आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम

घर म्हणजे  आपल्या  भौतिक श्रीमंतीचा बडेजाव दाखविण्यासाठी उभारण्यात आलेली वास्तू नाही तसेच घर म्हणजे दगड विटांनी उभ्या केलेल्या चार भिंतीही नाही. तर त्या चार भिंती घरातील माणसांनी घरात रूपांतरीत होतात. त्यांच्या आपसातील जिव्हाळा व आपुलकीने साध्या झोपडीवजा घरालाही स्वर्गाचे रूप प्राप्त होते. परंतू जेव्हा घरातील माणसांच्या विचारातील मतभेद विकोपाला जातात तेव्हा मात्र घराचे रणांगण होते. बहुतांशी घरांमध्ये आई-वडील ह्यांच्यात होणारी टोकाची भांडणे हा एक अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. कारण त्यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर खोलवर दुष्परिणाम होतात. ज्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येवू शकते. आई-वडीलांमध्ये विवीध गोष्टींमध्ये मत भिन्नता असते. अशावेळी त्यांच्यात वादविवाद होतात. काही काळ दोघांमध्ये अबोलाही राहतो. परंतू त्यांच्यातील ह्या लहान सहान समस्या ते मुलांपर्यंत येवू न देता आपसात संवाद साधून सोडवितात. कारण  कधी कधी ह्या वादविवादांमध्ये लाडी-गोडी तसेच प्रेमही बघायला मिळते. परंतू जेव्हा त्या  दोघांमधील भांडणे भयंकर रूप धारण करतात तेव्हा मात्र  घरात दहशतीचे वातावरण निर्माण होते. वडील घराबाहेर असले कि मुलांना भिती वाटत नाही. परंतू ते घरी आल्यावर पुन्हा दोघांमध्ये  काहीतरी खटके उडतात आणि  वादाला सुरवात होते. कित्येक घरांमध्ये भांडणात शारिरीक हिंसेचाही समावेष असतो. वडीलांचे उग्र रूप तर आईची केविलवाणी अवस्था बघूण मुले घाबरतात. त्यांच्या कोवळ्या मनात खोलवर भिती बसते. असे वातावरण घरात जर रोजच्या रोज असले तर त्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परीणाम होतात तसेच त्यांचा स्वत:वरचा आत्मविश्वासही डळमळीत होतो. त्यांच्या डोक्यात सतत घरातील भांडणे घोंघावत असतात. त्यामुळे ते इतर मुलांपासून लांब राहतात. कारण त्यांना आपल्या व्यक्तीगत समस्या व त्यामुळे सतत मनात असलेली भीती व चिंता कोणाही पुढे व्यक्त होवू द्यायची नसते. शिवाय त्यांच्या अभ्यासातील प्रगतीवरही वाईट परिणाम होतो.

   आई वडील ह्यांच्या दुरावलेल्या नात्याचा तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांवर कधीकधी अत्यंत भयावह परिणाम होण्याची शक्यता असते, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. बऱ्याचदा  मुले घरापासून लांब राहण्यास प्रवृत्त होतात कारण त्यांना घर व घरातील वातावरण असुरक्षित वाटू लागते. अशावेळी त्यांचे  पाऊलही वाईट मार्गावर पडण्याची  शक्यता असते. त्याचसोबत  मुले घरातील अशा वातावरणापासून पळ काढण्यासाठी व्यसनाधीनतेचा किंवा अन्य   वाईट गोष्टींचा अवलंब करू शकतात. ज्या गोष्टी किंवा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवतात त्यांची उत्तरे आपआपल्या मार्गांनी बाहेरच्या जगात शोधण्याचा प्रयत्न करतात. मुलांचा आत्मसम्मान खाली घसरतो त्यामुळे जगाचा सामना करत असतांना त्यांना अनेक अडचणी येवू शकतात.  कारण आई-वडील जे त्यांचे दैवत असतात त्यांचेच असे वागणे बघून मुलांच्या त्यांच्यावरील विश्वासास तडा जातो आणि त्यात त्यांचे भविष्य पुर्णपणे विस्कटू शकते. जीवनाची सुरवात करत असतांनाच जे बघू नये ते पाहिल्याने व जे ऐकू नये ते ऐकल्याने कोवळ्या वयातच अतिशय परिपक्व असल्याप्रमाणे वागतात. त्यांना वेळोवेळी त्यांच्या भावना माराव्या लागल्यामुळे भावनांची किंमत हळूहळू त्यांच्यासाठी कमी होत जाते आणि पुढे हीच एका भावनाशुन्य माणसात परिवर्तीत होण्याची दाट शक्यता  असते. ज्यांच्या साठी इतर कोणाच्याही भावनांची काहीही किंमत राहत नाही. त्यामुळे ते त्यांच्या कुटूंबाला सुखी ठेवू शकत नाहीत. आई-वडीलांच्या भांडणांचे पडसाद इतक्या दुरवर उमटत असतील तर अशी कृत्ये मुलांसमोर करतांना पालकांनी हजारदा विचार करण्याची गरज आहे. आई-वडीलांनी घराला रणांगण बनवू नये. घराला देवालयाचे रूप द्द्यावे. जेणेकरून प्रेम, वात्सल्य, सामंजस्य ह्या सुंदर गोष्टी त्या घराची नीव असतील. आणि त्या घरातील माणसांच्या प्रगतीपुढे आकाश ठेंगणे वाटेल. अशी घरकुले जी आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाने भरपूर तरूण पिढीस जन्मास घालतील.

1.  आई-वडीलांमध्ये मैत्री आणि एकमेकांसाठी आदर दिसावा.

   आई-वडीलांचे व्यक्तीगत संबंध बंद दरवाज्याच्या आत असावेत. त्याचबरोबर त्यांना एकमेकांना ज्या सुचना करायच्या आहेत किंवा एकमेकांच्या चुका  निदर्शनात आणून द्यावयाच्या असतील  तर  हे सर्व गुंते त्यांनी  एकांतात बसून सोडवावेत. मुलांसमोर हे काम कधिही करू नये. कारण त्यामुळे मुलांची द्विधा मनस्थिती होते. त्यांचे कोवळे मन आईची बाजू बरोबर कि वडीलांची बाजू बरोबर ह्याचे आकलन करू शकत नाही. अशावेळी त्यांच्या मनात कोणा एकाविषयी सहानुभूती तर दुसऱ्या विषयी तिरस्कार निर्माण होतो. ते आई वडीलांना एक माणूस म्हणून समजू व जाणू शकत नाहीत.  म्हणूनच  मुलांना त्यांच्यात नेहमी मैत्रीचे नाते दिसले पाहिजे ह्या गोष्टीची काळजी पालकांनी  आवर्जून घेतली  पाहिजे. आई-वडीलांनी मुलांसमोर एकमेकांना नेहमी आदराची वागणूक दिली पाहिजे. त्यांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी मनात ईर्ष्या नाहीतर अभिमान बाळगला पाहिजे. एकमेकांच्या कष्टांची दखल घेवून आजीवन परस्परांना मोलाची साथ दिली पाहिजे. ते पाहून मुलांच्याही मनात त्यांच्या बद्दल आदर व विश्वास निर्माण होतो. आणि घरात परस्परात स्वारस्य तसेच ऐक्य पहावयास मिळते. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि त्याचा त्यांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो  तसेच त्यांचा सर्वांगीण विकासही होतो.

2. आई-वडीलांनी मुलांपुढे आदर्श निर्माण करावा.

  आई-वडील मुलांना प्रतिस्पर्धांमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्याकडून मोठ-मोठ्या अपेक्षाही ठेवतात. परंतू  त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि मुलांकडून अपेक्षा करण्याआधी आई-वडीलांनी स्वत: मुलांपुढे आपल्या कर्तुत्वाने आदर्श निर्माण करणे महत्वाचे असते. त्यांनी स्वकर्तुत्वाने मुलांना प्रेरीत करावे. जर संध्याकाळी मुलांनी स्वखुषीने अभ्यासाला बसणे अपेक्षीत असेल तर आईने टि.व्हि. पुढे बसून मालिका बघणे योग्य नाही. तिनेही तिच्याशी संबंधीत निर्मीतीक्षम  कामात आपला वेळ घालवावा. वडीलांनी घरी परतल्यावर मुलांबरोबर  आणि पत्नीबरोबर वेळ घालवावा. आपुलकीने त्यांची विचारपूस करावी. त्यामुळे पत्नी आणि मुलांशी वडीलांचे नाते सहज आणि मैत्रीपुर्ण होण्यास मदत मिळते. घरात मुलांना असे वातावरण मिळाले तर मुलेही आई-वडीलांच्या अपेक्षा पुर्ण करण्याकरीता परिश्रम घेतील.

3. आई-वडीलांनी महत्वाकांक्षी असावे.

   आई-वडील मुलांचे प्रेरणास्थान असतात. जेव्हा मुले त्यांना त्यांच्या ठरविलेल्या ध्येयात यशस्वी होतांना बघतात तेव्हा मुलांना त्यांचा अभिमान वाटतो. म्हणून आई-वडीलांनी महत्वाकांक्षी असावे. जेणेकरून मुलांमध्ये आत्मविश्वासाची वृद्धी होईल. आणि त्यांच्यातही आपली ध्येये ठरविण्याची हिंमत येईल. जेव्हा आई-वडील एकत्र येवून त्यांच्या जीवनात ध्येय ठरवितात आणि ते पुर्ण करण्यासाठी सोबत मेहनत करतात तेव्हा मुले आपोआपच शिस्तप्रिय होतात. ते त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक  होतात आणि स्वावलंबीही होतात.

4. आई-वडीलांनी मुलांसमोर खोटे बोलू नये

   आपण मुलांना लहाणपणा पासून चांगल्या गोष्टी शिकवितो. कोणाला अपशब्द बोलू नये, कोणाला मारू नये, खोटे बोलू नये अशा अनेक गोष्टींचे धडे देतो. परंतू ह्या सर्व गोष्टी आई-वडीलांच्या कृतीत नसतील तर मुलांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. आणि ते वरवर काही बोलले नाही तरी त्यांच्या मनातून आई-वडीलांचा आदर कमी होत जातो. किंवा मुलेही आई-वडीलांकडून गैरवर्तनाचे धडे गिरवू शकतात. तेव्हा आई-वडीलांनी कधीही असे वर्तन करू नये जे कळत-नकळतपणे मुलांच्या मनावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम करण्यास कारणीभूत ठरेल.

5. आई-वडीलांनी एकमेकांना दिलेले शब्द पाळावे.

   आई-वडीलांमधील स्वारस्य मुलांच्या जीवनातील अत्यंत महत्वाची बाब आहे. जेव्हा आई-वडील एकमेकांच्या शब्दांचा मान राखतात. एकमेकांना दिलेले शब्द पाळणे त्यांच्यासाठी जीवनातील प्राथमिकता असते. तेव्हा मुलांना त्यांच्यातील चांगल्या संबंधांची खात्री पटते. आणि ते त्यांच्या आयुष्यात बिनधास्त होतात. आई-वडीलांना त्यांच्यातील संबंधांचा मुलांवर होणार्‍या दुरगामी परिणामांचा अंदाज असावा. तेव्हाच ते त्यांच्यातील नात्याला श्रेष्ठ स्वरूप देतील.

   आई-वडीलांनी एकमेकांशी  कसे वागावे, कसे वागू नये ह्या गोष्टीची  त्यांच्या वर कोणाचीही बांधीलकी नसते . हे सर्वस्वी त्यांच्या वर अवलंबून असते. परंतू ”आई-वडील” ही केवळ त्या जोडप्याला मिळालेली उपाधी नाही तर त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण जबाबदारी  असते. ती त्यांनी जेवढी उत्तमरीतीने निभावली किंवा त्यात दूरदृष्टी असली तर येणारी पिढी मजबूत आत्मबळाने समृद्ध असेल.  कारण आई वडीलांच्या  माध्यमातूनच मुलांना नैतीकतेचे शिक्षण मिळत असते. तेव्हा हे सगळे नियम नसून  एका कुटूंबाच्या सुखी जीवनाची गुरूकिल्ली असते. म्हणून ते कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत. कारण  एक सुखी कुटूंब म्हणजे सुदृढ समाजाचा  भक्कम  पाया असतो.         

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *