खळखळून हसण्याचे फायदे

आजच्या काळात लोक निरनिराळ्या कारणांमुळे सतत ताण-तणावात असतात. त्यामुळे त्यांचे निरागसपणे खळखळून हसणे दुर्लभ होत चालले आहे. उन्हाळ्यात सगळी भावंडे एकत्र येवून मौजमस्ती करतांंनाचे  तसेच हसता खिदळतांना चे चित्र आता फारच कमी बघावयास मिळते. त्याचीही  अनेक कारणे आहेत. आता लहान मुले विवीध समर क्लासेस मध्ये व्यस्त असतात. त्यानंतर उन्हाळ्यातही त्यांना शाळेकडून मिळालेला गृहपाठ करावा लागतो. आताच्या शिक्षण पद्धतीनुसार मुलांना वर्षभर अभ्यासातून  मोकळीक मिळत नाही. त्याचप्रमाणे  काळाच्या गरजेनुसार आई-वडील दोघांनाही कामानिमित्ताने घराबाहेर पडावे लागते. बर्‍याच कुटूंबांमध्ये तर मुलांना सांभाळणारेही घरी कोणिही नसते. अशावेळी शेजार्‍यांकडे किंवा मग डे केअर सेंटर मध्ये मुलांची सोय करण्यात येते. अशाप्रकारे मुलांच्या नकळत्या वयापासून पाठीवर दफ्तराची आणि डोक्यावर अभ्यासाची ओझी आपसूकच येतात. त्यामुळे भरपूर झोप झालेल्या मुलाच्या चेहर्‍यावर उमटणारे गोंडस हसू बघायला मिळतच नाही. कारण  मुलांच्या मनावर अभ्यासासोबतच प्रतिस्पर्धांचेही  दडपण असते. ज्याचे दुष्परिणाम म्हणजे मुले लहान वयातच मोठी झाल्यासारखी वाट्तात. तसेच ह्या डिजीटल च्या युगात कुटूंबातील सर्वजण घरी असले तरिही घरात शांतताच पसरलेली असते. कारण प्रत्येकजण आप-आपल्या मोबाईल डिजिटलच्या जीवनात  व्यस्त असतात. त्याचप्रमाणे घरातील मोठी मंडळी आपली नियमित दिनचर्या जगत असतात. तर कधिकधि जीवनप्रवासात येणार्‍या जबाबदार्‍यांनी काळजीत असतात. त्याचप्रमाणे मुलांच्या  व आई-वडीलांच्या जगात अपेक्षांची व गैरसमजांची न दिसणारी कायम एक दरी असते. कारण दिवसभर~याच्या दिनचर्येत फार कमी वेळा ते मनापासून एकत्र येतात.  इतर वेळी ते आपाआपल्या जगात व्यस्त असतात. 

   अशाप्रकारे कुटूंबियांमध्ये  मनमोकळ्या गप्पा मारण्याचे क्षण तसेच हास्य विनोद करून हसणे फार कमी झाले आहे. पालकांच्या आयुष्यातील समस्या त्यांचे आयुष्य निष्प्राण करत असतात तर मुलांचे प्रतिस्पर्धांना तोंड देता देता चेहर्‍यावरचे हसू गायब झालेले असते. अशाप्रकारे जीवनातील ताण-तणावांमुळे खळखळून हसणे तर दूरच राहिले  साधे स्मित  करणे देखील आपल्या पासून दूर पळत चालले आहे. त्यामुळे हसण्याने भावना व मन मोकळे होतात. हसण्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. हे कित्येक दिवसात आपण अनुभवलेच नाही. हसण्याने आयुष्यातील प्रत्येकक्षण सहज व सोपा झाल्यासारखा वाटतो. आजच्या युगात अगदी अल्पवयीन मुलांपासून ते वयस्कांपर्यंत प्रत्येकालाच जीवनात ताण तणावाचा सामना करावा लागतो. त्याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर दुष्परीणाम होतो. अशावेळी कुटूंबासोबत मौजमजेचे काही क्षण घालविणे, दैनंदिन जीवनातून जरा उसंत घेवून घराबाहेर जाण्याची योजना आखणे तसेच हास्य क्लब तसेच टेलिव्हीजन वर येणार्‍या विनोदी कार्यक्रमांचा आस्वाद घेणे जे आपल्याला हसविण्यासाठी मदत करतात ह्या गोष्टी नित्यनियमाने केल्यास आपल्या आयुष्यात संतुलन साधले जावू शकते. कारण सुदृढ आरोग्यासाठी हसण्याचे फार महत्व आहे. खळखळून हसण्याचे फायदे ज्यांनी अनुभवले आहेत त्यांनी लोकांना हसविण्याची जबाबदारी घेतली आहे.

1. हसतमुख चेहरे माणसे जोडतात.

