वडील – म्हणजे एक नेतृत्व

 ‘वडील’ हे आईचेच दुसरे रूप असतात. कारण आईच्या हृदयात मायेचा आणि वात्सल्याचा सागर असतो. तर वडील आपल्या डोळ्यात प्रेम न दाखविता मुलांवर प्रेम करत असतात. त्याचप्रमाणे वडीलांचा आदरयुक्त धाक दाखवूनच आई मुलांना शिस्त लावत असते. त्यामुळे मुले वडीलांपासून जरा लांबच राहतात आणि त्यांच्या नात्यात एकप्रकारची औपचारीकता असते. मुले वडीलांवर आई इतका हक्क गाजवत नाहीत. मुले आई साठी निबंध लिहीतात तसेच कविता करतात. परंतू वडीलांवर कोणीच काहीही करत नाही. त्यामागेही हे कारण असते. आई मुलांना भाकरी बनवून खाऊ घालते. परंतू वडील मात्र ती भाकरी कमवून आणण्याचे काम करत असतात. त्यामुळे ते नेहमी मुलांच्या आयुष्यातून हद्दपार असतात. त्याचप्रमाणे वडील त्यांच्या मनातील भावना मोकळेपणाने बोलून दाखवत नाहित. जणुकाही ते कधिही व्यक्त न झालेली माऊलीच असतात. तरीही वडील म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. कारण त्यांच्या शब्दकोषात मुलांसाठी नाही हा शब्दच नसतो. तसेच मुलांच्या मागण्यांना त्यांच्या आयुष्यात प्राथमिकता असते. खिश्यात टाकलेला त्यांचा हात कधिही रिकामा बाहेर येत नाही. वडील राजा असतात कारण  राजा कधिही याचका सारखा हात पसरत नाही. त्याचे हात नेहमी देण्यासाठी उठतात. त्याचप्रमाणे वडीलही मुलांसमोर कधिही हात पसरत नाहीत. तर आजीवन मुलांना देत राहण्यातच त्यांना समाधान मिळते.

     वडील  घराचा भक्कम पाया असतात. कारण त्यांच्या आपल्या आयुष्यात असण्याने आपल्याला हिंमत येते. त्यांच्या आपल्यावरच्या छत्रछायेने आपल्याला सुखाची झोप लागते. वडील म्हणजे डेरेदार वृक्ष असतात. कारण ते एखाद्या विशाल वृक्षाप्रमाणे आपल्याला जीवनात गारव्याचे क्षण  अनुभवास देतात. आपला असा समज असतो कि वडील कठोर आहेत. कारण त्यांना आपण रडतांना कधिही पाहिले नसते. परंतू वडील कधिही डोळ्यात अश्रू येवू देत नाहीत. कारण त्यांचा बळकट खांदा कठीण समयी घरच्यांना हिंमत देण्यासाठी असतो. अशाप्रकारे एका नेतृत्व करणार्‍याचे सगळे गुण वडीलांमध्ये असतात.

    आपल्या गौरवशाली इतिहासात असे महान वडील झालेले आहेत, ज्यांनी अनेक दु:खी-कष्टी लोकांच्या डोक्यावर पितृछत्र धरले. आणि ते एका-दोघांचे नाही तर संपुर्ण समाजाचे बाबा झाले.

बाबा आमटे – 

ह्या थोर व्यक्तीच्या नावातच अद्भूत ‘बाबा’ हा शब्द आहे. त्यांचे पुर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे असे आहे. त्यांचे बालपण ऐश्वर्यात गेले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. लहानपणापासून त्यांचे आदर्श रविंद्रनाथ टॅगोर आणि साने गुरूजी हे होते. बाबांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते आणि त्यांची वकिलीही चांगली सुरू होती. परंतू ते त्यांच्या आयुष्यात समाधानी नव्ह्ते. कारण त्यांना सारखा काहितरी राहून गेल्याचा आभास होत असे. पुढे त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून साधनाताईंशी लग्न करून संसार थाटला. परंतू तरिही त्यांचे मन कशातही रमत नव्हते. एके दिवशी त्यांनी एका कुष्ठरोग्यास पावसात भिजतांना पाहिले. त्याची अवस्था बघून सुरवातीस ते घाबरले. परंतू त्या क्षणापासून त्यांच्या जीवनास कलाटणी मिळाली. त्या कुष्ठरोग्याची बाबांनी सेवा करण्यास सुरवात केली. परंतू तो फार काळ जगला नाही. त्यानंतर बाबांना त्यांच्या जीवनाचे ध्येय सापडले. त्याप्रमाणे त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेस अर्पण केले. त्यांनी केवळ कुष्ठरोग्यांची सुश्रुषाच केली नाही तर त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बळकट पावलेही उचलली. त्यासाठी त्यांनी अशा महाविद्द्यालयाची स्थापना केली, जिथे हातमाग सुतारकाम लोहारकाम ह्यासारख्या व्यवसायांचे शिक्षण दिल्या जात असे.

    त्यांच्या ह्या महान कार्यात अनेक अडचणी आल्या. तरिही बाबांनी हार मानली नाही. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारले. तिथे जंगली श्वापदांचा सुळसूळाट होता, मुलभूत गरजांची कमतरता होती, त्याचप्रमाणे अंधश्रद्धेचे वारे वाहत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून प्रचंड जिद्दीने बाबांनी आपले कार्य पुढे नेले. आणि ते खर्‍या अर्थाने कुष्ठरोग्यांचे वडील झाले. त्यांच्या ह्या थोर कार्यास मानाचा मुजरा.

डॉ. भिमराव आंबेडकर – 

ह्यांच्याही नावातच बाबा हा अद्भूत व दिलासादायक शब्द आहे. त्यांचे पुर्णनाव भिमराव रामजी आंबेडकर होते. ते त्यांच्या माता-पित्याचे चौदावे अपत्य होते. त्यांचा जन्म एका दलित महार कुटूंबात झाला होता. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. त्यांचे वडील आर्मीत सुभेदार पदावर होते. मुंबईच्या एलफिंस्टन कॉलेजात डॉ आंबेडकर एकमेव अस्पृश्य विद्द्यार्थी होते. त्यामुळे वर्गातील उच्च जातीचे विद्द्यार्थी त्यांना अपमानीत करत असत. जाती पातींच्या भेदभावामुळे त्यांना शालेय जीवनापासूनच वाईट अनुभव येण्यास सुरवात झाली होती. दलित असल्यामुळे त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. तसेच पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला स्पर्श करण्याचीही परवानगी नव्हती. जेव्हा शाळेतील शिपाई त्यांच्या ओंजळीत पाणि ओतायचा तेव्हा ते पाणि पिऊ शकत असत. शाळेतील शिक्षकही त्यांना तिरस्काराने वागणूक देत असत. बाबा अठरा-अठरा तास अभ्यास करायचे. त्यांना शिष्यवृत्ती घेवून महाविद्द्यालयीन शिक्षण पुर्ण करावे लागले. त्यापुढील उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेतील कोलंबिया विद्द्यापिठात गेले. पुढे त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी कार्य करण्यास सुरवात केली. त्यांच्या सामाजीक व राजकीय हक्कांचे समर्थन केले. ते हिंदूंचे अस्पृश्यांच्या बाबतीत असलेले मत परिवर्तन करण्यासाठी झटत होते. परंतू त्याचा काहीही उपयोग होत नव्हता.

    अस्पृश्यांना मंदीरात प्रवेश करण्यास बंदी होती. सार्वजनिक विहिरीवरून पाणि भरण्यास मनाई होती. त्यांना ज्ञानार्जनाचा हक्क नव्हता. त्यांच्या सावलीचाही विटाळ मानल्या जात असे. अशा परिस्थितीत बाबा पेटून उठले आणि हिंदू धर्मात आता रहायचे नाही असा पक्का निर्धार करून लाखो दलित समुदायासह बाबांनी धर्मांतरण करून बौद्ध धर्म स्विकारला. अस्पृश्यांसाठी दलित किंवा हरिजन हा शब्द वापरण्यास बंदी आणून अनुसूचीत जाती हा शब्द वापरला जावा ही गोष्ट ठामपणे मांडण्यात ते यशस्वी झाले. अस्पृश्यांच्या मंदीर प्रवेशाने मंदीर व मूर्ती अपवित्र होत नाही हे दाखवून देण्यासाठी मंदीर प्रवेश हक्काचा सत्याग्रह केला. बाबांचा लढा माणुसकीस कलंक लावणार्‍या अमानुष अन्यायी आणि अघोर अशा सनातनी ब्राम्हण सत्तेविरुद्ध होता. कारण हिंदूंना अस्पृश्य कुत्र्या मांजराप्रमाणे वाटत होते. बाबा दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटत होते. त्यामुळेच धर्मांतराच्या भिमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहोचला. अस्पृश्य बाबासाहेबांना मुक्तीदाता मानतात. कारण बाबा लाखो अस्पृश्यांचे वडील झाले आणि त्यांनी लाखोंच्या संख्येत असलेल्या अस्पृश्यांना समाजात माणुस म्हणून मानाचे स्थान मिळवून दिले. अशा ह्या थोर वडीलांना मानाचा मुजरा.

छत्रपती शिवाजी महाराज –  

   शिवबांच्या लहानपणापासूनच राम आणि कृष्णाच्या कथा आई जिजाऊंनी त्यांना ऐकवील्या. त्यामुळे त्यांच्यात अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याचे धाडस निर्माण झाले होते. त्यांच्या पहिल्या गुरू आई राजमाता जिजाऊच होत्या. त्यांनी महाराजांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीत निपुण केले. महाराजांचे दुसरे गुरू दादोजी कोंडदेव होते. त्यांनी महाराजांना युद्धकौशल्य आणि नितीशास्त्रात पारंगत केले. क्रुर सुलतानी शासकांच्या अत्याचारातून मराठी जनतेला मुक्त करण्याचा वसा त्यांनी उचलला होता. महाराजांना प्रजेच्या सुख-दु:खाची जाणीव होती. म्हणून त्यांना जाणता राजा असेही संबोधत असत. स्त्रियांचा सन्मान आणि त्यांचे रक्षण करणे हे त्यांचे आद्द कर्तव्य मानत असत. महाराज एक उत्तम प्रशासक होते. युद्धात हरलेल्या शत्रूच्या स्त्रियांनाही ते सन्मानाने परत पाठवत असत. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी  किल्ले काबीज करण्यास सुरवात केली. त्या मागचा हेतू स्वराज्य वाढविण्याचा होता. महाराजांनी अनेक युद्धे गनिमी काव्याने लढली. ते मुत्सद्दी राजकारणी होते. महाराजांनी अनेक जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली होती. ते द्रष्टा नेता होते. मराठी राज्य स्थापन करून महाराजांनी रयतेचा विश्वास जिंकला आणि ते रयतेचे वडील झाले. त्यामुळेच महाराज कोणा एकाचे नसून एकाचवेळी संपुर्ण रयतेचे होते.

   अशा ह्या थोर पित्यांनी लाखो लोकांचे पालकत्व स्विकारले. त्यांचे दु:ख दूर केले आणि माणूस म्हणून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांना शत शत प्रणाम. त्यांनी त्यांच्यातील वडीलास इतके उंचीवर नेले कि  आकाशही त्यांच्या पुढे खुजे भासू लागले.

     वडील हे नारळासारखे असतात. ते वरकरणी कणखर वाटत असले तरिही त्यांचे मन मात्र मृदू असते. ते मुलांसाठी सुपरहिरो असतात. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात संघर्ष करीत असतो तेव्हा वडीलांच्या ‘मी आहे तुझ्या पाठीशी’ ह्या शब्दांनी आपल्याला बळ येते. जेव्हा आपल्या हातून काही चुका होतात तेव्हा वडीलांचे ‘इतके मनावर घेवू नकोस, पुन्हा प्रयत्न कर’ हे शब्द आपल्यात उर्जा भरतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी यश संपादन करतो तेव्हा वडीलांचे डोळे गर्वाने चमकतात. मुलांना त्यांच्या आयुष्यात उभे करण्यासाठी वडील दिवस-रात्र एक करून परिश्रम घेतात. वडील मुलांसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान असतात. कारण घेता घेता आपण थकतो परंतू वडीलांचे हात कधिही रिकामे होत नाहीत.

1. वडीलांचे उपकार कधिही विसरू नये.

   आयुष्यात वडील बनणे ही प्रत्येक पुरूषासाठी आनंद देणारी गोष्ट असते. आपल्या अपत्यास जगातील सर्व सुखं मिळावीत अशी वडीलांची इच्छा असते. कारण वडील बनताच एक जबाबदार व्यक्ती जन्मास येतो आणि तो आपल्या मुलांच्या सुखासाठी दिवस-रात्र एक करतो. मुलांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करतो. स्वत:च्या अंगावर फाटके कपडे घालतो आणि आजारपणही अंगावर काढून दिवस काढतो. कोणी काही विचारले तर ‘मुलाची नोकरी लागली कि दिवस बदलतील’ असे म्हणून गोष्ट टाळतो. असे विनाअट प्रेम करणारे फक्त आपले वडीलच असतात. त्यांना आयुष्यात कधिही अंतर देवू नये. आपण शरिराने त्यांच्या पासून कितीही लांब असलो परंतू तरिही आपले मन आणि मस्तक त्यांच्या पायाशी आदराने व विनम्रतेने झुकले पाहिजे.

2. पितृसेवा हे आपले आद्द कर्तव्य असले पाहिजे

   आपल्या वडीलांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी आणि भरपाई करण्यासाठी आपण अनेक जन्म घेतले तरी ते अपूरे पडतील. कारण त्यांनी स्वत:ची स्वप्ने कडेला ठेवून आपल्यावर प्रेमाची उधळण केलेली असते. आपली आजारपणं काढली असतात. सदैव आपल्या पाठिशी उभे राहतात. आपल्या सोबत त्यांच्या नसण्याची कल्पना सुद्धा आपल्या जीवाचा थरकाप उडवीते. पाया खालून जमीन सरकल्याचा आभास होतो. जेव्हा वडील त्यांच्या वयाच्या उतरत्या काळात असतात. तेव्हा त्यांना आपल्या सोबतीची गरज भासते. आपली मुलं व्यस्त आहेत हे बघून ते मनातील गोष्टी बोलण्याचे टाळतात. परंतू आपण त्यांची घालमेल समजून घेतली पाहिजे. म्हातारपण म्हणजे एकप्रकारचे बालपणच असते. ह्या काळात अनेक कारणांनी त्यांचे भावनाविवश होणे सहज शक्य आहे. अशावेळी आपण त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले पाहिजे. त्यांचा प्रत्येक क्षण सहज आणि सोपा व्हावा ह्याकरीता झटले पाहिजे.

3. वडीलांना ते निवृत्त झाल्याचे भासवू नये.

   वडील आयुष्यभर आपल्या कुटूंबाची जबाबदारी पार पाडत असतात आणि त्याचा त्यांना अभिमान असतो. परंतू आयुष्यात कधितरी निवृत्तीचा काळ येतोच. मुले मोठी होतात आणि कमावती झाल्यामुळे  वडीलांवरचा भार हलका होतो. तसेच ते त्यांच्या कामातूनही निवृत्त होतात. कोणत्याही वडीलांसाठी हा काळ मानसिक खच्चीकरण करणारा असतो. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात रितेपणा आल्याचा भास होतो. अशावेळी मुलांचे हे कर्तव्य असले पाहिजे कि वडीलांना होणार्‍या मानसिक वेदनांपासून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांचे मन अन्य कामात गुंतविण्यास त्यांना मदत करावी. त्यांना त्यांच्या आवडीचे छंद जोपासायला लावावेत. त्यांचे मन मोकळे करण्यासाठी त्यांच्याशी गप्पा माराव्यात. निसर्ग सान्निध्यात वेळ घालवीण्यास पाठवावे. जेणेकरून त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि आत्मसन्मानावर वाईट परिणाम होणार नाही.

4. वडीलांची अपुर्ण स्वप्न पुर्तीस न्यावीत.

    आपण लहानाचे मोठे होत असतो. तेव्हा  आई-वडीलांवर अनेक जबाबदार्‍यांचा भार असतो. त्या पार पाडत असतांना ते स्वत:कडे दुर्लक्ष करतात. आणि ओघा-ओघाने आपल्या आवडी-निवडींचा त्याग करतात. आपण स्वत:ला सर्वार्थाने सक्षम बनवावे. जेणेकरून आपल्या आई-वडीलांच्या अपुर्ण राहिलेल्या इच्छा पुर्ण करू शकलो पाहिजे. त्यांना एखादे ठिकाण पाहण्याची इच्छा असेल तर तत्सम एखाद्या ट्रीपची माहिती काढून त्यांना पाठविण्याची सोय करावी. एखादा विशेष दागिना अंगावर घालण्याची इच्छा असेल तर स्वकमाईने तो करून द्यावा. त्यांची शारिरीक आणि मानसिक काळजी घेण्यासाठी जे करता येईल ते करावे. जेणेकरून आयुष्याच्या शेवटी त्यांचे सर्वदृष्टीकोणातून मन तृप्त व्हावे आणि त्यांच्या ओठांवर सदैव आनंदाने हास्य फुललेले असावे.

    मित्रांनो वडीलांची जागा अन्य कोणीही भरून काढू शकत नाही. ज्या दिवशी आपल्या आयुष्यात ती जागा रिकामी होते. त्या दिवशी आपण कायमचे पोरके होतो. तेव्हा जोपर्यंत ते आपल्या बरोबर आहेत  आपण त्यांचा आधार बनले पाहिजे. आणि त्यांच्या सोबत घालविलेल्या एक-एका क्षणाची आठवण आपल्या हृदयात जपली पाहिजे. जोपर्यंत त्यांचे आणि आपले अस्तित्व ह्या जगात आहे. तोपर्यंत त्यांच्या हातातून आपला हात सुटू देवू नये. हीच वडीलांसाठी आपल्याकडून सर्वात मोठी भेट ठरू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *