाप्रकारे समाजाच्या विचारप्रणालीतच  स्त्री पुरूष भेदभाव पिढ्या न पिढ्या रूजत गेला. त्यामुळे घरात मुलींचे व स्त्रियांचे महत्व पुरुषांच्या तुलनेत कमी झाले आणि पुरूषात अहंकार वाढतच गेला.

  तसेच पुर्वीपासून बघण्यात येते कि पुरूष घरात एकमेव कमवीणारे असतात आणि स्त्रिया घर सांभाळतात. पुरूषांच्या कमाई वर कुटूंबाचे पालनपोषण होत असते. ह्या गोष्टीचाही पुरूषांना गर्व असतो. अशा परिस्थितीत जर स्त्रियांनीही घराचा उंबरठा ओलांडून कमवीण्याचा निर्णय घेतला तर पुरूषांच्या अहंकारास धक्का पोहोचतो. कारण त्यांच्या घरातील कुटूंबप्रमुख ह्या पदास प्रतिस्पर्धा निर्माण होण्याची भिती त्यांच्या मनात निर्माण होते. पुरूषी अहंकार हा नकारात्मक तेव्हा अधिक ठरत असतो जेव्हा त्याखाली घरातील स्त्रियांच्या भावना क्रुरपणे चिरडल्या जातात. त्याचप्रमाणे त्या अहंकाराच्या दबावाखाली येवून एका कुटूम्बाचा निखळ आनंद, आशा आकांक्षा व महत्वाचे म्हणजे शांतता अगदी मूकपणे कायमच्या पुरल्या जातात. आपल्यातील कमतरता उघडकीस येवू नयेत म्हणून पुरूष आपला अहंकार आणखीच मोठा करतात. त्याचप्रमाणे त्या अहंकाराचाच ढालीप्रमाणे वापर करण्यासाठी त्याचे आपल्या अवती-भोवती कठोर कवच बनवून त्यामागे स्वत:चा बचाव करतात.

   जगभरात असंख्य स्त्रियांना ह्या पुरुषी अहंकाराचा तडाखा बसतो. पत्नीचा चार-चौघात अपमान करणे, तिला आपल्या आज्ञेत ठेवणे, तसेच तिला निर्जीव वस्तूप्रमाणे वागवीणे,  पती म्हणून तिच्यावर हक्क गाजविणे व तिच्यावर अत्याचार करणे अशाप्रकारच्या घृणास्पद पद्धतीने पुरूष स्त्रियांना वागणूक देतात. जेणेकरून तिने कधीही पुरूषांशी बरोबरी करण्याची हिंमत करू नये. अशारितीने स्त्रिया पदोपदी शारिरीक आणि मानसिक अवहेलना सहन करीत असतात. अशावेळी त्यांच्या सहनशीलतेची कठोर परिक्षा असते कारण त्या नात्यात  जीवघेणी घुसमट असते. कारण त्रास होत आहे हे कळूनही स्त्रियांना व्यक्त होता येत नाही. त्यामुळे जीवंत असूनही त्यांच्या जगण्याला अर्थ नसतो. कारण पुरुषांनी थेट स्त्रियांच्या आत्मसन्मानावरच घाला घातलेला असतो. अशावेळी बाहेरचे कोणीही त्यांना समजून घेत नाही आणि त्यामुळे स्त्रिया आपले जीवन संपवीन्यास प्रवृत्त होतात. कारण पुरूषी अहंकार त्यांच्या आयुष्याला पोखरून टाकतो. घराच्या चार भिंतींच्या आत अनेक स्त्रिया ह्या अहंकाराच्या शिकार बनत आहेत. परंतू कायद्यान्वये अशा गुन्ह्यांना कोणतीही शिक्षा नाही.

  परंतू स्त्रियांनी ठरवीले तर आत्मसन्मानाच्या व त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांच्या ताकदीवर आत्मनिर्भर होवून त्या ह्या अहंकाराला योग्यप्रकारे तोंड देवू शकतात. त्यासाठी त्यांना आपल्या आयुष्याचे निर्णय निर्भयतेने स्वत:च घेण्याची गरज आहे. त्यांनी स्वत:ला एक मजबूत व्यक्तीमत्व बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे स्वत:चे आयुष्य वाया न जावू देता जीवनाचा हेतू शोधण्यासाठी तत्पर असले पाहिजे. अशारितीने स्त्रियांनी स्वत:ला कालच्या तुलनेत आज जास्त कणखर व निश्चयी बनण्याची गरज़ आहे.

1. आत्मप्रेम जागृत करावे  

  स्त्रिया जेव्हा पुरूषी अहंकाराचा सामना करत असतात तेव्हा त्या मनाने खचून जातात. त्यावेळी त्या त्यांच्या मनाविरुद्ध घडणार्‍या कोणत्याही गोष्टींचा विरोध करण्यास सक्षम नसतात. त्यांच्या मनात भावना उचंबळून येतात परंतू त्या बाहेर व्यक्त न होता मनातच साचत जातात. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास क्षतिग्रस्त होत जातो. अशावेळी स्वत:ला जपणे आणि त्यासोबतच विविध मार्गांनी ज्ञान अर्जित करून अद्द्यावत राहणे ह्या गोष्टी त्यांच्यात पुन्हा उर्जा भरण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या व्यक्तीमत्वात केलेला  सकारात्मक बदल त्यांना हिंमत प्रदान करू शकतो. त्यासाठी त्यांनी घरात वावरतांना पूर्णवेळ बेडरूम मधला पोषाख न घालता कामे करण्यास सोपे जाईल  आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवेल असा पोषाख घालावा. त्यांच्या बोलण्यात नम्रता असावी. त्यांना त्यांचे म्हणणे कमी आणि स्पष्ट शब्दात मांडता यावे. त्याचप्रमाणे त्यांच्यात प्रामाणीकपणा व निश्चयीपणा असावा. त्यामुळे त्या मनाने खंबीर होत जातील. तसेच पुरूषी अहंकाराविरुद्ध आवाज उठवू शकतील.

2. आत्मविश्वास वाढवावा.

  स्त्रियांनी स्वत:चा आत्मविश्वास वाढवीण्यासाठी हसतमुखाने कोणत्याही नवीन दिवसाची सुरवात करावी व त्या दिवसाला एका संधीच्या स्वरूपात बघावे. त्यासोबत त्यांनी आपल्या दिनचर्येत लहान-लहान बदल आणावेत. त्यामुळे त्या शारीरिक व मानसिक थकव्या पासून स्वत:ला दूर ठेवू शकतील आणि त्यांना टवटवीत वाटेल. त्यांनी आपल्या कामाचे वेळापत्रक ठरवून त्याप्रमाणे स्वत:ला शिस्तबध्द ठेवावे. त्यामुळे त्यांना स्वत:साठी व्यक्तीगत वेळ उपलब्द्ध करता येवू शकतो. त्या व्यक्तीगत वेळेला त्या ‘मी टाईम’ म्हणून आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोगात आणू शकतात. ज्यात शांत बसून फक्त स्वत:विषयी विचार करावा. त्याचबरोबर आपल्या त्वचा, केसं व शारिरीक आरोग्यासाठी वेळ द्यावा. घरातील कामे आटोपल्यावर दिवसभर चांगले दिसण्यासाठी आणि स्वत:मध्ये हुरूप जागवीण्यासाठी हलकासा मेकप करावा. त्यासोबत त्यांनी स्वत:ला वाचनाची सर्वोत्तम सवय लावावी. त्यामुळे त्यांचे स्वत:चे विचार विकसित होण्यास मदत मिळेल. त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांना चालनाही मिळेल. त्याचबरोबर त्यांनी नवीन गोष्टी शिकण्याची आवड जोपासावी. ह्या मुळे स्त्रियांचे मनोबल व आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

3. क्षमाशील असावे.

  स्त्रिया सहनशील असतात. त्यामुळे बर्‍याच वेळा त्या पुरूषी अहंकारापुढे नमते घेतात. परंतू स्त्रियांना निसर्गाने आईपणाची देणगी दिलेली आहे. आईच्या हृदयाची थोरवी ह्यासाठीच गाईली जाते कारण तिच्या ठायी निस्वार्थाभाव व क्षमाभाव असतो. त्याचप्रमाणे तिच्यातील क्षमाभावाने ती तिला छळणार्‍याच्या मनावर उपचार करण्याचा मोठेपणा दाखविते. जो आपला मानसिक छळ करतोय त्यास क्षमा करणे सोपे नसते. परंतू जर एखाद्या स्त्रिने हे दिव्य केले तर तिच्या मनास एकप्रकारची अलौकिक शांतता लाभते. त्याचप्रमाणे मनाची शांतता तिला आतून खंबीर बनवीते आणि त्या कणखरतेपुढे पुरूषी अहंकारही गळून पडतो. त्यामुळे घरातील कितीही मोठा वाद विकोपास जात नाही व शांततेत प्रश्न सुटतात.

4. शिस्तप्रिय असावे.

  स्त्रियांनी आपल्या वेळेप्रती आपल्या कामाप्रती आणि आपल्याशी कोणी कसे वागावे ह्याविषयी शिस्तप्रिय असले पाहिजे. जर स्त्रि गृहिणी आहे तर तिने कोणासही तक्रारीची वेळ येवू देवू नये. आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या जर ति मनापासून तसेच वेळेत पार पाडू शकली तर तिच्या आत्मविश्वासात भर पडून तिला स्वत:चा अभिमान वाटेल. स्त्रियांनी आपल्या कामांप्रती आळसीपणा व कामे पुढे ढकलण्याची सवय लावू नये. तत्परतेने कामे आटोपावीत. त्यामुळे स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास बसतो आणि त्यावरून कोणासही नावे ठेवण्यास जागा उरत नाही. त्याचबरोबर कायम निरोगी व प्रसन्न राहावे. जेव्हा त्या आपल्या कामांतून घराप्रती आणि घरच्यांप्रती समर्पणाचे भाव दाखवितात. तेव्हा त्यांनी आपल्या आत्मसम्मानाखातर स्वत: सशक्तही बनावे. त्याचप्रमाणे कोणाचेही घालून पाडून बोलणे किंवा तत्सम वागणूक त्यांनी कधीही खपवून घेवू नये. घरातील सदस्यांनी त्यांना आपल्या हाताखालचा गडी समजून आपल्या मनाप्रमाणे राबवून घेण्याच्या विरोधात स्त्रियांनी आवाज उठवीला पाहिजे. कारण स्वत:च्या स्वाभिमानासाठी आवाज उठवल्यामुळे  व स्वत:ची मदत करण्यास त्या स्वत: सक्षम असल्यामुळे आयुष्यात कधी निकडीची गरज पडल्यास त्यांना बाहेरूनही मदत मिळू शकेल.

   पुरूषी अहंकारास आळा घालण्यासाठी स्त्रियांनी विनम्र राहून आपले मजबूत व्यक्तीमत्व उभारावे. कारण पुरूषांच्या अहंकारावर प्रतिक्रीया दाखवून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा त्यांनी संयम ठेवावा. आपल्या सहनशीलतेत आणखी थोडी भर घालावी. परंतू स्वत:ला स्वाभिमानाने उभे करण्यासाठी दिवस-रात्र एक करावेत. तसेच स्वतंत्रपणे भरार्‍या मारण्यासाठी पुर्ण तयारीनीशी उंच झेप घ्यावी. अशाप्रकारे पुरूष अहंकाराने आपोआपच आणखी खुजा होत जाईल. परंतू स्त्रिया मात्र संपूर्ण ताकदीनिशी आकाशाला गवसणी घालू शकतील.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *