आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे

आपण पृथ्वीतलावर मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे. त्यामुळे इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत आपली बुद्धीमत्ता तल्लख आहे. परीणामस्वरूपी आपल्याला चांगल्या-वाईटाची समजही जास्त प्रमाणात आहे. ज्यामुळे मनुष्य जीवनाला वेगळेच वळण लागले आहे. आपल्यात लोभ मोह स्वार्थ मत्सर द्वेष हे राक्षशी प्रवृत्तीस बढावा देणारे दुर्गूणही आहेत. त्याचबरोबर प्रेम दया करूणा निस्वार्थभाव सेवाभाव हे माणुसकीचे दर्शन घडविणारे सुगूण सुद्धा आहेत. जेव्हा आपण दुर्गूणांच्या मोहजाळात फसतो. तेव्हा आपले जीवन अंधकारमय होवून जाते. त्यामुळे आपल्या जिवीत असण्याचा कोणासही उपयोग होत नाही. कारण आपल्या जीवनात आपणच काळोखाचे साम्राज्य पसरवीलेले असते. लोभ मोह आपल्याला डोळस असूनही नेत्रहीन बनवीतात. कारण त्यामागे आपला असा समज असतो कि जास्तीत जास्त संपत्ती साठवील्याने आपण श्रीमंत होवू. परंतू अशी संपत्ती कोणाच्याही उपयोगात पडत नाही जी स्वार्थी हेतूने साठविण्यात येते.

  आपल्यातील स्वार्थ आपली बुद्धी भ्रस्ट करतो. कारण स्वार्थ हा एक हिंसक राक्षस आहे. कारण स्वार्थाच्या मागे लोक तळागळाच्या स्तराला जातात. द्वेष मत्सर हे आपल्यालाच मनाला यातना देतात. कारण जेव्हा आपण इतरांशी प्रतिस्पर्धा लावतो. तेव्हा हे दुर्गूण आपल्या मानसिक स्वास्थ्यास अक्षरशा कोलमडून टाकतात. इतरांचे मनोमन वाईट चिंतल्यामुळे त्या गोष्टी आपल्याच आयुष्यात घडण्यास सुरवात होते. अशाप्रकारे आपल्यातील दुर्गूण आपल्या जीवनात अंधकार पसरवीत असतात.

  परंतू  जेव्हा आपण आपल्यातील सुगूणांवर लक्ष केंद्रीत करतो. तेव्हा मात्र आपले जीवन प्रकाशमान होवून जाते. ज्याक्षणी आपल्यातील प्रेम वात्सल्य जागृत होते. त्याक्षणी आपल्यातील आईपण प्रकाशमान होते. ज्यात निस्वार्थभाव असतो. जे कोणत्याही अटीशिवाय उभे राहते. जिथे गारवा असतो आणि उबही असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्यातील दयाभाव जागृत होतो. तेव्हा आपल्याला इतरांच्या दु:खाची अनुभूती होते. इतरांच्या जागेवर जावून त्यांच्या समस्या समजून घेण्याची योग्यता आपल्यात येते. कितीतरी होरपळलेली आणि उध्वस्त झालेली आयुष्ये पुन्हा उभारण्यासाठी आपण धडपडू शकतो. अशाप्रकारे आपल्या आयुष्यात सुगूणांचा स्विकार करणे म्हणजे अनेकांच्या आयुष्यांना प्रकाशीत करणे. सुगूणांचा स्विकार करणे म्हणजे दिव्याप्रमाणे तेवत राहणे. असा त्याचा अर्थ होतो.

   सुगूणांचा स्विकार करणे म्हणजे उमेदीने चालत राहणे. जेव्हा आपण स्वत:मध्ये उमेद जागवीतो. तेव्हा आपल्यामुळे कितीतरी जणांचे मनोबल वाढते. जीवन कधीही सरळ रेषेप्रमाणे नसते. त्यात उतार-चढाव खाच- खळगे हे येतच असतात. परंतू जीवनाला सुगूणांची साथ असल्यास ते सोपे आणि सहज करता येवू शकते. जेव्हा आपण स्वत:मध्ये सेवाभाव जागृत करतो. तेव्हा कित्येकांची सेवा आपल्या हातून घडू शकते. दीन दु:खीतांच्या मनाला आपण दिलासा देवू शकतो. ज्यामुळे त्यांच्या विझत चाललेल्या आशेला पंख फुटतात. अशापद्धतीने एका दिव्याने अनेक दिवे प्रज्वलीत केले जातात आणि जीवनातून अंधकार नाहीसा होतो. कारण जो स्वनिर्मीत होता. आपण स्वयंप्रकाशीत होतो आणि प्रकाशाला सर्वत्र पसरविण्याचे मर्म आपल्याला कळू लागतात.

1. आशेचा दिवा पेटवावा

   आशा ही आपल्या उमेदीस जगवत ठेवते. तिला काहीही झाले तरीही श्वास सोडू देत नाही. जेव्हा आपण आपल्या जीवनात आशेचा दिवा दैदीप्यमान करतो. तेव्हा आपण कशाही पुढे हार मानत नाही. जीवनात कितीही संकटं आली तरीही सकारात्मक राहण्याचे बळ आपल्यात येते. आपण निरंतर गतीमान राहतो. कारण आपण सकारात्मक विचारांनी भरलेले असतो. आपल्या समोर कितीही मार्ग खुंटले किंवा बंद झाले. तरीही आपण मनाने खंबीर असतो. जो आशेचा दिवा आपण प्रज्वलीत केलेला असतो. तो आपल्या जीवनप्रवासात नव नविन मार्गाचा शोध लावण्यास सक्षम असतो.

2.संयमचा दिवा पेटवावा

  अंगी संयम बाळगल्यास कोणत्याही गोष्टीतील आनंद हा कितीतरी पटीने वाढतो. संयम आणि चिकाटी ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी निसर्गात सर्वत्र दृष्टीक्षेपास पडतात. कृमी-किटकांपासून ते झाडे-वेलींपर्यंत सर्वांमध्ये त्यांची प्रचीती येते. संयम हा न आवडणारा असतो आणि त्यात कडवटपणाही असतो. तरीही त्यास अंगीकारण्याचे धाडस करावे लागते. तेव्हाच भविष्यात गोड फळे चाखायला मिळतात. भविष्यात एखाद्या राज्याप्रमाणे जीवन जगायचे असल्यास आज संयम राखणे अनिवार्य असते. कारण वर्तमान क्षणात लावलेला संयमाचा दिवाच भविष्यातील अंधार दूर करू शकतो.

3. माणुसकीचा दिवा पेटवावा

  आपण कधी-कधी माणूस म्हणून कमी पडतो. कारण आपल्या वर्तनातून माणुसकीची झलक दिसत नाही. माणसाकडे असलेले विशेष आभूषण म्हणजे त्याची भावनाप्रदानता व संवेदनशीलता. कधि आपल्या वर्तनाने कोणाचे मन दुखावले जाते. तर कधि एखाद्याच्या मनात चाललेली घालमेल थांबते आणि त्याला दिलासा मिळतो. परंतू त्यानंतर आपल्या मनाच्या प्रतिक्रीया कशा असतात. ह्यावरून आपल्यातील माणसाची खरी ओळख होते. आपल्या वागण्यातून कोणास दिलासा मिळत असेल. आपल्या बोलण्याने कोणाच्या मनावर उपचार होत असतील. आपल्या हसण्याने कोणास आनंद होत असेल. कोणाचा हात हातात घेतल्याने त्यास आधार मिळत असेल. तसेच आपले कोणाच्या पाठीशी उभे राहणे त्याचे मनोबल वाढत असेल. तर हे करणे माणुसकीचा दिवा प्रकाशीत करण्यासारखे आहे. ह्या दिव्यास नेहमी तेवत ठेवावे.

4. ज्ञानाचा दिवा पेटवावा

  ज्ञान  म्हणजे केवळ पुस्तकातून मिळविलेले ज्ञान नाही. शिक्षण घेणे ही आपल्या जीवनाची गरज आहे. शिक्षणाने आपल्या विचारात अनेक गोष्टी स्पष्ट होतात. त्याचबरोबर विचारात प्रगाढता येते. परंतू त्याच्या जोडीला संस्कार तसेच जीवनमुल्य आपला सर्वांगिण विकास करण्यास महत्वाची असतात. त्यामुळे आपण मुळांशी जुळलेले राहतो. जीवनमुल्य आपल्याला विनम्र बनवीतात आणि संस्कारांनी आपण संस्कृती जपतो. ज्ञान वाटल्याने कमी होत नाही. त्याउलट त्यात भरच पडते. ज्याला त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाचा अभिमान होतो. तो ह्या जगात फसतो परंतू जो ज्ञान प्राप्त करून सत्वशील होतो. तसेच त्या ज्ञानाने इतरांची आयुष्ये प्रकाशीत करतो. त्यास कधीही मृत्यु येत नाही. तो अजरामर होतो. तेव्हा ज्ञानाचा दिवा कायम तेवत ठेवावा.

   मित्रांनो, दिव्याकडे खूप उजेड नसतो आणि खूप उबही नसते. परंतू तरीही अंधाराला भेदण्याचे सामर्थ्य त्यात असते. कारण काळोखात दिव्यास बघून आपल्या मनात आशेचा किरण जागरूत होतो. दिवा आपल्याला कदापि उमेद हारू देत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात आपल्यापुरते प्रकाशीत झालो. तर इतरांनाही प्रकाशमान होण्याचे बळ देवू शकतो. जीवनात मोठी स्वप्न तसेच मोठ-मोठ्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा परोपकारास अंगीकारून  दिव्याप्रमाणे जगले पाहिजे. त्यातच सुख समाधान आहे. त्यातच मानसिक शांतता आहे आणि कित्येकांसाठी प्रोत्साहन देखील आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *