मुलांच्या संगोपनात दुरदृष्टी असावी

आपल्या आयुष्यात मुलांचे असणे सुंदर स्वप्नासारखे असते. कारण मुलांमधील निरागसपणाने आपल्या मनावरील कितीही मोठा ताण कमी होतो. मुलांचा सहवास, त्यांचे कर्णमधुर बोलणे तसेच त्यांचे घरभर वावरणे घराला घरपण आणते. त्याचबरोबर आपल्यात सकारात्मक उर्जा भरते. त्यामुळे आई-वडील मुलांशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाहीत. मुले आई-वडीलांचे जगच व्यापून टाकतात. त्यामुळे आई वडील मुलांच्या संगोपनात आपल्या हृदयाचा कस लावतात. आपलं सर्वस्व ते मुलांवर ओवाळून टाकतात. परंतू मुलांच्या ह्याच वयात लाड-कौतुकाबरोबर त्यांच्या बालमनावर योग्य संस्कार बिंबविण्याची गरज असते. कारण कोवळ्या वयात झालेले संस्कार भविष्यात एक व्यक्तीमत्व उभारत असतात. तेव्हा मुलांचे संगोपण दुरदृष्टीने करणे ही एका कुटूंबाची जबाबदारी असते. आई ही मुलांची पहिली गुरू असते. तिच्या अजोड प्रेमाला संस्कारांची जोड लाभली कि मुलांच्या संगोपनात तिळमात्रही कमतरता उरत नाही. जसे शेतात बियाणे पेरण्या अगोदर मातीची मशागत करावी लागते. जेव्हा कोवळी रोपे जमिनीवर दिसू लागतात. तेव्हा त्यासोबत अनावश्यक आणि मुख्य पिकास त्रास देणारी रोपेही जोमाने वाढू लागतात. ही रानटी झाडे समाजातील असभ्यता, वाईट संगत, वाईट व्यसने ह्याकडे दिशानिर्देश करतात. ज्यांच्या वाढीकरीता काहीही विशेष करावे लागत नाही. परंतू शेतात भरघोश उत्पन्न यावे ह्यासाठी मात्र पिकाची योग्य निगराणी आणि पिकास योग्य सुरक्षा प्रदान करण्याची गरज भासते. योग्य प्रमाणात खत पाणि द्यावे लागते. 

  डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते. तेव्हा आपल्या पदरात मोत्यासारखे धान्य पडते. त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांनाही त्यांच्या लहान वयापासून योग्य संस्कारांशी परिचित केले. तर ते स्वत:च सुसंस्कृत विचारांनी त्यांच्या जीवनाला योग्य वळण देण्यास समर्थ होतील. तसेच आई वडीलांनी त्यांच्या जीवनात घेतलेल्या अनुभवरूपी शिक्षणातून प्रेरणा घेवून मुलांना वेळोवेळी चांगल्या वाईटाची समज दिली. तर ते सुविद्द आणि सुसंस्कृत होवून योग्य माणूस बणतील. त्यामुळे एका सुदृढ समाजाची नीव ठेवली जाईल. तेव्हा प्रत्येक आई-वडीलांचे आणि कुटूंबाचे कर्तव्य तसेच जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्याचे बाळकडू पाजून तसेच स्वकृतीतून तसेच स्वपराक्रमातून  दुरदृष्टीने घडवावे. 

   आई वडीलांनी मुलांना जन्म देवून जग दाखविले असले. तरीही मुलांच्या रूपात एक स्वतंत्र व्यक्तीमत्व घडविण्याची विशेष जबाबदारी त्यांच्यावर असते. तेव्हा आपल्या मुलांसाठी सर्वार्थाने योग्य आई वडील बनणे ही सदिच्छा त्यांनी आपल्या मनात बाळगली पाहिजे. त्यासाठी स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करून स्वत:च्याच आत्मपरीक्षणाने त्याची सुरवात केली पाहिजे. कारण आई वडीलांचे अनुकरण करूनच मुलांच्या आयुष्याची सुरवात होत असते. त्यामुळे आई वडीलांचे आपसातील संबंध, कौटूम्बिक वातावरण व वागण्या बोलण्यातील सभ्यता ह्या गोष्टींवर सखोल विचार करून त्यात सुधार करणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे मुलांवर कोणत्याही प्रकारच्या कठोर शिक्षेचा अवलंब न करता आई वडीलांनी स्वत: परिवर्तनशील राहून त्यांच्या मनावर पैलू पाडावेत. कारण शिक्षा देवून मुलांना आपल्या मताप्रमाणे घडविताही येवू शकते. परंतु त्यामुळे  त्यांच्या आत्मसम्मानास गेलेला तडा व मनावर झालेल्या आघातामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासावर होणाऱ्या दुष्परीणामान्ना थांबविणे अशक्य असते.  एका जोडप्याने आई वडील म्हणून आपल्या मुलांप्रती केलेल्या समर्पणानेच मुलांमधल्या स्वतंत्र व्यक्तीमत्वास विकसित होण्यास पूर्ण वाव मिळतो.   

1. मुलांना लहान वयापासूनच आदराने वागवावे.

  पूर्वी राजे-महाराज्यांच्या मुलांच्या नावापुढे ‘राजे’ असे लावल्या जात असे. त्यांच्याशी एकेरी शब्दात न बोलता अहो-जाहो करण्यात येत असे. कारण राज्याचा एक भावी वारसदार म्हणून भविष्यात त्यांच्या खांद्यांवर येणारी राजपाटाची जबाबदारी  त्यांना सक्षमपणे सांभाळता यावी हा त्यामागचा दृष्टीकोन होता. ह्याकरीता त्यांच्यात उच्च आत्मसम्मान निर्माण व्हावा म्हणून लहानपणापासून त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देवून मानसिकदृष्ट्या  तयार करण्यात येत असायचे. परंतू आपण मात्र मुले लहान असतांना त्यांच्याशी कसेही वागतो, लहान सहान चुकांवरून त्यांना अपमानित करतो. अत्यंत घालून पाडून बोलतो. त्यांच्यावर अविश्वास दाखवितो. ते आपल्या अपेक्षेस पात्र ठरले नाही तर त्यांच्यावर टीका करतो. तसेच वारंवार त्यांना त्यांच्या चुका दाखवितो. त्यांच्यावर हात उगारन्यासही मागे पुढे बघत नाही. त्यामुळे मुलांच्या आत्मसन्मानावर दुष्परिणाम होतो आणि त्यांचा स्वत:वरचा विश्वासही ढासळतो. म्हणूनच मुलांना कोणत्याही गोष्टीची समज देतांना ती सौम्य शब्दात व एकांतात द्द्यावी आणि कौतुक करायचे असल्यास चारचौघात करावे. असे केल्याने ते स्वत:च्याच नजरेत उंच उठतात. आपण केलेल्या स्तुती मुळे त्यांचे मनोबल वाढण्यास मदत मिळते. अशाप्रकारे क्षुल्लक वाटणारे परंतू अतिशय महत्वपूर्ण बदल मुलांशी वागतांना केल्यास आपण मुलांमध्ये आत्मविश्वास जागवू शकतो.  

2. मुलांना स्त्रियांचा आदर करणे शिकवावे.

  आई-वडील मुलांचे प्रेरणास्थान असतात. मुले त्यांनाच बघत मोठी होतात. आणि त्यांचेच अनुकरणही करतात. जर घरात वडील मुलांच्या समोर आईचा अनादर करत असतील. तसेच तिच्या क्षेत्राचा मान राखत नसतील. तर कदाचित मुले पुढे मोठी झाल्यावर वडीलांचे अनुकरण करतील. नाहीतर त्यांच्या मनात आई प्रती सहानुभूती निर्माण होवून वडीलांप्रती द्वेष निर्माण होवू शकतो.  परंतू जर वडील आईला प्रोत्साहीत करत असतील. गरज पडल्यास कामात मदत करत असतील. महत्वाच्या निर्णयात आईलाही सहभागी करत असतील. आईला वेळ पडल्यास भावनीक आधार देत असतील. तिला समजून घेत असतील. तर मुले मोठी झाल्यावर त्याच बहुमुल्य गोष्टींचे अनुकरण करण्याचे शिक्षण त्यामधून ग्रहण करतील. तसेच त्यांच्या आयुष्याला कौटुंबिक सुखाने स्वर्गाचे रूप येईल. त्याचप्रमाणे आई व वडिलांसाठी त्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण होईल. 

3. मुलांना प्राण्यांवर प्रेम करणे शिकवावे.

  आपण आयुष्यात कितीही प्रगती केली तरी आपण नेहमी निसर्गाशी निकट राहिले पाहिजे व जुळवून घेतले पाहिजे. त्याचबरोबर प्राणिमात्रांवर प्रेम केले पाहिजे. कित्येकदा आपण मुलांसमोर एखाद्या कुत्र्यावर दगड भिरकावतो. तसेच नकळतपणे मुलांनाही तसे करण्यास प्रेरित करतो. त्यामुळे प्राण्यांवर दया दाखविण्याच्या विचारापासून मुलं परावृत्त होतात. त्याऐवजी मुलांना हे शिकवले पाहिजे कि प्राण्यांनाही प्रेमाची भाषा कळते. दगड भिरकावण्या ऐवजी आपण त्यांना पोळी खाण्यास दिली, पिण्यास पाणि दिले तर त्यांच्याशी मैत्री करणे सोपे होते. असे केल्याने मुलांच्या मनातून कुत्र्याबद्दलची भिती कायमची निघून जावू शकते. कारण आपण त्यांना राग व भितीची जागा मैत्री आणि प्रेमाने भरून काढण्यास शिकविले.

4. मुलांना महत्वाकांक्षी असणे आणि विनम्रता शिकवावी.

मुलांना  मेहनत करण्याचे महत्व, संयम राखण्याचे गोड परीणाम आणि आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी आतुर असणे ह्या सर्व गोष्टी पालकांकडूनच शिकायला मिळतात. आई-वडील स्वत: महत्वाकांक्षी असले तर मुलांना आपोआपच ध्येयवादाचे धडे मिळत जातात. तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यात निरंतर प्रगती करत राहण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात अडचणींच्या पुढे हार न मानता यशाची एक एक पायरी ते चढत जातात.  एखाद्या फळं लागलेल्या आणि फळांच्या वजनाने झुकलेल्या झाडाच्या फांद्याचे उदाहरण मुलांच्या डोळ्यापुढे ठेवावे. जेणेकरून त्यांनी आयुष्यात जे काही मिळवले आहे. त्याच्याशी ते संलग्न न होता पुढे पुढे मार्गक्रमण करत राहतील. त्यामुळे त्यांच्यात अहंकार वाढ्णार नाही. कारण आयुष्याच्या शेवटी सर्वकाही मागेच सोडावे लागते. तेव्हा अहंकाराची जागा त्यांनी विनम्रतेने भरून काढली तरच ते स्वत:ला सिद्ध करू शकतील.

5. मुलांमध्ये देशभक्ती जागवावी.

  आपल्या गौरवशाली इतिहासात देशासाठी प्राण पणास लावणार्‍या विरांच्या गाथांनी युगा युगांपासून देशबांधवांचे कान तृप्त झाले आहेत. त्यामधून आपल्या विचारांनाही मातृभूमीच्या गौरवाचा सुगंध लागला आहे. हा सुगंध पुढे येणाऱ्या पिढ्यांच्या मनालाही शिवावा म्हणून  मुलांना मोठे करत असतांना वीरांच्या शौर्यकथा ऐकवाव्यात. जेणेकरून त्यांच्यातही देशप्रेम जागृत होईल. आजही सिमेवर तैनात सैनिक जे उन, वारा, पाऊस ह्यांची तमा न बाळगता देशाच्या संरक्षणासाठी चोविस तास उभे असतात. ही माहिती आत्मसात केल्याने मुलांच्या ज्ञानात भर तर पडेलच. त्याचबरोबर सैनिकांचे देशासाठी समर्पण बघून त्यांच्या काळजातही देशप्रेमाचे बीज रोवले जाईल. उच्च शिक्षण प्राप्त करून मोठ मोठ्या पदव्या मिळवाव्यात हे स्वप्न मनाशी बाळगून सर्वच मोठे होत असतात. परंतू देशप्रेमाने भारावलेला एक मामुली परंतू देशाप्रती कर्तव्यदक्ष असलेला सैनिक बनण्याची स्वप्नही काही मुलांना प्रेरित करतील. तेव्हा आपलेही देशासाठी आपल्या देशबांधवांसाठी काही ना काही योगदान असले पाहिजे हे विचार त्यांना स्वस्थ बसू देणार नाहीत.

6. मुलांना योगाभ्यासाचे महत्व शिकवावे.

जर आपण मुलांना लहानपणापासून मेडीटेशनचे महत्व समजवून सांगितले. तर मुले अंतर्मनाचा प्रवास करणे शिकतील. त्यांना अनुलम्बीत वाढीबरोबर आध्यात्मिक खोलीचेही महत्व कळेल. स्वत:च्या व्यक्तीमत्वाबद्दल कळू लागेल. पुढे ते त्यांच्या आयुष्यात येणार्‍या प्रतिस्पर्धांना सकारात्मक दृष्टीकोणाने सामोरे जातील. त्यांचे चित्त एकाग्र होईल आणि त्यांच्यातील विशेषतान्ना ओळखण्यात ते समर्थ होतील. त्यानुसार ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू  शकतील. त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.

7. मुलांना पैस्याविषयीचे नियम पाळणे शिकवावे.

  आई-वडील आपल्या मुलांना पैसे तर देतात. परंतू त्यांना पैस्याचा उपयोग कोठे करावा आणि पैस्याचा अपव्यय करू नये हे जर शिकवीले नाही. तर मुलांना पैसे हाताळण्याचे नियम कधिही कळणार नाहीत. त्याचबरोबर त्यांना पैसा सांभाळणे ही जमणार नाही. कारण कष्ट केल्याशिवाय मिळालेल्या पैसाचे मुल्य समजण्यासाठी त्या संबंधीत नियम जाणून घेणे आवश्यक असते. आपल्या मिळकतीपेक्षा जास्त  खर्च करू नये. ‘अंथरून पाहून पाय पसरावे’ ही म्हण कायम लक्षात  ठेवावी. पैस्याच्या बचतीस पहिले प्रादान्य द्यावे. जेणेकरून अडचणीच्या वेळी कोणासमोर हात पसरविण्याची वेळ येणार नाही. मिळकतीचा काही भाग दानधर्मासाठी ठेवावा. कर्ज घेवून कोणतीही वस्तू खरेदी करू नये. मुलांनी  मोठे झाल्यावर अशा पद्धतीने पैसा हाताळला. तर त्यांच्यावर कधिही वाईट वेळा येणार नाहीत.

   मुलांना मोठे करतांना हे मुलभूत नियम पाळण्याचे संस्कार त्यांच्यावर आई वडीलांनी केल्यास एक सुदृढ पालकत्व समाजात रचले जाईल. कारण येणाऱ्या पिढ्या चुकीच्या पालकत्वामुळे एका संघर्षमय जीवनाचा आजीवन सामना करत असतात. ते त्यांच्या आयुष्यातील नात्यांना योग्य न्याय देवू शकत नाही आणि अपयशी जीवन जगत राहतात. आज जे आपल्यासाठी एक लाडके बाळ असते उद्या तेच बाळ समाजातील कर्तव्यदक्ष नागरिक बनणार असतो. तेव्हा त्या बाळास घडवीतान्ना आपला दृष्टीकोन व्यापक असलाच पाहिजे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *