
मी मराठी ब्लॉग लेखनाच्या क्षेत्रात नव्यानेच आपली वाटचाल सुरू केली आहे. ज्यामधून स्त्रियांसाठी ह्या श्रेणीत मी विविध लेख लिहून प्रसारित केलेत. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या खडतर आयुष्याचे विविध पैलू आपल्या परीने उघडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी मला आदरणीय वाचक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. स्त्रियांच्या आणखी काही मुद्द्यांवर दृष्टीक्षेप टाकण्याच्या विचारात असतांनाच मी कालच माझा तरुण मुलगा व तरुण मुलीसोबत बसून एका मल्याळम सिनेमाची हिंदी आवृत्ती असलेला ‘’मिसेस’’ हा सिनेमा पाहिला. तो सिनेमा पाहिल्यानंतर मी अवाक झाले. कारण सिनेमा बघतांना जणूकाही माझा भूतकाळाच माझ्या डोळ्यासमोरून पुन्हा एकदा जात होता. वयाच्या एकविसाव्या वर्षी लग्न झाल्यानंतर मी जे काही आपल्या आयुष्यात पाहिले. त्याचेच दर्शन मला त्यामधून होत होते. कारण एका घराची, त्यात राहणाऱ्या आपल्या माणसांची तसेच आपल्या जीवनाच्या जोडीदाराची आपण जी मनोमन कल्पना केलेली असते. मात्र त्या सुखद कल्पनेच्या विपरीत आपले आयुष्य आपल्या पुढे जे काही ठेवते. ते अगदी भयावह असते. आपल्या कल्पनेतील विश्वात प्रत्यक्षात प्रवेश केल्यानंतर कौतुकाने नवनवीन पदार्थ बनविणे शिकणे, आपल्या चेहऱ्यावर निरागस हसू फुललेले असणे, संध्याकाळी पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसने तसेच पतीने केलेल्या स्पर्शाचा अर्थ कळत असूनही त्याला आपल्यावरचे पवित्र प्रेम समजणे ह्या गोष्टी भातुकलीच्या खेळाप्रमाणे आपल्याला निर्मळ आनंद प्रदान करत असतात. परंतू जसजसा काळ पुढे जात असतो. तसतसा त्यातील नवीनपणा जावून त्या गोष्टी केव्हा त्या घराच्या दिनचर्येचाच एक सामान्य भाग बनून जातात. आपल्याला हे कळण्याअगोदरच आपण घरच्यांच्या अपेक्षापूर्ण कठोर नजरांनी घेरले गेलेलो असतो. त्यांनी आपल्याला गृहीत धरण्यापुढे स्तुती प्रोत्साहन आपली लहान लहान स्वप्न मातीमोल झालेली असतात्त. त्यानंतर पदरात उरतात फक्त निराशा व सर्वांना सुविधा प्रदान करणारी एक सर्वसामान्य दिनचर्या जीने आपल्या मानसिकतेला पूर्णपणे व्यापलेले असते. ज्यात स्वत:चा विचार करणे म्हणजे स्वार्थ समजला जातो. तेव्हा मात्र आपल्या डोक्यावरचे छत्र जणूकाही आपल्याला सीमित राहण्यास खुणावत आहे असे वाटू लागते. घराच्या चार भिंती आपल्याला आपण कैदेत असल्याची अनुभूती करून देत असतात. कारण त्यात राहणारी माणसे आपल्याला एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे वागणूक देवू लागतात. त्यांनी आपलयाला स्वत:साठी काही निर्णय घेण्याचा हक्क सुद्धा दिलेला नसतो. त्याचप्रमाणे आपले त्यावर काही मत असावे. इतके आपण त्यांच्यासाठी महत्वाचे नसतो. आपण फक्त त्यांच्याकरीता अगदी समर्पकतेने खर्च होत राहावे. तेही हसतमुखाने एवढेच आपल्या हातात असते. संसाराला अनेक वर्ष लोटूनही अनेक स्त्रियांची तसेच नवविवाहित तरूण मुलींची सुद्धा आज अनेक घरांमध्ये पुरूषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली अशीच दयनीय अवस्था आहे. काही राज्य तर त्यासाठी जणूकाही प्रसिद्धच आहेत.
