
मी माझा लिखाणाचा प्रवास सुरू करून आता दोन पेक्षा अधिक वर्ष झालेत. हा प्रवास सुरू करण्यामागे माझी कोणतीही विशेष महत्वाकांक्षा नव्हती. परंतू माझा व्यक्तीगत रिकामा वेळ सार्थकी लागावा. त्याचप्रमाणे शक्य असल्यास त्यामधून मला थोडेफार अर्थार्जन करता यावे. इतकीच सदिच्छा होती. कारण मी एक गृहिणी आहे. म्हणूनच गृहिणी असलेल्या स्त्रियांनी जर स्वत:ची आत्मप्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीकोनातून स्वत:चे विचार बदलले नाहीत. तसेच स्वत:ला सामान्य दिनचर्येतून बाहेर काढून ध्येयवादी बनविले नाही. तर त्या आपसूकच कालांतराने निराशेस बळी पडणे ठरलेले आहे. ही गोष्ट मी उत्तमरीतीने समजू शकले. कारण कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याशिवाय तसेच स्तुतीजन्य प्रोत्साहनाशिवाय त्या मानसिक स्तरावर कालांतराने खचत जातात. परंतू त्यांचा एक माणूस म्हणून अपभ्रंश होण्यास पेशा कारणीभूत नसतोच. तर त्यांचे आपल्या पेशाला घेवून जे निकृष्ठ विचार असतात. तेच त्यांना कमीपणा आणत असतात. त्यामुळे मी माझ्या लिखाणाला अविरत करत राहिले. ज्यामधून माझ्या विचारांना चालना मिळाली. ते दिवसागणिक आणखी प्रगल्भ होत गेले. अशाप्रकारे आज माझी ब्लॉग साईट उत्तमरीतीने सुरू आहे. ज्यावर मी काही निवडक विषयासोबत विशेषता स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर लेख लिहीले आहेत. त्याशिवाय मी सध्या कविता सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. मी सोशल मिडीयाच्या फेसबुक इंस्टाग्राम व कोरा मराठी ह्या व्यासपीठावर आपल्या content च्या माध्यमातून योगदानही नियमितपणे देत आहे. आज ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्या आत्मविश्वासात अतुलनीय भर पडलेली आहे.
मी अनेक वर्ष माझ्या मनात एक अनामिक दु:ख घेवून चालत आले होते. ज्यामुळे माझ्या आयुष्याला अनोखे वळण लागले. मी सुद्धा एका भरल्या कुटूम्बाचा हिस्सा आहे. माझ्याही आयुष्यात अनेक माणसे आहेत. परंतू त्या जनसागरात असूनही मी सर्वस्वी एकटीच आहे. कारण माझ्या अंतर्मुखी व्यक्तीमत्वाला कोणीही समजून घेतले नाही. काही जण माझ्या बद्दल अनेक गैरसमज घेवून पुढे जात राहिले. काहींनी मला माझ्या परिस्थितीबरोबर तसेच सोडून देवून आपआपली आयुष्ये सावरली. परिणामस्वरूपी माझी आत्मप्रतिमा खाली घसरत गेली. मी स्वत:चाच तिरस्कार करू लागले. मला स्वत:मध्ये काहीही चांगले पाहता येत नव्हते. तेव्हा मी लोकांत मिसळण्याचे टाळू लागले. तसेच स्वत:हून घराच्या चार भिंतीतील आयुष्य स्वीकारले. स्वत:बरोबर एकटे राहिल्यावर मला स्वत:शी नव्याने ओळख झाली. कारण मी जे काही सहन केले. त्याला उच्च दृष्टीकोनातून मी पाहू शकले. त्याचबरोबर हे समजू शकले कि ह्या दु:खातही एक सखोल अर्थ दडलेला आहे. जर मी हे दु:ख योग्य मार्गाने इतरांशी वाटू शकले तर त्यातून माझ्याद्वारे एकप्रकारचा विश्वास प्रसारित होवू शकतो. त्यावेळी माझ्या हाती एकाच पर्याय होता. तो म्हणजे माझे लिखाण. अशारितीने माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला.
परंतू कोणताही प्रवास सुरळीत पार पडत नाही. मार्गात अनेक अडचणींना सामोरे जाणे योगायोगाने आलेच. जर त्या अडचणीत बोटावर मोजण्याइतकी दोन खरी माणसेही आपल्याबरोबर असली. तर मात्र अडचणींवर मात करत आपण एकेदिवशी निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. सुदैवाने माझ्या आयुष्यातही माझी दोन मुले माझ्या ह्या प्रवासात सावलीसारखी माझ्या बरोबर राहिलीत. क्षणोक्षणी मला धीर देत आली. त्यांनी मला जगण्याप्रती एक नवा दृष्टीकोन प्रदान केला. मला नव्या युगाशी व नव्या तंत्रज्ञानाशी अवगत केले. त्यांच्या सौजन्याने माझ्या आयुष्याचा सर्वस्वी सकारात्मक कायापालट झाला. त्यांच्या शिवाय मी माझ्या पुस्तकाचा हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण होण्याची कल्पनाही करू शकत नाही. मी मागच्याच आठवड्यात माझे पुस्तक लिहून पूर्ण केले. आता ते प्रकाशित होवून amazon वर प्रसारित सुद्धा झालेले आहे. पुस्तकाचे नाव ”स्त्रीत्व” संघर्षातून सन्मानाकडे हे आहे.
ह्या पुस्तकाद्वारे मी विवाहबाह्य संबंधांमुळे व पुरुषी मानसिकतेमुळे तीन स्त्रियांच्या आयुष्याच्या झालेल्या राखारांगोळीचे सखोल वर्णन सादर केलेले आहे. जे वाचून वाचकांच्या हृदयालाही नक्कीच पीळ बसेल. ज्याचा आजच्या तरुण पिढीतील मुलीच्या मनावर सुद्धा धीरगंभीर परिणाम होवून तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. ह्या चारही हृदयस्पर्शी कहाण्या आपल्याला नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील. त्याचप्रमाणे माणुसकीप्रती सुजाण बनवतील. माझे हे पुस्तक सर्वस्वी स्त्रियांना समर्पित आहे. परंतू ते पुरूषांनाही प्रकाश दाखविणारे आहे. माझ्या व्यक्तीगत जीवनातील वेदनांमधून ह्या पुस्तकाचा जन्म झाला असल्यामुळे नक्कीच आपल्याही हृदयाला ह्यातील सार समजू शकेल. जे आपल्याला स्त्रियांच्या मांगल्याचा व मातृत्वाचा सम्मान करण्यास प्रेरित करेल. कारण आयुष्यातील वेदनांमधून तावून सुलाखून निघालेली एक स्त्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक असते. तिचा जीवन अनुभवच तिला सर्वस्वी सकारात्मकरीत्या रुपांतरीत करत असतो.
खाली दिलेल्या icon वर क्लिक करून आपण पुस्तक मागवू शकता.

Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)