पिढी घडवूया कृतीतून

आज ज्या वेगाने तंत्रज्ञानामुळे जगाचा कायापालट होत आहे. त्याची प्रचीती आपल्याला रोजच्या जगण्यातून होतच आहे. लोप पावत चाललेल्या पिढीने मात्र शिक्षणरूपी ज्ञानार्जनाची सुरवात पाटी लेखणीने केली होती. तेव्हा शाईनेच कागदावर लिहिण्यास प्रादान्य दिले जाई. अभ्यासक्रमाचे स्वरूपही तेव्हा आताच्या तुलनेत निराळे होते. शिक्षणाच्या जगात तांत्रिक साधनांच्या उपयोगाचा थांगही लागलेला नव्हता. तरीसुद्धा तेव्हाच्या शिक्षण पद्धतीनुसारही लोक सर्व क्षेत्रात आपल्या आवडीप्रमाणे पुढे जात असत. तसेच तितक्याच योग्यतेने स्वत:ला सिद्धही करत असत. आताची नवीन पिढी मात्र तंत्रज्ञानाच्या उच्च स्तरीय युगात आपली बुद्धीमत्ता तीक्ष्ण करत आहे. त्यामुळे आता जुन्या शैलीचा त्यांना क्षुल्लक स्पर्शही राहिलेला नाही. परिणामस्वरूपी आजच्या पिढीला केवळ अटीतटीच्या प्रतीस्पर्धांमध्ये स्वत:ला टिकवून ठेवण्याच्या हेतूने अगदी बाल वयापासूनच त्या दृष्टीकोनातून वळविले जाते. जेणेकरून त्यांची मानसिकता घडत जावी.

कोणतीही लोप पावत जाणारी पिढी ही अनंत अनुभवांनी समृद्ध असते. अनुभवांच्या शिदोरीने ती परिपक्व झालेली असते. त्याला कारण ह्या जगात त्यांनी भरपूर कालावधी व्यतीत केलेला असतो. त्यामुळे ह्या आधुनिक युगातही त्यांच्यापाशी येणाऱ्या पिढीस देण्याकरीता मोलाचा ठेवा असतो. जो त्यांना माणुसकीचे जतन करण्यास प्रेरित करू शकतो. म्हणूनच जुनी पिवळी पडलेली पाने आपल्या आयुष्यात ह्यासाठी महत्वाची असतात. कारण त्यांनी त्यांच्या जीवनकालात हिरवा रंग सुद्धा अनुभवलेला असतो. त्यानंतर त्यामधून पिवळ्या रंगाकडे होणारे परिवर्तन त्यांना जीवनाप्रती स्वीकृतीकडे वळवत असते. आपल्या पुढ्यात असलेले जीवन कठीण असले तरी ते जगणे का आवश्यक आहे. ह्याचे महत्व त्यांना पटलेले असते. तेव्हा जुन्या पिढीकडून एका विश्वासासोबत जगण्याची कला सुद्धा नव्या पिढीस अवगत करता येवू शकते. त्याचप्रमाणे जुन्या पिढीनेही हे आपले मोलाचे योगदान आपल्या कृतीतून नव्या पिढीपर्यंत पोहोचवीन्याचा आटोकाट प्रयत्न आपल्या कृतीतून नक्की करावा.

आज जुन्या पिढीनेही परिवर्तनशील जगात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी घाबरत का होईना परंतू तंत्रज्ञानाच्या दिशेने आपले पाउल टाकलेले आहे. त्यांच्या त्या कृतीतूनच त्यांचा जगण्याचा उत्साह अजून मावळला नसल्याचे जाणवते. परंतू आज त्याच तंत्रज्ञानाच्या युगात जन्माला आलेली असूनही नवी पिढी मात्र स्वत:ला इथे टिकवून ठेवण्यास का असमर्थ ठरत आहे. स्वत:ला ह्यात सामावून घेत असतांना त्यांचे मानसिक आरोग्य का पणास लागत आहे. कारण आता प्रतीस्पर्धांमुळे जगणे सोपे राहिलेले नाही. त्यांच्या व्यक्तीमत्वातील खास गोष्टी त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात. कारण ह्या व्यावहारिक जगात त्यांना विचित्र दृष्टीने पाहिले जाते. औपचारिक कौशल्ये आत्मसात करत असतांना कोठे ना कोठे त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहते. कारण आपल्या व्यक्तीमत्वातील वेगळेपण ओळखण्यास त्यांची मूल्य मजबूत झालेली नसतात. अशारितीने आजची पिढी एकप्रकारे संभ्रमात आहे. तेव्हा जुन्या पिढीने आपल्या परिपक्व हातात त्यांचा हात असा घ्यावा. जेणेकरून त्यांच्यात विश्वास निर्माण होईल. त्यांच्या वेगळेपणास स्वीकारून त्याच्यातही आत्मवीश्वासाने राहण्याचे बळ त्यांना प्रदान करावे. जीवनात आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे शिकवावे. त्याकरीता स्वत:ला सर्वदृष्टीकोणातून तयार करण्याचे प्रोत्साहनही त्यांना द्यावे.

तरीही केवळ शब्दांच्या कौशल्याने त्यांचे मार्गदर्शन करून चालणार नाही. तर त्यासाठी काही गोष्टी आपल्या कृतीद्वारेही सिद्ध कराव्या लागतील. ह्या जगात तंत्रज्ञानाबरोबर दयाभाव परोपकार माणुसकी ह्या अनमोल गोष्टी आपल्यानंतरही टिकून राहाव्यात म्हणून तत्सम कृती आपल्या आचरणातून निरंतर करत राहिले पाहिजे. जेणेकरून आपण ह्या जगात असो किंवा नसो परंतू आपले कृत्य पाहिलेल्यांच्या लक्षात राहील. त्याचप्रमाणे ते आपल्या वयाबरोबर त्यामधील सखोल बोध समजू शकतील. कारण प्रत्यक्ष कृती करणे हे अप्रत्यक्षपणे पिढी घडविण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे. त्यामुळे कृती करत असतांना आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याचे कसबही नकळतपणे आपण त्यांना शिकवू शकतो. ज्यातून साहस दाखविण्याची हिंमत त्यांच्यात हळूहळू येत जाते. अशाप्रकारे आपण येणाऱ्या पिढीची मूल्य मजबूत करू शकतो. तेव्हाच ते प्रतीस्पर्धामध्येही स्वत:ला योग्य प्रकारे जपू शकतात. कारण स्वत:ला सिद्ध करण्यामागचा भव्य उद्देश त्यांना गवसलेला असतो. केवळ स्वार्थासाठी व्यक्तीगत प्रगती करणे त्यांना मानसिकरीत्या खचवू शकते. परंतू जेव्हा परोपकाराच्या विचाराने त्यांच्या स्वार्थाचा विस्तार होवून परमार्थात परिवर्तीत होईल. तेव्हा मात्र त्यांची स्पर्धा केवळ स्वत:बरोबर निरंतर सुरू राहिल. जोपर्यंत त्यांच्यातील माणसाला माणुसकीचा कस्तुरी गंध लागणार नाही.

1. कृतीतून प्राणीमात्रांप्रती दयाभाव पसरवावा

उन्हाळा लागताच उष्णतेमुळे रस्ते ओस पडतात. आजही मानवी जीवनाचा काही अंशीय भाग आपल्या कठीण परिस्थितीशी झुंझत असला. तरीदेखील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बदलणाऱ्या ऋतू परत्वे हवामानातील चढउतार सोसण्यास माणसाने स्वत:साठी जीवनात अनुकूलता आणलेली आहे. परंतू प्राणी व पक्षी मात्र हवामानासोबत माणसांनी निर्माण केलेल्या सोयींच्या दुष्परीनामांना देखील सामोरे जात असतात. कारण आज वातावरणात पसरलेली उष्णता साधी राहिलेली नाही. तर त्यात कित्येक प्राकृतिक संसाधानातून बाहेर पडणारे विषारी वायू देखील समाविष्ट असतात. जे वायूप्रदूषणाला बढावा देत आहेत. आज आपण ही आधुनिक युगातील ही तंत्रज्ञानाची उत्क्रांती ठरवूनही थांबवू शकत नाही. परंतू आपण सार्वजण आपल्यापाशी एक हृदय निश्चितच बाळगतो. ज्यात चाचपडून पाहिल्यास आपल्याला दयेचे बाळकडू नक्कीच गवसतील. तेव्हा आपल्याला निसर्गाने बहाल केलेले पाणी हे अमृत ह्या सजीव सृष्टीचा भाग असलेल्या प्राणी व पक्ष्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण फक्त एक माध्यम बनावे. त्यासाठी कोणतेही मोठे कष्ट उपसण्याची आवश्यकता नाही. केवळ एक मातीचे पात्र आणून त्यात ह्या मुक्या जीवांसाठी आठवणीने पाणी भरून ठेवण्याची माणुसकीपूर्ण सवय स्वत:ला लावा. त्याचप्रमाणे त्यात खंड पडू देवू नका. उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुले म्हणजे आजची नवी पिढी अंगणात खेळत असतात. आपण नियमितपणे करत असलेले हे कृत्य ते बघतात. त्यांच्या बालमनापर्यंत त्यातून एक सकारात्मक संदेश नकळतपणे पोहोचतो. आपल्याद्वारे घडत असलेले हे कितीही सामान्य कृत्य असले तरी त्यामधून आपोआपच नव्या पिढीला दयेकडे वळविण्याचे सत्कार्य अविरत सुरू राहते. जे दयाभावाला प्रोत्साहन देत असते.

2. कृतीतून सौजन्य पसरवावे

सभ्य आचरण हे फक्त आपल्या बोलण्याचा व ऐकण्याचा भाग नसावे. तर ते आपल्या कृतीतून झळकले पाहिजे. अन्यथा इतर प्राण्यांमध्ये व माणसामध्ये विशेष फरक दिसणार नाही. आज असंख्य स्त्रिया अर्थार्जनाकरीता घराबाहेर पडतात. त्याआधी त्या घरातील सर्व व्याप कुटूंब मुले ह्या सर्वांप्रती आपली कर्तव्ये पार पाडतात. कधीकधी ह्या सर्व धावपळीत त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो. त्यामुळे अनेक अंगावरची दुखणी तसेच मानसिक घालमेली त्या काहीतरी तात्पुरते उपाय करून निपटत असतात. त्याशिवाय सर्वच स्त्रिया मोठ्या कार्यालयात किंवा मोठ्या पदावर कार्यरतही नसतात. तर काहींना त्यांच्या योग्यते प्रमाणे तळगाळाची व अत्यंत कठीण कामेही करावी लागतात. जिथे त्यांना घालून पाडून दिलेली वागणूक व पराकोटीचा अपमान सहन करावा लागतो. असे असतांना आज स्त्री पुरूष समानते विषयी देखील मोठ्या प्रमाणात बोलले जाते. त्यामुळे आजची स्त्री एखाद्या निर्जीव यंत्रासम भासू लागली आहे. परंतू जेव्हा जागतिक स्त्री दिवस किंवा आई दिवस येतो. तेव्हा मात्र स्त्रियांची थोरवी गाण्यास मात्र सर्वांना शब्द अपुरे पडतात. त्यापेक्षा स्त्रीला फक्त एक माणूस म्हणून बघा. लीन्गभेदानुसार तिच्या शारीरिक व भावनिक समस्यांविषयी अवगत असा. त्यानुसार त्यांच्याशी वर्तन करण्यास स्वत:ला सक्तीची सवय करा. अर्थार्जनाकरीता आज स्त्री पुरूष दोघांनाही धक्के खात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर दररोज प्रवास करावा लागतो. प्रवासात अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. त्यातही कित्येकांच्या मनात स्त्रियांकरीता राखीव जागा असल्याचे स्पष्ट असते. त्यामुळे एखादी स्त्री उभी असली तरी कोणास काही फरक पडत नाही. परंतू स्वत:शी प्रामाणिक राहून स्त्रियांना बसण्यास जागा देण्याविषयी विचारणे हे एक सौजन्य आहे. जे केवळ कृतीतून पसरविले जावू शकते. ज्यामुळे प्रवासात स्त्रियांची छेड काढण्याचा विकृत मनसुबा असलेल्यांना रोक लावता येवू शकते.

3. कृतीतून घरात क्षेत्रांच्या मर्यादांचे महत्व पसरवावे

आपण घर व घरातील माणसांना आयुष्यात सर्वाधिक गृहीत धरत असतो. परंतू नेहमी हे लक्षात असू द्यावे कि समाज व देशाच्या प्रगतीकरीता सर्वप्रथम प्रत्येक कुटूंब एकजूट, मानसिक व भावनिकरीत्या स्थिर तसेच प्रगतीशील झाले पाहिजे. त्यासाठीच घरात घरातील माणसांच्या क्षेत्राच्या मर्यादा लक्षात ठेवणे व त्यांचा सम्मान राखणे महत्वाचे असते. घरात लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं ह्यांना आपल्या वागण्या बोलण्यातून सम्मान देण्याची सवय लावली पाहिजे. त्यांच्याकडून चूक झाली असल्यास त्यांना घालून पाडून न बोलता संवादातून त्यांचे मन मोकळे करून समजावून सांगावी. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याचा आदर करावा. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करावे. ते आपल्या पेक्षा लहान आहेत. असे समजून त्यांच्या क्षेत्राचे कदापि उल्लंघन करू नये. अशाप्रकारे मर्यादापूर्ण घनिष्ट संबंधातूनच भावनिक सुरक्षेची ग्वाही मिळत असते. घरातील मोठ्यांनी आपसातील संबंध दीर्घकाळापर्यंत सुमधुर राखण्यासाठी परस्परांच्या व्यक्तीगत क्षेत्राचे महत्व ओळखावे. त्यात आज्ञा न घेता हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये. तरीही आपसात पारदर्शकता असावी. ह्या दोन्ही गोष्टींचे सखोल अर्थ आहेत. कारण कधीकधी पतीपत्नीत लपविण्यासारखे काय असते. ह्या संज्ञेखाली ते एकमेकांशी कसे वागत आहेत. ह्याविषयी त्यांना जागरूकता नसते. नात्यात सुरक्षित अंतर राखले न गेल्याने ते मनातील गोडवा हरवून बसतात. ज्यामुळे त्यांचे नाते निर्जीव होत जाते. म्हणूनच घरात प्रत्येकाने आपल्या कृतीतून इतरांच्या क्षेत्राचे महत्व ओळखून वर्तन केले पाहिजे.

4. कृतीतून मदतीचे बाळकडू रुजवावे

समाज सुसंस्कृत करावयाचा असेल तर आजच्या तरुणपीढीला केवळ शिक्षणाचाच नाहीतर योग्य मार्गदर्शनाचा वारसा देखील आवश्यक आहे. एकमेकांना गरजेच्या समयी सढळ हाताने मदत करण्याचे संस्कारही त्यांनी गिरवले पाहिजे. कारण काही वर्षापूर्वी संपूर्ण जगात महामारीचे थैमान माजलेले असतांना अनेक लोक तेव्हा फक्त स्वत:पुरता विचार करतांना दिसत होते. असंख्य लोक आक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेशी झुंझत असतांना काहीजण अतिरिक्त मोबदला देवून विनाकारण सिलेंडर आपल्या ताब्यात घेत होते. महामारी संपुष्टात आल्यानंतरही लोकांनी त्यामधून कोणताही माणुसकीपूर्ण धडा घेतला नाही. पुन्हा जग पूर्वीप्रमाणेच स्वार्थाने बरबटले. त्यामुळेच आज आपण आपसात विश्वासाची कमतरता अनुभवत असतो. कारण आपल्या संवेदनांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच आपणही इतरांना प्रतिसाद देत नाही. केवळ आपल्यापुरते जगणे पदरात पाडून घेत असतो. म्हणूनच आपण निराशेस बळी पडतो. अशावेळी आपण परमार्थाचे विचार आत्मसात केले पाहिजे. कारण स्वार्थ आपल्या विवेकास नष्ट करत असतो. आपण कोणाच्या अडीअडचणीत तसेच आपातकालीन परिस्थितीत मदतीला धावून जाण्यास ह्यासाठी घाबरतो. कारण ही त्यांची व्यक्तीगत समस्या आहे असे आपल्याला वाटते. आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो कारण कोणाच्याही इतके नजीक जाणे आपल्याला अवघडल्यासारखे वाटते. म्हणूनच आज औपचारिक संबंधांना अतिरिक्त महत्व प्राप्त झाले आहे. तेव्हा आता आपल्या कृतीतून हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे कि अन्याय अत्याचार अपघात अशाप्रसंगी केवळ बघ्याची भूमिका घेवून हळहळत बसने योग्य नाही. तर आपल्या माणुसकीपूर्ण वर्तनातून पिडीतांना तत्परतेने सहाय्य करणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे अत्याचारी माणसास त्याच्या योग्य जागी पोहोचविण्यास पुढाकार घेणे हे देखील आवश्यक आहे.

आजवरचा इतिहास आहे कि स्वपराक्रमातून व स्वकृतीतून थोरमहात्म्यांनी इतिहास रचला. ते इतरांना आज्ञा देत बसले नाही. तर स्वत:च्या हातात शस्त्र घेवून स्वत: लढले. आज आपली पाळी आहे. आपण ह्या तंत्रज्ञानाच्या युगात कसे तग धरून राहू. आपल्या येणाऱ्या पिढीशी कसे जुळवून घेवू. हा विचार करून स्वत:ला कमीपणा आणण्यापेक्षा काही अशा गोष्टी ज्या आपणच त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यास माध्यम बनू शकतो. ही आपली जबाबदारी ओळखून लहान लहान प्रबोधनात्मक कृत्यांमधून आपण येणाऱ्या पिढीस संस्कारांचा वारसा प्रदान केला पाहिजे. कारण नवीन कितीही लक्षवेधी असले तरी जुनं ते सोनं ह्याची जाणीव असणे महत्वाचे आहे. ह्याच विचारा अंतर्गत पिढ्यांमध्ये संस्कृतीचा वारसा रुजला गेला पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *