
आरामस्थितीत राहणे प्रत्येकास आवडत असते. किंबहुना ती आपल्यासाठी एक अत्यंत सुखद कल्पना आहे. त्यात आपण असे रेंगाळतो कि आपल्याला वेळेचेही भान राहत नाही. तसेच आपण आरामस्थितीत राहण्याच्या मोहापायी काय मिळवले व काय गमावले ह्याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. कडाक्याच्या थंडीत गरम गरम दुलईत आणखी जरा वेळ लोळत पडण्याची मनोमन होणारी तीव्र इच्छा. जी आपली दिनचर्या बिघडवीण्यास कारणीभूत ठरते. त्याचप्रमाणे आपलयाला आपल्या नियमित दिनचर्येतही इतके आरामदायक वाटू लागते कि त्याची आपल्याला सवय होते. तसेच त्या दिनचर्येतच आपल्याला सुरक्षीत वाटू लागते. त्याचबरोबर मानसिक शांतताही मिळते. कारण त्यात काही बदल होत नसतात. सर्वकाही आरामात चाललेले असते. ते आपल्या स्वप्नातील जीवन नसले तरीही सुख समाधानाचा लाभ मात्र त्याठिकाणी मिळत असतो. परंतू जर जीवनात आपली काही महत्वाकांक्षा असेल किंवा जीवनाचा हेतू साध्य करायचा असेल तर मात्र आपल्याला असुवीधाजनक आयुष्य पत्करावे लागते. तसेच आरामस्थितीच्या क्षेत्रातून बाहेर पडावे लागते.
जेव्हा आपण आपल्या आईच्या उदरात असतो. तेव्हा आपल्यासाठी त्याहून उबदार आणि सुरक्षीत जागा अन्य कोणतीही असू शकत नाही. परंतू तिथे आपला आराम करण्याचा कालावधी हा सीमित असतो. कारण त्यावर निसर्गानेच वेळेचे बंधन लावलेले आहे. त्या ठरलेल्या वेळेत आपले तिथून बाहेर पडणे ठरलेले असते. कारण आपल्या जन्म घेण्या मागचा काही उद्देश असतो. तो पुर्ण करण्यासाठी आपल्याला आईच्या उदरातील आरामस्थितीचे क्षेत्र सोडावे लागते. तीच गोष्ट आपल्या जीवनातही लागू पडते. कारण आरामस्थितीचे क्षेत्र आपल्याला निष्क्रीय बनवीते. कारण त्यात काही बदल होत नसतात. त्याचप्रमाणे काही महत्वाकांक्षाही नसतात. अनुभवायला त्यात आराम असतो परंतू जगणे निरस झालेले असते. त्याचबरोबर त्यात जास्तकाळ राहिलो तर आपल्या अंगावरच्या जबाबदार्या टाळण्याची प्रवृत्तीही आपल्यात वाढू लागते. त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षांना आयुष्यातून हद्दपार करावे लागते. केवळ एक उर्जाविहीन आणि निस्तेज दिनचर्या आपल्यातील कर्तुत्वाला टाळ लावते . त्याचबरोबर ह्याचा अर्थ हा होतो कि आपण जिवीत असूनही एखाद्या मृत व्यक्तीप्रमाणे जगत असतो.
त्याचप्रमाणे आरामस्थितीच्या क्षेत्रात जास्त काळ राहून आपला आत्मविश्वास क्षतिग्रस्त होतो. कारण आपण ज्या गोष्टींना घाबरतो त्यांना सामोरे जाण्याचे धाडस आपल्यात उरत नाही त्यामुळे त्यांच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. अशाप्रकारे आरामस्थितीच्या क्षेत्रात राहून आपल्या मनाला दिलासा मिळत असला तरी काहीतरी सुटत असल्याची सलही कायम बोचत असते. अशावेळी एखाद्या व्यक्तीस भेटणे किंवा बोलणे टाळण्यासाठी आपण त्याच्यापुढे येण्याचे टाळतो. स्वत:ला घरात बंद करून घेतो. एकप्रकारे घर म्हणजेही आपल्यासाठी आरामस्थितीचे क्षेत्रच असते. परंतू तिथे स्वत:ला सीमित करून घेणे म्हणजे आपल्याच जगण्यावर बंदी आणण्यासारखे असते. त्यापेक्षा वारंवार असुवीधेचा स्विकार करून जीवनात स्वत:साठी त्यासोबत आपल्या माणसांसाठी स्वत:ला सिद्ध करणे आपल्या स्वाभिमानाला शोभणारे असते. त्यामुळे आपल्यातील क्षमतेचा आपल्याला अंदाज येतो. तसेच आपण समजत होतो तेवढी ती गोष्ट कठीण नव्हती हे देखील लक्षात येते. म्हणूनच आपल्यातील क्षमतांना कसोटी लावायची असेल तर आरामस्थितीचे क्षेत्र सोडणे अनिवार्य असते.
जेव्हा आपण आरामस्थितीचे क्षेत्र सोडून असुवीधाजनक जीवनाचा स्विकार करतो. तेव्हा आपण स्वत:ला पुरूषार्थ गाजवीण्याची संधी देतो. असुवीधेचे जीवन आपल्याला कणखर बनवीते. जर आपल्याला आपला कोणताही हेतू साध्य करावयाचा असेल तर आपल्या मनाविरुद्ध वागणे सुरू केले पाहिजे. कारण आपल्या मनाचा कल नेहमी आरामाकडे असतो. जेव्हा आपण आरामस्थितीच्या क्षेत्राचा त्याग करतो. तेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रतिस्पर्धा मत्सर कठोर वागणूक आपले जगणे नकोसे करतात. परंतू त्यामुळे आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. ह्या नकारात्मक वाटणार्या गोष्टी आपल्याला तावून सुलाखून कणखर बनवीतात. त्यांना भावनांचे अश्रुंचे मोल कळत नाही. म्हणूनच म्हणतात पोहणे शिकायचे असेल तर पाण्याशी वैर नको. त्याचप्रमाणे जीवनात विकास करावयाचा असेल तर असुवीधेला घाबरू नये. त्याचबरोबर कदापि आरामस्थितीच्या क्षेत्राच्या मोहात पडू नये.
1. सुदृढ आरोग्य कमवीण्यासाठी
आपल्याला सुदृढ आरोग्य कमवायचे असेल तर कडाक्याच्या थंडीत उबदार दुलईतून बाहेर पडण्याची कितीही इच्छा नसली तरीही त्या आरामक्षेत्राचा त्याग करून व्यायाम करावा लागतो. तेव्हाच आपले आरोग्य उत्तम राहते. तसेच चांगले आरोग्य हे आपल्या आनंदी जीवनाचे गुपीत असते. ते जपण्यासाठी आपण आपल्या दिनचर्येतील पाच मिनीटांपासून सुरवात केली पाहिजे. कारण आपण आपल्यात हा पाच मिनीटांचा ठरवून केलेला बदल तसेच त्यासाठी थोडी का होईना पत्करलेली असुविधा आपल्या स्वास्थ्यासाठी केलेली गुंतवणूक असते. जेव्हा आपल्याला ह्या बदलाची सवय होवू लागते. तेव्हा पुन्हा त्यात वेळेची वाढ करून स्वत:ला कसोटी लावली पाहिजे. स्वत:च्या आरोग्यासाठी व्यायामाच्या वेळेत आणखी वाढ करून सुदृढ आरोग्य मिळविले पाहिजे. अशाप्रकारे आपणच तयार केलेले आरामस्थितीचे क्षेत्र आपणच मोडले पाहिजे.
2. जगण्याला अर्थ प्राप्त करण्यासाठी
आपण सर्वसामान्यांप्रमाणे प्रवाहाचा भाग बणून जगत असतो. जे जगणे फक्त आपल्यापुरते सिमीत असते. परंतू जर आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर आपण इतरांसाठी जगले पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत करून आपला परोपकाराचा मार्ग आपणच बनविला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यासाठी असुवीधाजनक जीवनच स्वत:हून अवलंबीले पाहिजे. तेव्हाच आपण मरणोपरांतही इतरांच्या स्मरणात राहू शकतो. आपल्या गौरवशाली इतिहासावर नजर टाकल्यास अनेक थोर-महात्म्यांची नावे समोर येतात. ज्यांनी समाजासाठी व देशासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आरामस्थितीच्या क्षेत्राचा त्याग केला होता. त्याचबरोबर हसत हसत अत्यंत असुवीधाजनक आयुष्य स्विकारले होते. तेव्हा आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आरामस्थितीच्या क्षेत्राचा त्याग केलाच पाहिजे.
3. सामान्य दिनचर्या सोडण्यासाठी
आपण सामान्य दिनचर्येत असे फसलेले असतो कि त्यालाच आपले जीवन समजू लागतो. तसेच स्वत:च्या क्षमतांना ओळखून त्यानुसार प्रगती करण्याचा विचारही करत नाही. आपण कधीकधी गरजेपेक्षा जास्त मिळवीण्याचा विचार ह्यासाठी करत नाही. कारण आरामस्थितीचे क्षेत्र सोडण्याची आपल्यात हिंमत नसते आणि इच्छाही नसते. तेव्हा आपण आहे त्या स्थितीत राहण्याची स्वत:ला ताकीद देतो. परंतू आपल्या मनाचा थरकाप तेव्हा उडतो जेव्हा आपण किंवा आपली प्रिय व्यक्ती जीवन मरणाच्या दारात असण्याचा दुर्दैवी विचारही आपल्या मनास शिवून जातो. त्यावेळी आपल्याला वेळेचे व पैस्याचेही मोल कळते. म्हणून वेळ हातात असतांनाच भविष्यात येणार्या आणीबाणीच्या प्रसंगासाठी योजनाबद्ध तयारी करण्यासाठी वेळ हातात असतांनाच आरामस्थितीच्या क्षेत्राचा त्याग केला पाहिजे.
4. नाती टिकवीण्यासाठी
घरातील प्रमुख जो कुटूंबाच्या चरीतार्थासाठी घराबाहेर पडतो. तो आपल्या कुटूंबास पुरेसा वेळ देण्यास असमर्थ असतो. कारण कामावरून परतल्यावर तो शारिरीक आणि मानसिक रित्या थकलेला असतो. अशावेळी तो स्वत:च्या मानसिक शांततेसाठी विरंगूळा म्हणून आपले मन टि.व्ही. बघण्यात गुंतवीतो. किंवा आरामात शांत पडून राहणे पसंत करतो. अशावेळी त्याचे कुटंबासोबत स्वारस्य निर्माण होवू शकत नाही. परंतू जर त्याने दुरदृष्टीने विचार केला आणि आरामाच्या क्षेत्राचा त्याग करून भविष्यासाठी मालमत्ता निर्माण करण्यासाठी वेळ हातात असतांनाच असुवीधा पत्करून आपल्या कामाव्यतिरीक्त अन्य अतिरीक्त कामासाठी आपल्या बहुमूल्य वेळेची गुंतवणूक केली. तर पुढे त्याचे आयुष्य नियोजनबद्ध होवू शकते. त्याचबरोबर तो त्याला हवा तेवढा काळ आपल्या कुटूंबासमवेत जीवनाचा आनंद घेण्यासाठी घालवू शकतो. परंतू त्यासाठी त्याला आजच आरामस्थितीच्या क्षेत्राचा त्याग करणे अनिवार्य आहे.
आपल्याकडे खूप संपत्ती आहे परंतू आपल्याला उत्तम आरोग्य लाभलेले नाही तर आपण जीवनाचा आनंद घेवू शकत नाही. कारण संपत्ती आणि आरोग्य हे आपल्या सुखी व समाधानी जीवनाचे महत्वाचे खांब असतात. तेव्हा जीवनात दोन्हीचा समतोल राखणे गरजेचे आहे. वेळेत आरामस्थितीच्या क्षेत्राचा त्याग केल्यानेच आपल्याला हे शक्य होवू शकते. यशस्वी जीवन जगायचे असेल तर आरामक्षेत्रात फसून राहणे योग्य नाही तर त्यास भेदने अनिवार्य असते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)