ह्या सिनेमातील कथानकात सासूच्या भूमिकेतील वयस्कर स्त्री सुद्धा होती. जिने त्या घरातील पुरुषी मानसिकतेला पूर्णपणे आपल्या मनाविरुद्ध का होईना परंतू स्वीकारले होते. तसेच ती त्या घराचा एक अविभाज्य भाग बनली होती. परंतू त्या प्रक्रियेत तिने आपला आत्माच मारून टाकलेला होता. हे तिच्या वर्तणुकीतून निदर्शनात येत होते. त्यामुळे ती अक्षरशा एखाद्या निर्जीव यंत्रासम झालेली होती. म्हणूनच तिच्याकडे आशेने बघणाऱ्या घरात आलेल्या नवीन सुनेला ती काहीही प्रतिसाद देत नव्हती. कदाचित मानसिक आघाताने तीचे हृदय भावनाशुन्य झाले असावे. माझ्या जीवनात सुद्धा प्रत्यक्षात मी अशा सासूचा अनुभव घेतलेला आहे. जी नोकरदार व आर्थिकदृष्टीने स्वावलंबी असूनही तिने पुरुषी मानासिकतेच्या विरोधात क्रांतीचा मार्ग अवलंबला नाही. ती आपल्या कर्तव्यदक्षतेने अप्रत्यक्षपणे पुरुषांच्या अहंकाराला आजीवन खतपाणी घालत राहिली. ते करत असतांना तिने दूरदृष्टीने येणाऱ्या पिढ्यांतील स्त्रियांचा तिळमात्रही विचार केला नाही. त्यामुळे माझ्यातील वेगळेपणही ती समजू शकली नाही. तसेच माझ्यावरही बंधने लादन्याचा तिने प्रयत्न केला. माझे स्वातंत्र्य तिने घरातील घराकामांच्या सणावारांच्या नावाखाली हिरावण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्याशी कधी मायेने संवाद साधून माझे मन मोकळे करण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात आपुलकीचे नाते निर्माण होवू शकले नाही. माझ्या सारख्या असंख्य स्त्रियांना आजही लग्नानंतर सासरच्यांकडून अशाप्रकारे कोरडेपणाची वागणूक दिली जाते. त्याचप्रमाणे तशा वातावरणातही त्यांच्याकडून नेहमी आनंदी राहण्याची व तक्रारीला संधी न देण्याची अपेक्षाही ठेवली जाते. जर त्या स्त्रीने शिरजोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर कधी गोड बोलून तर कधी तिला धाकात ठेवून तर कधी तिच्या भावनांशी खेळून तिला वर्चस्वाखाली ठेवले जाते. एकप्रकारे ही एक स्त्रियांना मानसिक त्रास देण्याचीच पद्धत आहे. ज्याचे ठळक चित्रण ह्या सिनेमाच्या माध्यमातून दाखविले गेले आहे. जे आजच्या काळातील मुलींच्या मनावर सखोल परिणाम करणारे आहे. कारण समाजातील हे कटूसत्य अर्थातच त्यांच्यासाठी सहज पचविता येणारे नाही.
स्त्रिया आपल्या आयुष्यात अशाप्रकारे भावनिक व मानसिक घुसमटीला मोठ्याप्रमाणात बळी पडत असतात. ज्याचा एकेदिवशी स्फोट होवून त्या एखाद्या जर्जर रोगाच्या शिकारही होवू शकतात. त्याचप्रमाणे त्या मानसिक रोगांना बळी पडू शकतात. किंवा जीवनभराकरीता खिन्नतेचा घासही बनू शकतात. परंतू त्यांच्या अशा अवस्थेला जबाबदार नेमके कोण? तसेच त्या आर्थिकदृष्टीने स्वावलंबी असल्यास त्यांच्यावर तशी वेळ येण्याचे टाळू शकते का? ह्यापैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे आहे कि त्यांच्या तशा अवस्थेला त्या स्वत:च जबाबदार ठरू शकतात. जर त्यांनी वेळेत स्वत:साठी योग्य तो निर्णय घेतला नाही. कारण त्यांनी जर परिस्थितीत बदल येण्याची वाट पाहण्यात आपले आयुष्य दवडले तर नुकसान त्यांचेच होईल. तसेच पुढे जावून जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली त्यांची मानसिक स्थिती आणखीच बिघडत जाईल. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर हे आहे कि स्त्रियांचे केवळ आर्थिकदृष्टीने स्वावलंबी असून कदापि चालणार नाही. तर त्यांनी आपल्या आत्मसम्मानासाठी व आपल्या हक्कांसाठी वेळप्रसंगी एकट्याने लढण्याचे धाडसही दाखविले पाहिजे. तरच कधी गरजेनुसार त्या स्वत:साठी टोकाचाही निर्णय घेवू शकतील. अन्यथा सिनेमातील सासू जी अर्थशाश्त्रात phd असूनही तिने पुरुषी मानसिकतेच्या चिखलात स्वत:हून रुतून बसण्याचा मार्ग सर्वस्वी निवडला होता. शिवाय सर्व गोष्टींची पूर्वजाणीव असूनही तिने आपल्या नवविवाहित सुनेला त्यापासून सावध राहण्याचा मार्ग दाखविणे महत्वाचे समजले नाही. तेव्हा अशाप्रकारे ह्या सिनेमाने समाजातील सर्व आयांना विचार करण्यास भाग पाडले आहे. कारण जेव्हा एक आई घरात पुरुषी मानसिकतेचे नाईलाजास्तव का होईना समर्थन करते. तेव्हा ती आपल्या मुलाला सुद्धा नकळतपणे त्याचे बाळकडू पाजत असते. ज्यामुळे ती शृंखला कधीही तुटू शकत नाही. परंतू जर तिने पुरुषी मानसिकतेच्या विरोधात शंख फुंकले तर मात्र ती आपल्या मुलीला नकळतपणे आत्मसम्मानाचे जगणे शिकवत असते. तसेच तिने स्वबळावर घरात येणाऱ्या सुनेसाठीही एक स्त्रियांच्या हक्काचा रंगमंच अगोदरच तयार केलेला असतो. ज्याद्वारे पुढच्या पिढीतील स्त्रियांना एकजुटीने लढण्याचा संदेश आपोआपच पुढे जात असतो. अशारितीने स्त्रिया आपल्या धाडसी निर्णयाने स्वत:ला पुरुषी मानसिकतेच्या जाचातून सहीसलामत बाहेर काढू शकतात. तसेच इतर स्त्रियांनाही मदतीचा हात प्रदान करू शकतात.
- स्त्रियांना स्वत:ची किंमत करणे जमले पाहिजे
स्त्रिया आपल्या आयुष्यात भूमिकांना अधिक महत्व देत असतात. त्याचप्रमाणे भूमिकांच्या औपचारीकतांमध्ये त्या स्वत:ला स्वखुशीने अडकवून घेतात. परंतू ते करत असतांना त्यांना एक व्यक्ती म्हणून आपोआपच स्वत:चा विसर पडतो. कारण सुरवातीला आपल्या माणसांना निष्ठेने प्रदान केलेल्या सेवा व सुविधा कधी अपेक्षांच्या बेड्या बनून त्यांच्याच हातांना अडकवितात. हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. तेव्हा स्त्रियांनी ‘परस्पर सम्मान’ आपल्या ह्या हक्कासाठी सदैव जागरूक असावे. भावनेच्या भरात वाहत जातांना स्वत:ची किंमत करणे कधीही विसरू नये.
2. स्त्रियांनी आर्थिकदृष्टीने स्वावलंबी असावे
स्त्री पुरूष समानतेला स्त्रियांचे आर्थिकदृष्टीने समर्थ असणे सर्वाधिक सार्थ ठरवीते. कारण त्याशिवाय स्त्रियांच्या आत्मसम्मानाच्या जगण्याला पूर्णतः अर्थ प्राप्त होत नाही. जेव्हा स्त्रिया स्वत:चा भार स्वत: उचलतात तेव्हा पती पत्नीच्या नात्यात एक निरपेक्ष व मैत्रीपूर्ण नाते निर्माण होण्यास वाव असतो. त्याचप्रमाणे स्त्रियांनाही स्वत:विषयी आदर वाटू लागतो.
3. स्त्रियांनी आपले आयुष्य सार्थकी लावावे
स्त्रियांचे आयुष्य एक लढा असतो. कारण ते स्वार्थत्यागाशिवाय अर्थपूर्ण होवू शकत नाही. तेव्हा हा स्वार्थत्याग स्त्रियांनी स्त्रियांच्या समर्थनार्थ करावा. स्वत:ला यंत्रासम पुरुषी मानसिकतेच्या जाळ्यात अडकवून घेवू नये. कारण पुढच्या पिढीतील एखादी स्त्री क्रांतीकारी विचारांची असल्यास ती आशेने कोणाकडे बघणार. तिच्या आशांना प्रोत्साहन मिळावे व तिला आत्मबळ लाभावे म्हणून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीस सकारात्मक हेतूने सहकार्य करावे.
4. स्त्रियांनी स्वत:ला स्वतंत्र करण्याचा निर्णय घ्यावा
परिस्थितीत बदल येण्याची आशा बाळगून व माणसांच्या विचारात बदल येण्याच्या दृष्टीकोनातून संयम राखत स्त्रिया आपल्या आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ व्यर्थ वाया घालवत असतात. खरेतर अशाप्रकारे त्या स्वत:ला बंधनातच अडकवून ठेवत असतात. कारण त्यामुळे त्यांच्या आयुष्यात विशेष बदल येणार नसतो. तेव्हा त्यांनी इतकाही मानसिक त्रास सहन करू नये कि ज्यामुळे आपल्या हिताचा विचार करणाऱ्या आसपासच्या माणसांवरचाच आपला विश्वास त्या गमावून बसतील. तत्पूर्वी त्यांनी स्वत:ला स्वतंत्र करण्याचा निर्धार नक्की करावा.
मिसेस हा सिनेमा स्त्रियांची घराच्या चार भिंतीतील भयावह परिस्थिती दर्शविणारा आहे. किंबहुना त्याहूनही कठीण आयुष्य आपल्याच मुलींना जगावे लागत आहे. कारण आजही हुंडा पद्धती समाजात प्रचलीत आहे. मुलीचा जन्म सर्रासपणे नाकारला जात आहे. त्यासाठी आईलाच जीवानिशी सम्पवीन्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्याशिवाय स्त्रियांवर होणारे अमानवीय लैंगिक अत्याचार व हत्या. जगात हे सर्व असेच सुरू राहणार आहे. कारण कोणत्याही वाईट गोष्टींचा समूळ अंत कधीही होत नसतो. त्याचा अंश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत राहतोच. परंतू स्त्रिया ह्यामधून बाहेर पाडण्यासाठी आपल्यापुरता विचार नक्कीच करू शकतात. किंबहुना त्यांनी तो करावाच. कारण त्यामुळेच इतर स्त्रियांनाही आत्मबळ लाभेल. कारण ही पुरुषी मानसिकता जलद पसरणाऱ्या काळ्या बुरशी सारखी आहे. तिचे पसरणे तेव्हाच थांबू शकते जेव्हा कोणत्याही भूमिकेतील स्त्री कडून तिला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन मिळणार नाही. तसेच स्त्रियांकडून तिच्यापुढे कदापि समर्पण केले जाणार नाही.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)