   जे लोक रस्त्याने जातांना किंवा इकडे तिकडे वावरतांना ओढलेला चेहरा करून असतात. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. परंतू  जेव्हा लोकांमध्ये वावरतांना आपल्या चेहर्‍यावर हलकेसे स्मित पसरलेले असते तेव्हा इतरांचे आपल्याकडे लक्ष जाते. आणि तेही आपल्या कडे बघून स्मित करतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी ओळख करण्याची संधी प्राप्त होते. एखाद्या हसतमुख माणसाचा चेहरा संपुर्ण दिवस आपल्या लक्षात राहतो. बर्‍याचदा आपण बघतो कि एखाद्या अनोळखी माणसाच्या चेहर्‍यावर उमट्लेले सकारात्मक हास्य नकळतपणे आपल्यालाही सकारात्मकता देवून जाते. तेव्हा आपल्या चेहर्‍यावरचे हरविलेले हास्य परत मिळविलेच पाहिजे.

2.  हसणे हे आरोग्यासाठी औषध आहे.

    मानसिक तणावामुळे आपल्या चेहर्‍यावरच्या नसा ताणल्यासारख्या होतात परंतू हसण्यामुळे त्या मोकळ्या होतात. आपण आनंदी असलो तर आपल्या चेहर्‍यावरील त्वचा टवटवीत दिसते. त्याच बरोबर आपली रोगप्रतीकारक क्षमता ही उत्कृष्ठ राहते. हसण्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि हृदयावरचा दबावही कमी होतो. त्यामुळे शरिरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन चा संचार होतो. हसण्यामुळे आपला दृष्टीकोण सकारात्मक होतो. आणि आजार आपल्यापासून दूर पळतात. हसण्यामुळे होणार्‍या फायद्यांची यादी न संपणारी आहे. आणि हसण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाही. तेव्हा हसण्यावरची पाबंदी हटवीलीच पाहिजे. स्वत: आनंदी राहून खळखळून हसण्याबरोबर  इतरांनाही आनंदाने हसवीले पाहिजे.

3. हसण्यामुळे गोष्टींचे संदर्भ बदलतात

  आपण एखाद्या तान्ह्या बाळाला खुदकन गालात हसू उमटलेले पाहिले असेलच. ते बघून आपणही हर्षीत होतो आणि आपणही नकळतपणे हसू लागतो. ऑफिसमधून पती संध्याकाळी घरी परतल्यावर पत्नीने जर  आनंदाने आणि हसतमुखाने पतीचे स्वागत केले तर  पती मनाने  सुखावतो. पतीलाही पत्नीची विचारपुस कराविशी वाटते आणि त्या दोघांमधील नाते घट्ट होते. तसेच पतीला आपल्या जीवनात प्रगती करण्यास प्रोत्साहन मिळते. ज्या घरातील स्त्रिया हसर्‍या चेहर्‍याने घरभर वावरतात आणि आनंदाने घरातील कामे करतात, त्या घराचा कानाकोपरा प्रफुल्लित दिसतो. तसेच त्या स्त्रियांना सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही साज-शृंगार करण्याची गरज पडत नाही. त्यांच्या सकारात्माकतेमुळे  घरातील माणसेही प्रगति करतांना दिसतात. आईच्या चेहर्‍यावरचे हास्य मुलांना सुखाची ग्वाही देते आणि त्यांना खंबिर बनविते. अशाप्रकारे हसण्यामुळे घरा-दारास नवचैतन्य येते.

4. हसण्याने भावना मोकळ्या होतात.

   दैनंदिन जीवनात आपण सर्वच गोष्टी एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात बरच काही साठलेलं असते. पति- पत्नीला एकमेकांना काही सांगायचे असते. तर मुलांना आई-वडीलांशी बोलायचे असते. परंतू गैरसमज आणि रागविण्याच्या दडपणाखाली येवून आपण स्पष्ट पणे बोलत नाही. किंबहूना बोलणे टाळतोच. तेव्हा घरातील वातावरण पोषक आणि हलके करायचे असल्यास  हसण्याचा आधार घेतला पाहिजे. हास्य विनोद करून खळखळून हसल्यामुळे संपुर्ण कुटूंब प्रेमाने एकत्र येते आणि मनावरचे ताण-तणाव कमी होतात. अशावेळी आपल्या मनातील भावनांना आपल्या माणसांसमोर वाट मोकळी करून देता येवू शकते.

  मित्रांनो, हसणे ही सकारात्मक गोष्ट आहे. परंतू हसतांना मात्र आपल्याला वेळेचे आणी जागेचे भान नक्कीच असायला पाहिजे. आपण आनंदी आहोत त्याचे प्रदर्शन घराबाहेर करणे योग्य नाही. कारण आपल्या आजुबाजूला कोणी दु:खी असू शकतो. तर कोणी आजारी असू शकतो. त्याची जाणीव ठेवणे ही माणुसकी आहे. परंतू आपल्या माणसांसोबत  आणि आपल्या घरात हसण्यावर पाबंदी नाही. सदैव हसत रहावे आणि आनंदी रहावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *