
आतापर्यंत होत आलेल्या वेगवेगळ्या कालखंडात स्त्रियांकडे समाजातील चिवट चालीरीती व रूढी परंपरांमुळे एक माणूस म्हणून पाहिले गेले नाही हे लक्षात येते. त्याचप्रमाणे काळ कोणताही असो पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपले पाय जमविण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले हे सुद्धा कटाक्षाने जाणवते. फार पुर्वीच्या काळात बालविवाह पद्धतीने लग्न होत असत आणि लहान लहान मुलींची एखाद्द्या विदुराशी किंवा वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न लावले जात असे. त्या काळात स्त्रियांना चुल आणि मुल इतकेच चार भिंतींच्या आतले मर्यादीत जीवन जगावे लागत होते. स्त्रियांचे शिक्षण घेणे हे अपराधासमान मानले जात होते. स्त्रियांनी बैठकीत येवून बसण्यास व आपली मते मांडण्यास मज्जाव होता. पुरूषी अहंकाराच्या दबावात त्या आपले आयुष्य व्यतीत करत होत्या. स्त्रिच्या माघारी पुरूषास कितीही लग्ने करण्याचे परवाणे होते. परंतू लहान वयातच विधवेचे जीवन पदरात पडलेल्या मुलींना मात्र संपूर्ण आयुष्य एकट्याने व आश्रीतासारखे अपमानास्पद जगण्याचे अग्निदिव्य पार करावे लागायचे. अशाप्रकारे त्या काळात स्त्रियांचे जीवन अतिशय वेदनादायी होते. त्यांना एखाद्द्या निर्जीव वस्तू प्रमाणे समजण्यात येत असे. ज्याप्रमाणे स्वयंपाकातला एखादा जिन्नस संपताच पुन्हा नविन जिन्नस आणून भरावा त्याप्रमाणे पत्नीचे निधन झाल्यावर तिचे दहावे घालून अकराव्या दिवसापासून पुन्हा लग्न करण्यासाठी वधू शोध मोहीम सुरू करण्यात येत असे. स्त्रियांसाठी त्या काळात केवळ आपले असणेही शिक्कामोर्तब करणे अत्यंत कठीण होते, स्वत:चे अस्तित्व स्थापित करणे तर दूरच राहिले. आताच्या काळात मात्र स्त्रियांना सर्वतोपरी समाजात स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उंबरठ्याबाहेरच्या विश्वातही स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाचा ध्वज रोवला आहे. परंतू तरीही स्त्री – पुरूष हा भेदभाव काही संपुष्टात आला नाही. घरोघरी स्त्रिया एक माणूस म्हणून हक्क प्राप्त करण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर अजूनही लढा देत आहेत.
स्त्रिया पुरूषांच्या खांद्या ला खांदा लावून काम करीत आहेत हे ही म्हणणे त्यांच्या दृष्टीने अयोग्य ठरेल. कारण निसर्गाने बहाल केलेल्या जबाबदार्या स्त्रियांच्याच खांद्यावर असल्यामुळे स्त्रि व पुरूष अशी तुलना कदापि होवू शकत नाही. कारण स्त्रिया ह्या दोन्हीही गोष्टी अत्यंत सराईतपने पार पाडत आहेत. स्त्रियांना शक्तीचे स्वरूप म्हणतात ते असेच नाही. आज स्त्रियांनी स्वत:च स्वत:च्या परिस्थितीवर, स्वत:च्या क्षमतांवर मात करत आज मोठा पल्ला गाठला आहे. हे कितीही खरे असले तरी स्त्रिची घरातील महत्वपूर्ण भुमिका व तिच्या स्त्रीत्वाच्या मर्यादा ह्यांचा तिलाच विसर पडता कामा नये. आजही ज्या स्त्रिया स्वेच्छेने गृहिणी आहेत, त्यांनी त्यांच्या त्या भुमिकेला कमी समजू नये कारण स्त्रि ही घराचा भक्कम कणा असते म्हणूनच घर कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही. स्त्रियांनी सर्वकाही शिकून तसेच अर्थार्जन करून कोणत्याही परिथितीला तोंड देण्याची तयारी ठेवणे ही त्यांची दुरदृष्ट्टी आहे आणि काळाची गरजही आहे. परंतू त्यांनी आपल्या त्या कर्तुत्वास व्यक्तीगत महत्वाकांक्षेशी जोडू नये. कारण ज्या कर्तुत्ववान स्त्रियांची नावे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीली गेली त्या रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, रमाबाई आंबेडकर ह्यांना उदाहरण म्हणून पाहिले असता त्यांनी स्त्रीत्वाच्या पवित्र मर्यादा राखूनच आपल्या अस्तित्वाचा ठसा आपल्या सर्वांच्या मनात उमटवला. तेव्हा स्त्रियांनी त्यांचे स्वतंत्र विचार व त्यांनी आपल्या कर्तुत्वाने आकाशाला घातलेली गवसणी ह्या गोष्टींनी आपल्याच विनम्र आणि सुसंस्कृत स्वरूपास, आपल्याच सहनशिलतेतील शक्तीस त्याचप्रमाणे आपल्याच कणखरपणास आणि आपल्याच हृदयातील वात्सल्याच्या बहुमुल्य अलंकारास मागे टाकता कामा नये. स्त्रि ची हीच खरी ओळख आहे. तेव्हा आजच्या स्त्रिला ह्या गोष्टीचा विसर पडू नये. समाजातील वाईट आणि घाणेरड्या प्रवृत्तींना वेसण घालण्याची ताकद आजही स्त्रियांमधेच आहे. प्रत्येक स्त्रिने आपले आद्य कर्तव्य समजून तिची जबाबदारी पार पाडल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील.
एक सुशिक्षीत स्त्रि संपुर्ण घराला सुशिक्षीत बनविते. जर स्त्रियांना त्यांच्या जन्म घेण्यामागचा दैवी संकेत कळला तर मानवी जीवनाचे स्वरूप पालटण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा स्त्रियांनी स्वत:कडे लक्ष देणाची गरज आहे. कारण काळ कोणताही असो स्त्रिची भुमिका ही घरात व समाजातही अत्यंत महत्वाची आहे आणि तशीच कायम राहणार.
1. स्त्रिने वृक्षाप्रमाणे बनावे.
वृक्ष नेहमी आकाशाकडे झेप घेत असतात. सुर्याच्या किरणांना स्वत:मध्ये समावून घेतात. आपल्या फांद्यांना पसरवून ते वाटसरूंना सावली देतात. वृक्षांची धाव प्रगतीच्या दिशेने असते. तरीसुद्धा त्यांची मुळे मातीशी जुळलेली असतात. वृक्ष वर जितका जास्त डेरेदार दिसतो. तितकीच त्याची मुळे जमीनीत खोल जातात आणि त्यामुळेच कितीही वादळ वार्यात वृक्ष पुर्ण शक्तीनिशी उभा राहतो. त्याचप्रमाणे अन्न, पाणि आणि पोषण देणार्या मातीचा त्याला कधिही विसर पडत नाही. ज्याक्षणी वृक्षांना फळे लागतात. वृक्षाच्या फांद्या मातीचे आभार मानन्याकरीता झुकतात. वृक्षाचे हे मौल्यवान गुण प्रत्येक स्त्रिने अंगिकारले पाहिजे. त्यांनी स्वत:मधे आजच्या युगाप्रमाणे बदल आणलेच पाहिजे. परंतू स्त्रि जन्मामागच्या मुळ हेतूचा त्यांना कधिही विसर पडू नये. त्याचप्रमाणे आपली सात्विकता व स्त्रित्वाचा आदर त्यांच्याकडून राखला गेला पाहिजे.
2. स्त्रियांनी आपल्या वेशभुषे कडे लक्ष द्द्यावे.
आपण आपल्या अंगावर जे कपडे परिधान करतो. त्याचे दोन हेतू असतात. एक म्हणजे अंग झाकणे आणि दुसरे म्हणजे आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणे. आजच्या काळात स्त्रियांसाठी विविध वेशभुषा चलनात आहेत. ज्या आताच्या जीवनशैलीस शोभतील अशा आहेत. परंतू त्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडत नाही. स्त्रिया जी वेशभुषा करतील त्यामधून त्यांच्या स्त्रित्वाला श्रेष्ठ रूप आले पाहिजे लाजीरवाने नाही ह्याची काळजी त्यांनी स्वत:च घेतली पाहिजे. त्यांच्या अंगावरील कपड्यांवरून त्यांच्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेत आकर्षणाचे भाव येवू नयेत तर आदर व साम्मानाने नजरा खाली गेल्या पाहिजे. कोणाचिही वासनांध नजर त्यांच्या शरिरावर खिळून राहील अशी चुकीची वेषभूषा करणे स्त्रियांनी जाणीवपूर्वक टाळावे. अन्यथा त्यांच्या मनाचे सौंदर्य कोणासही दिसणार नाही. फॅशनच्या नावाखाली अनेक ठिकाणी फाटलेले कपडे घालण्याची पद्धत स्त्रियांना शोभून दिसत नाही किंवा अंगापेक्षा लहान असलेले कपडे स्त्रियांच्या अस्मितेचे धिंडवळे काढतात. आपल्या महान इतिहासातील अंगभर कपडे आणि दागिने ल्यालेल्या स्त्रियांना बघूनच स्त्रिस ‘लक्ष्मी’ म्हणून संबोधले गेले असावे. तेव्हा स्त्रियांनी कपडे असे परिधान करावे जे त्यांच्या शरिराचा मानही राखतील आणि आजच्या आधुनिक जीवनशैलीस शोभतीलही. त्याचबरोबर ज्यामुळे स्त्रियांच्या नव विचारातही सात्विकता येईल.
3. स्त्रियांनी स्वत:ला अंतर्मनातून बळकट बनवावे.
आजच्या युगातील प्रतिस्पर्धांचा प्रत्येकालाच चांगला वाईट अनुभव येत आहे. स्त्रिया त्यातही अग्रेसर आहेत आणि ठिकठिकाणि बाजी मारतांना दिसत आहेत. असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे स्त्रिया नाहीत. ह्या झाल्या बाहेरच्या जगातील चढाओढी. परंतू जर स्त्रियांनी अंतर्मनाचा प्रवास केला तर त्यांना स्वत:विषयी कितीतरी अशा गोष्टी कळतील ज्याचा आजवर कोणी उल्लेखही केलेला नसेल. स्त्रियांच्या मनात मायेचा सागर आहे आणि ही स्त्रियांना लाभलेली बहुमूल्य देणगी आहे. जर ही गोष्ट प्रत्येक स्त्रिला कळली तर विश्वातील मानवजातीला काळीमा फासणार्या ह्या सर्व वाईट प्रथा, वाईट प्रर्वृत्ती, वाईट चालिरिती तसेच स्त्रिला उपभोगाची वस्तु माननारा पुरूषी अहंकार ह्या गोष्टींवर मात होवून स्त्रिमधील ‘आई’ पणाचा सन्मान होवू शकतो. परस्त्रि मातेसमान ह्या गोष्टी केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून निदर्शनात येवू शकतात. लेकी-बाळी स्वतंत्रपणे हसु बागळू शकतात. सर्वत्र शुद्ध विचार, शुद्ध आचरणाचा अनुभव येवून जणुकाही पृथ्वीवर स्वर्गच अवतरेल. तेव्हा स्त्रियांनी त्यांना निसर्गाने बहाल केलेल्या अंतर्गत गुणांना समजून आपले जीवनाचे ध्येय ठरवावे.
4. आईच्या हातात पुढच्या पिढीचे भविष्य आहे.
स्त्रियांसाठी असे म्हंटले जाते कि स्त्रि ही क्षणांची पत्नी व अनंत काळाची माता असते. ह्यावरून हे लक्षात येते कि स्त्रिला मिळालेली आईची भुमिका सर्वात श्रेष्ठ आहे. स्त्रिचे आई हे रूप समाजात अनेक सुंदर बदल घडवून आणण्यास समर्थ आहे. त्याची सुरवात प्रत्येक स्त्रिने स्वत:पासून केली पाहिजे. तिने जर आपल्या मुलांना योग्य संस्कारात वाढविले व त्यांच्या मनात स्त्रित्वाचा आदर ती निर्माण करू शकली तर एक सुसंस्कृत समाज घडविण्यात तिचा मोठा वाटा असेल. आपल्या महान इतिहासात अशा थोर आयांची नावे नमुद आहेत. ज्यांनी त्यांच्यातील आईपणाला उच्च्कोटीचा दर्जा दिला आणि त्यामुळे आपल्या इतिहासाला महानता लाभली. तेव्हा स्त्रियांनी त्यांच्यातील आईला नेहमी जागृत ठेवावे. जी क्षमाशील असते आणि क्षमेतूनच समाजात वावरणार्या नराधमांच्या मनावर नैसर्गीक उपचार करते. त्याचबरोबर त्याला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याची संधी देते. जी स्वकृतीतून पुढच्या पिढिस आयुष्याचे धडे गिरवते. तिचा तिच्या संसारासाठी केलेला त्याग मुलांना त्यांच्या जीवनात मोठमोठे पराक्रम गाजविण्यासाठी प्रवृत्त करतो. तेव्हा स्त्रियांनी आकाशात कितीही भरार्या मारल्या तरिही त्यांच्यातील आईपणच त्यांचा पाया भक्कम व मजबूत बनवून ठेवतो.
मित्रांनो, आपल्या आयुष्यात असणार्या स्त्रिया म्हणजे आपला अभिमान असतात. कारण त्यांच्या मुळेच घराचे व समाजाचेही संतुलन राखले जाते. ज्या आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या असतात. आपले आंतरिक शुद्धीकरण करण्यासाठी आलेल्या असतात. परंतू त्यांना आपल्या संस्कृतीत पाय घट्ट करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता असते. तेव्हा त्याची सुरवात सर्वप्रथम आपल्याच घरातील आई, बहिण, बायको, मुलगी ह्यांना आपल्या आयुष्यात स्त्री म्हणून सम्मान व माणूस म्हणून हक्क देवून केली पाहिजे. कारण त्यांची आपल्या जीवनातील भुमिका कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच स्त्रिच्या प्रत्येक रूपाला सलाम आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)