गृहिणी आणि मानसिक थकवा

आपण जे काम रोज करतो. ते आवडीचे नसेल आणि मनाविरूद्ध करावे लागत असेल. तर आपल्याला मानसिक आणि शारिरीक थकवा हा येणारच. कारण ते काम करून आपल्याला सहाजिकच कोणताही आनंद होणार नाही. तसेच गृहिणींना करावी लागणारी सर्वच कामे ही स्वखुशीने करावी अशी नसतात. परंतू एखाद्या स्त्रिने जर ते काम स्वेच्छेने स्विकारले असेल तर मात्र ती त्या कामांमध्ये आपला सेवाभाव आणि निस्वार्थभाव ओतून स्वत:ला मानसिक थकव्या पासून वाचवीते. ज्यामुळे तिच्या मनात तिचीच आत्मप्रतिमा उंच होते. घरातील  कामे करणारी स्त्रि गृहिणी, होममेकर तसेच हाऊसवाईफ अशा नावांनी ओळखली जाते. परंतू हे नाव आपल्या तोंडून निघताच आपल्या कल्पनेतील घरगुती वेशभूषेतील विखुरलेले केस असलेली घरकामात गुंतलेली स्त्री नजरेपुढे आपसूकच येते. कारण गृहिणींचे क्षेत्र आपल्याला कितीही स्वतंत्र वाटत असले तरी त्यांच्या स्वातंत्र्यावर मात्र त्यांचाच हक्क नसतो. त्यामुळे कधीकधी त्यांना उपलब्द्ध असलेला रिकामा वेळ सुद्धा त्यांच्याच उपयोगी पडत नाही. परंतू आजच्या गृहिणीने स्वत:ला उत्पादनक्षम बनविण्याचे व आपल्या आत्मसम्मानासाठी काही कौशल्यांच्या आधारे अर्थार्जनाचा स्त्रोत बनण्याचे महत्व जाणले आहे. त्याशिवाय स्वत:ला पूर्ण दिवस घर कामात गुंतवून ठेवण्यापासून वाचविण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करून कामाचे स्वरूप बदलावीन्यालाही त्यांनी महत्व दिले आहे. अशाप्रकारे ती सर्वगुणसंपन्न असूनही तिने घरातील क्षेत्राचे मोल जाणले आहे. त्यामुळे घरकामे ही आता कोणा एकाची नाहीतर घरात राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे. कारण स्त्री पुरूष समानतेने घरातही क्रांती आणलेली आहे.

   गृहिणी एकाचवेळी अनेक कामे करण्यात निपूण असतात. कारण गृहिणींची   एक काळजी घेणारी, सफाई करणारी, चिकीत्सक, ऐकुण घेणारी, सल्ला देणारी अशा वेग-वेगळ्या पदांवर  नियुक्ती झालेली असते. घरातील सदस्य घर अस्ताव्यस्त करून आप-आपल्या कामावर निघून जातात. परंतू ते कामावरून पुन्हा घरी परत येईस्तोवर घर निट-नेटके आणि आवरलेले असते. परंतू गृहिणींच्या सहनशिलतेची परिसीमा तेव्हा होते. जेव्हा परतफेड म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा तसेच अस्ताव्यस्त घर त्यांच्या पुढ्यात असते. जे घराबाहेर पडून पैसा कमवीण्याचे काम करतात. त्यांना निदान रजा घेण्याची सवलत तरी असते. परंतू गृहिणी मात्र सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या कामांवर वर्षो नु वर्षे तैनात असते. परंतू आपल्या लेखी अशा कामांची विशेष किंमत नसते ज्यामधून काहीही उत्पन्न येत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या घरातील कामांना गृहीत धरल्या जाते. त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्या कामांची प्रशंषा  करणे तर दुरच जरा जरी वस्तू जागेवरून हलल्या तरी गृहिणींना धारेवर धरल्या जाते. तसेच त्यांना चोवीस तास घरातील आरामदायक वातावरणात स्वतंत्रपणे काम करायला मिळते ह्या गोष्टीचा प्रत्येकाला हेवाही वाटतो. त्यामुळेच गृहिणींना गृहीत धरणे व त्यांच्यावर अविचाराने वर्चस्व गाजविणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. गृहिणींनी जर स्वत:चा आत्मसन्मान जपला नाही व आपली आत्मप्रतिमा उच्च राखली नाही तर मात्र घरातल्या घरात त्यांची अवस्था फार वाईट होते.

   आपण आपल्या आईचा काळ आठवला तर आपल्या लक्षात येईल कि त्या घरातील कामे पुर्ण समर्पणाने करत असत. आताच्या प्रमाणे तेव्हा सुख-सुवीधा नसतांनाही त्या हसतमुखाने सर्व अडचणींना सामोरे जावून घराचे घरपण जपत असत. घर आणि घरातील माणसे ह्या पलिकडे त्यांचे जगच नसायचे. तरिही त्यांची काहीही तक्रार नसायची. त्यांच्यातील समर्पनाचे भाव बघून आजारपणही त्यांच्या पासून लांब पळायचे त्यामुळे स्वत:ला आराम देण्याची एकही संधी त्यांना लाभत नसे. गृहिणी त्या काळातील असो अथवा आताची तिच्या कष्टांची तोड नाही. संपुर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेवून सक्षमपणे पेलणारी ती शक्तीचे रूप असते. जोवर ती घराप्रती असलेले तिचे कर्तव्य पार पाडत असते तिच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. परंतू ज्या दिवशी तिची जागा रिकामी होते. तेव्हा संपुर्ण घर विखरून जाते. तसेच त्या घराला तिच्या नसण्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते.

  बर्‍याच जणांचे गृहिणींविषयी असे मत असते कि त्या आरामस्थितीच्या क्षेत्रात राहून कामे करतात. त्यामुळे त्यांना केव्हाही आराम करण्याचे स्वातंत्र्य असते. किंवा त्या वाटेल तेव्हा टि व्ही पाहून आपले मनोरंजन करू शकतात. परंतू ही चुकीची समजूत आहे. घरातील कामे करणे हे कष्टाचे आणी थकवीणारे असते. त्याचप्रमाणे घर नेहमी घरात राहणाऱ्याला स्वत:मध्ये गुंतवून ठेवत असते. कारण आपण घरात असतांना संपूर्ण घर स्वच्छ व नीटनेटके असावे असे विचार आपोआपच स्त्रियांच्या मनात घोळत असतात. त्यामुळे संपूर्ण दिवस उलटला तरी त्यांच्या घरातील कामांचा कधीही अंत होत नसतो. आजच्या स्त्रियांनी ह्या कामाबरोबर जाणीवपूर्वक स्वत:ची काळजी घेण्याकडेही लक्ष दिले आहे. व्यायाम करणे, त्वचा आणि केसांची निगा राखणे आणि स्वत:च्या व्यक्तीगत वेळेस निर्मीतीक्षम बनवीने ह्यासाठी त्या  वेळ काढतात. त्याचप्रमाणे आपल्या कामांनी घरातील माणसांना सुविधा पुरवीतात ह्या गोष्टीचे समाधानही प्रत्येक गृहिणीच्या चेहर्‍यावर दिसते. स्त्रिया त्यांच्या जीवनात अनेक नात्यांना न्याय देत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनातील बर्‍याच गोष्टी सोडाव्या लागतात. स्त्रियांनी स्वत:च्या घरासाठी केलेला हा त्यागच चार भिंतींना घराचे रूप देतो. दाराला लावलेल्या नेमप्लेटवर तिचे नाव असो अथवा नसो परंतू तिच्या त्यागाचा त्या घराला कधीही विसर पडत नाही.

   समर्पीत होवून काम करणार्‍या गृहिणींना कसलाही थकवा जाणवत नाही. तरीही घरातील माणसांचे हे कर्तव्य असते कि त्यांचा आणि त्यांच्या कामाचा आदर करावा. त्यांना कामात हातभार लावावा. त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे. त्यांच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखाव्यात. कधी त्यांना आपल्या हाताने करून खावू घालावे. ह्यावरून त्यांचा विश्वास बसेल कि आपली माणसे आपल्यावर खुप प्रेम करतात. त्याचप्रमाणे त्यांना आपली पर्वा आहे. कारण ही एकमेव गोष्टच त्यांच्यात पुन्हा हुरूप आणेल.

1. गृहिणींना वेळेचे स्वातंत्र्य असते.

   गृहिणींना त्यांचे काम सुरू करण्यासाठी कोणीही आदेश देत नाही. त्या स्वत:च्या योजनेप्रमाणे किंवा घरच्यांच्या दिनचर्येप्रमाणे आपल्या कामाचे वेळापत्रक ठरवू शकतात. त्यामुळे गृहिणींसाठी हे हितकारक ठरते. त्याचप्रमाणे घरातील कामे आटोपल्यावर उर्वरीत वेळेस स्वत:च्या मर्जीनुसार घालवू शकतात. अथवा निर्मीतीक्षम बनवू शकतात. त्यासोबत स्वत:ची काळ्जी घेण्यासाठी आणि आवडी-निवडी जपण्यासाठी त्यांच्या कडे वेळ उरतो. आजच्या गृहिणी घरातील कामाबरोबर नवीन युगाचे तंत्रज्ञान शिकण्यास उत्साही असतात. आणि स्वत:ला अद्दयावत ठेवतात. त्यामुळे पेशाने गृहिणी असलेली स्त्रिही सर्व दृष्टीकोनातून एक आदर्श निर्माण करते.

2. घरातील माणसांचे आरोग्य जपतात.

   स्त्रियांच्या मनात घरातील माणसांप्रती जिव्हाळा आणि माया असते. त्यांना जरा जरी दुखले खुपले तरीही त्या मनाने विचलीत होतात. म्हणूनच त्यांचे आरोग्य जपण्यासाठी जे करणे शक्य आहे ते करण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळे पदार्थ बनवीणे तसेच घरातील लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आवडी-निवडी जपणे आणि त्यांची काळजी घेणे हे त्यांचे आवडते काम असते. त्याचप्रमाणे घरातील कानाकोपर्‍यापासून ते अंथरून पांघरूणा पर्यंत सर्वत्र स्वच्छता ठेवणे ह्यात त्यांचा हातखंडा असतो. घरातील माणसांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच त्यामागचा हेतू असतो. गृहिणींच्या कामात प्रेम आणि काळजी ह्या दोन्ही गोष्टींचे मिश्रण दिसते. म्हणूनच त्यांच्या ह्या कामास पैसे कमवीण्याच्या कामापेक्षा श्रेष्ठ मानले जाते.

3. घरात आनंद पसरवीतात.

   गृहिणी घरातील माणसांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यांच्या प्रत्येक कामास भावनांचा व मनाचा स्पर्श असतो. त्या सेवाभावाने कामे करतात. आणी त्याची परतफेड म्हणून त्यांची कसलीही अपेक्षा नसते. कोणतीही आनंद वार्ता असो अथवा मानसिक ताण असो घरी गृहिणीच्या रुपात एक ऐकुण घेणारा समर्थक असतो. तिच्याशी बोलून मन हलके होते. घरात कोणाचाही वाढदिवस किंवा प्रत्येकाचा आनंद सोहळा साजरा करणे तिला छान जमते. अशाप्रकारे आपल्या माणसांसाठी त्या आपले हृदयच पणाला लावतात. गृहिणींचा हा निस्वार्थभावच घराला आनंदी ठेवतो.

4. कामाचे वेळापत्रक बनवीतात.

  गृहिणींच्या कामात स्वयंपाक करणे, सफाई करणे आणि कपडे धुणे ही महत्वाची कामे असतात. त्यांनी आखलेल्या वेळापत्रकानुसार त्यांची कामे आटोपली तर त्यांना आराम करण्यास वेळ मिळतो. त्यामुळे कामाने आलेला शारिरीक व मानसिक थकवा त्यांना घालवीता येतो. तसेच त्यांना पुन्हा ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. त्यानंतर त्यांना त्यांच्या उर्वरीत रिकाम्या वेळेसाठीही योजना आखता येवू शकतात. गृहिणीचे काम थकवीणारे असले तरीही त्या  कामाचा दर्जा उच्च आहे. कारण घर हे सर्वांचे असले तरी घरातील गृहिणीने त्याचे मुख्य प्रतिनिधीत्व स्वीकारून घराची कमान आपल्या सक्षम खांद्यांवर संयमाने पेललेली असते. त्याचप्रमाणे पराकोटीच्या संयमातूनच तिच्यात स्वार्थत्याग जन्म घेत असतो. तसेच त्या स्वार्थात्यागानेच एक परोपकारी वेळापत्रक एक साधी गृहिणी बनवू शकते. ज्यामुळे तिच्या चेहर्‍यावर कायम  स्वर्गीय स्मीत  फुललेले असते. 

  एखाद्या स्त्रिने स्वेच्छेने गृहिणीचे काम  निवडले असले. तरीही  त्यात मोडणारी अत्यंत स्वच्छतेची कामे करणे म्हणजे दिव्य पार पाडण्यासारखे असते. गृहिणीने आपला आत्मसन्मान जपला नाही  तर दिवसाअखेरीस त्यांना त्यामुळे स्वता:विषयी  कमीपणा वाटू शकतो. त्याचप्रमाणे त्यांच्या मानसिकरीत्या थकन्यास हेच कारण कारणीभूत ठरू शकते. आपल्या कामांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बऱ्याच गृहिणींना हा परस्पर सम्मान आपल्या पदरात पाडून घेणे शक्य होत नाही. कारण त्यामधून अर्थार्जन होत नसल्याने त्या स्वत:च आपल्या पेशाला सम्मानास पात्र समजत नाहीत. परंतू कोणत्याही कामातून इतरांना निस्वार्थ सेवा देण्याचे भाव मनात असतील तर अर्थार्जनापेक्षा सर्वश्रेष्ठ मानसिक समाधान आपल्याला त्यामधून लाभत असते. जे आपल्याला मानसिकरीत्या थकण्यापासून वाचवू शकते. त्याचप्रमाणे हा इतका कमालीचा संयम आणि चिकाटी एका गृहिणीमध्येच असतो. तेव्हा अशा सर्व गृहिणींना सलाम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *