
जोपर्यंत आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू माहित नसतो. तोपर्यंत आपले जगणे दिशाहीन असते. ह्या जगात जन्म घेण्यासाठी लावलेल्या शर्यतीत आपण जिंकलो. म्हणुन आईच्या पोटी जन्म घेवून ह्या जगात येतो. परंतू इथे आल्यावर जिंकणे काय असते आणि हेतू कशास म्हणतात. ह्याचाच आपणास विसर पडत जातो. स्वत:च्या क्षमतांची जाणीव नसल्याने आपण प्रवाहाचा भाग बनुन सामान्य जीवन जगत राहतो. सगळे जे करतील तेच करत राहतो. कारण आपल्यात धाडस नसते. आपला मार्ग तयार करून त्यावर मार्गक्रमण करण्याचे. आपला असा समज असतो कि काहीतरी चमत्कार घडेल. किंवा समुद्राच्या लाटेप्रमाणे एक लहर यईल व सहजच आपल्याला जीवनाच्या हेतू पर्यंत घेवून जाईल. परंतू हा आपला सर्वस्वी चुकीचा समज असतो.
ज्याप्रमाणे जंगलाचा राजा ‘वाघ’ आपले पोट भरण्यासाठी अन्य प्राण्यांची शिकार करतो. त्यामुळे दोन हेतू साध्य होतात. एक म्हणजे वाघाचे पोट भरते. तसेच दुसरा म्हणजे इतर प्राण्यांच्या संख्या वाढीत संतूलन राखले जाते. ही निसर्ग निर्मीत खाद्य शृंखला आहे. त्याचप्रमाणे वाघ हा त्या शृंखलेचा एक महत्वाचा भाग आहे. परंतू आपण वाघास मोठ्या पिंजर्यात बंद केले आणी रोज भरपेट मांस त्याच्या समोर टाकले. तर वाघाला पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. विनाकष्ट अन्न मिळाल्यामुळे तो त्याची शिकार करून आपले पोट भरण्याची क्षमता ओळखू शकणार नाही. तसेच त्याचे भक्ष्य बनणार्या हरणासारख्या प्राण्यांच्या संख्येत संतुलन राखण्याचा वाघाच्या जीवनाचा हेतू पुर्ण होणार नाही. ह्याचा अर्थ हा होतो कि हेतू पुर्ण करण्यासाठी वाघाला स्वातंत्र्यपुर्ण जीवनाची आवश्यकता आहे. त्याशिवाय ह्या नैसर्गीक खाद्य शृंखलेत बाधा येईल.
तसेच ज्या झाडांना पुरेसे पाणि मिळत नाही. अशा झाडांची मुळे पाण्याचा शोध घेत घेत जमीनीत खोलवर जातात. पाण्याचा शोध घेणे हा त्यामागचा हेतू असतो. परंतू तसे करत असतांना झाडांंच्या सहनशिलतेची मर्यादा वाढते. जेवढी मुळे खोल जातात तेवढे झाड डेरेदार बनते. तसेच वादळ-वार्याचा सामना करण्यास सक्षम बनते. ह्यावरून हा बोध होतो कि जीवनात हेतू असल्याने आपण आणखी खंबीर बनत जातो. हेतू साध्य करण्याच्या दिशेने एकाग्र होत जातो. प्रत्येकाच्या जीवनाचा हेतू असतोच. त्याचप्रमाणे तो एकदा सापडला कि जीवन सार्थक होते. आपण एका लहानशा मुंगीकडून हे शिकू शकतो कि ती सतत कार्यरत असते. तिचा अन्न मिळवीण्याचा हेतू साध्य करण्याच्या मार्गावर अनेक अडचणी येतात. कित्येकदा ती खाली घसरते तरी तिच्या प्रयत्नात खंड पडत नाही. किंवा कधी कधी तर तिला जिवालाही मुकावे लागते. परंतू ती हार मानत नाही. ती तिच्या जीवनाचा हेतू गाठत असतांना जराही भटकत नाही तर थेट निर्धारीत हेतूवर लक्षकेंद्रीत करते.
त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनाचा हेतू पुर्ण करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हेतूचे आकलन होणे गरजेचे असते. हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे. हे जाणून घेण्यासाठी आपण स्वत:ला कसोटी लावली पाहिजे.
1. आनंद
आपण आयुष्यात जी कामे करतो. त्यापैकी सगळीच कामे आपल्या आवडीची असतात असे नाही. परंतू त्यांना करणे ही आपली गरज असू शकते. किंवा ती करण्यामागे काही कारणे असतात. तसेच काही अडचणही असू शकते. हेतू च्या शोधात असतांना आपण एका गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे. ते म्हणजे आपण निवडलेले काम करत असतांना आपल्याला मानसिक आनंद मिळत आहे. तसेच आपण तल्लीन होवून ते काम करत आहोत. किंवा ते काम करत असतांना आपल्याला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. त्याचप्रमाणे ते करत असतांना आपल्याला वेळेचे भान राहत नाही. जेव्हा एखादे काम करतांना आपल्याला असा अनुभव येत असेल. तर त्यामुळे आपल्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळते. तसेच हातात घेतलेले काम करत असतांना स्वत:मधील क्षमतांचा पुर्णपणे उपयोग झाल्याचे समाधान मनास लाभत असेल. तर असे समजावे कि हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे.
2. प्रेम
आत्मप्रेम आपल्याला आपल्याच आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा करून देत असते. त्याचप्रमाणे आपल्या प्रियजनांवरचे आपले प्रेमही आपल्या जीवनाचा हेतू शोधण्यास हातभार लावते. अशाप्रकारे प्रेम ही एक सुरक्षीत जाळी असते. जेव्हा आपण दु:खी असतो, थकलेले असतो, तसेच काही कारणांनी निराश असतो तेव्हा आत्मविश्वासाने स्वत:स त्या जाळीत झोकून देतो. ही प्रेमाची जाळी आपल्याविषयी कोणतेही मत न बनविता आपल्याला सुरक्षेचे आश्वासन देते. तसेच आपल्या भावनिक जगाला प्रेमाचा आधार देते. अशा वातावरणात आपल्या जीवनाचा हेतू शोधणे आपल्यासाठी सहज शक्य होते.
3. कला
कलेच्या माध्यमातून जीवनाच्या हेतूचा थांग लावणे फार सोपे असते. कोणत्याही कलेच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना मोकळ्या होतात. त्याचप्रमाणे कला क्षेत्रात आपल्या मनाला स्थैर्य लाभते. चित्रकला संगीत नृत्य स्वयंपाकाची कला अशा विवीध कलांच्या माध्यमातून इतरांच्या हृदयाला स्पर्श करता येतो. त्या कलेचा आस्वाद घेणारा किंवा त्याचा अनुभव घेणारा जेव्हा मंत्रमुग्ध होवून जातो. तेव्हा ती कला साकारतांना जर आपल्यालाही तल्लीन होण्याचा अनुभव आला. किंवा आपल्या भावना सकारात्मक झाल्या. तर समजावे कि त्या कलाविश्वात आपल्या जीवनाचा हेतू दडलेला आहे.
4. सकारात्मकता
आपण स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी निसर्गसान्निध्याचा आधार घेतो. कारण निसर्गाचा स्पर्श आपल्याला सकारात्मक ठेवण्यास मदत करतो. तसेच सकारात्मकता आपल्या विचारात स्पष्टता आणते. त्यासाठी आपण स्वत:मध्ये छोटे-छोटे बदल आणण्यासाठी तयार होतो. अशाप्रकारे हळूहळू आपल्या जीवनात परिवर्तन येण्यास सुरवात होते. निसर्ग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे. कारण इथे राहणारा प्रत्येक जीव-जंतू त्याच्या जीवनाच्या हेतू पुरस्सर काम करतो. तेव्हा ह्या माध्यमातून आपल्यालाही जीवनाचा हेतू सापडण्याची हमी असते.
जेव्हा वातावरणात बदल येवून जोरजोरात वादळी वारे वाहू लागतात. तेव्हा घरात कचरा येवू नये म्ह्णून आपण घराची दारे खिडक्या लावून घेतो. तरीही दाराच्या फटीतून सुक्ष्म स्वरूपात मातीचे कण घरात शिरकाव करतातच. कारण त्यांना अडविण्यात आपण अपयशी ठरतो.. त्याचप्रमाणे आपण वर्तमान क्षणात राहून जागृकतेने जीवन जगत राहीलो आणि सृष्टीशी एकरूप झालो तर आपल्या जीवनाचा उच्च उद्देश तथा हेतू नकळतपणे एकेदिवशी आपल्या समोर प्रकट होईल हे निश्चीत.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)