
आपल्या जीवनप्रवासात आपले सगे-सोयरे, आपले मित्र, आपले कुटूंब तसेच आपण निवडलेले कुटूंब ह्यांचा मोलाचा सहभाग असतो. कुटूंबाचे प्रेम, कुटूंबाचे पाठबळ, कुटूंबाचे मार्गदर्शन आणि कुटूंबाची मोलाची साथ ह्या गोष्टी आयुष्यात आपल्यासाठी पृथ्वीमोलाच्या असतात. कारण ह्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात असे साम्राज्य असते कि त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. त्यांच्या अतुलनीय सहकार्याशिवाय आपले इथवर पोहोचणे शक्य झाले नसते हे एक शाश्वत सत्य आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या गरजा पुरवील्या. त्यासाठी त्यांनी स्वत:ची स्वप्न अपुर्ण सोडली तसेच स्वत:च्या इच्छा आकांक्षांचा त्याग केला. परंतू तरीही त्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. किंबहुना आपल्यावरील विनाअट प्रेमापोटी ते हे सर्व आपल्यासाठी करत असतात. त्याचप्रमाणे आपले कुटूंब आपल्या वरच्या प्रेमापोटीच जीवनातील चढ उतारांना सामोरे जावूनही आपल्यासाठी पुरून उरते. त्याचबरोबर आपल्यावर त्यांचे अत्यंत बारीक लक्ष असते. अशाप्रकारे ते आपल्यासाठी एकप्रकारचे आरामस्थितीचे क्षेत्रच निर्माण करून ठेवतात.
परंतू कधी-कधी त्यांनी निर्माण केलेली ही आरामदायक सोयच आपल्याला निराशाजनक अवस्थेत नेवून ठेवण्यास कारणीभूत ठरते. त्याचे कारण हे असते कि आपले कुटूंब आपल्याला समाजाचा भाग म्हणजे प्रवाहाच्या दिशेने नेण्यासाठी सर्वतोपरी सज्ज असते. आपण समाजनिर्मित प्रतिस्पर्धांमध्ये उतरून स्वत:ला सिद्ध करावे अशी त्यांची इच्छा असते. त्यावेळी ते आपल्याला इतके भरीस पाडत असतात कि आपल्या मनाचा विचारही करणे त्यांना गरजेचे वाटत नाही. तसेच आपल्यातील असे गुण जे आपल्याला अद्वितीय बनवीतात त्यांच्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपल्यामधे त्यांना हे सांगण्याचे बळ कधीही येत नाही कि सामाजिक प्रतिस्पर्धांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्याला स्वत:ची खरीखुरी ओळख निर्माण करावयाची आहे. परंतू त्यांना काय वाटेल ह्या विचारांना आपण नेहमीच प्राथमिकता देतो. कधिकधी अशाप्रकारच्या कुटूंब प्रेमाचा एका अर्थाने आपल्या मनावर दबाव असतो. कारण आपण समाजाने ठरवीलेल्या यशाच्या पात्रतांना एक-एक करून पार करत आहोत हे बघून ते सुखावतात. अशावेळी त्यांच्या आनंदावर पाणि फिरविण्याचे विचारही आपल्याला अपराधीपणाच्या भावनेने ग्रासून टाकतात. परंतू आपली स्वत:चीही काही स्वप्ने असतात आणि त्यांना पुर्ण करणे हे देखील आपले स्वत:प्रती एक कर्तव्य असते. तरी देखील दुर किनार्यावर उभे राहून त्या स्वप्नांना न्याहाळ्न्याचे सामर्थ्यही आपल्यात नसते. कारण कळत नकळतपणे कुटूंबाच्या प्रतिष्ठेचे ओझे आपल्यावर असते. त्यामुळे इच्छा असो किंवा नसो आपण सामाजिक व्यवस्थापनेच्या खोल समुद्रात आपोआपच ओढल्या जातो. कुटूंब प्रेमाशी केलेली वचनबद्धतेची बंधने आपण कधिही तोडू शकत नाही. तसे केल्यास आपले मन आपल्यालाच दोषी ठरवीते. म्हणून कुटूंबाचे प्रेम हे बंधनात टाकणारे नाही, तर विचारांचे स्वतंत्र्य देणारे असले पाहिजे.
1. स्वप्ने बोलून दाखवीण्याचे स्वातंत्र्य हवे.
आपण लहानपणापासून विवीध स्वप्न बघत मोठे होतो. मोठे झाल्यावर आपले आदर्श कोण असेल, त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्यात काय बनायचे आहे, हे देखील आपण मनोमन ठरविलेले असते. त्यासोबतच आपले आई-वडीलही आपल्यासाठी बर्याच गोष्टी ठरवीतात. त्याचबरोबर ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. आपल्या अपत्याला त्यांनी ठरवील्याप्रमाणे बनविण्याचा त्यांचा हट्ट असतो. ‘तो अजून लहान आहे, त्याला काय कळ्तं’ असे म्हणून ते स्वत:चे म्हणणे खरे करण्यास निघतात. परंतू त्यांचे असे टोकाचे वागणे त्यांच्या अपत्याच्या मनावर दडपण आणू शकते ह्याची त्यांना शहानिशा करणे देखील गरजेचे वाटत नाही. त्यापेक्षा आई-वडीलांनी आपल्या अपत्याचा कोणत्या क्षेत्राकडे जाण्यात रस आहे हे आवर्जून जाणून घेतले पाहिजे. त्यांनी मुलांना त्याच्या स्वप्नांबद्दल भरभरून बोलू दिले पाहिजे. आई- वडीलांनी आपली मतं प्रत्येक वेळी मुलांवर लादू नये. त्याऐवजी मुलांबरोबर आपसात संवाद साधून तसेच विचार-विमर्श करूनच त्यांच्या जीवनाशी निगडीत कोणत्याही निष्कर्षाला पोहोचले पाहिजे.
2. आई-वडिलांनी सर्व अपत्यांना समान वागवावे.
कधी-कधी आपण बघतो कि घरातल्या घरात भावंडांची आपसातच स्पर्धा सुरू असते. जे अपत्य सर्व गोष्टीत तरबेज असते ते आई- वडिलांचे लक्ष वेधून घेते. तेव्हा उरलेल्यांना वेळोवेळी त्याची उदाहरणे दिली जातात. त्यामुळे उरलेली भावंड त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच स्वत:ला कसोटी लावतात. त्यावेळी त्यांच्यातील विशेष गुणांकडे ज्यांनी त्यांना जन्मताच समृद्ध केले आहे कोणाचेही लक्ष जात नाही. अशावेळी त्यांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे त्यांना मनातील भावना मनातच ठेवण्याची सवय लागते व ते हळूहळू अबोल होत जातात. त्यांना आयुष्यात काय बनायचे आहे ह्या बद्दल ते स्पष्ट्पणे बोलू शकत नाही. त्यासाठी आई-वडिलांचे हे कर्तव्य आहे कि त्यांनी आपल्या सर्व अपत्यांचा त्यांच्यातील गुण दोषांसकट मनापासून स्विकार करावा. त्यांना समान वागणूक द्द्यावी. त्यांना जाणून घ्यावे आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे. त्यामुळे मुलांचा आपल्या व्यक्तिमत्वावर आत्मविश्वास वाढेल. त्याचप्रमाणे ते त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगतीही करू शकतील.
3. कुटूंबाने अपत्यांना धारेवर धरू नये.
आयुष्यात प्रगती करायची असेल तर कुटूंबाचे प्रेम तसेच कुटूंबाचे पाठबळ ह्या दोन गोष्टी अत्यावश्यक असतात. त्याशिवाय जीवनाची वाटचाल करणे अशक्य होते. परंतू त्या प्रेमाची आपल्या माणसांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे बंधने होणार नाहीत ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे. कुटूम्बियांनी आपल्या मुलांची वेळोवेळी मनापासून स्तुती केली पाहिजे. त्यांना घालून पाडून बोलण्यापेक्षा त्यांच्यातील क्षमतांना वेळोवेळी वाखाणले पाहिजे. त्यांच्याकडून मोठमोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना जे करणे शक्य आहे त्यात त्यांनी आणखी उत्तम करावे म्हणून त्या दृष्टीने काही सुविधा उपलब्द्ध करून दिल्या पाहिजे. त्यांना गृहीत धरण्यापेक्षा ते त्यांच्या आयुष्यात यश मिळविण्यासाठी मन लावून जे श्रम घेत आहेत त्यावर विश्वास ठेवावा. त्यांच्या हातून काही चुका झाल्या किंवा नुकसान झाले तरी त्यांच्या वरचे प्रेम कमी होवू देवू नये. त्या विनाअट प्रेमाच्या आधारेच ते पुन्हा सावरतात आणी चुका दुरूस्त करून जोमाने प्रगती देखील करतात.
4. घराबाहेर पडलेल्यांना कुटूंबाची एकी दिसावी.
आपल्या जीवनाची ध्येय गाठण्यासाठी घरातील माणसांना आरामदायक सोय सोडून बाहेर पडावे लागते. अशावेळी कुटूंबाची एकी बाहेर पडलेल्यांना हिंमत देत असते. त्या मोलाच्या पाठींब्या मुळेच ते आपल्या प्रगतीच्या मार्गावर ठामपणे लक्ष केंद्रीत करू शकतात. जिथे रक्ताची नाती असतात तिथेच नेहमी कुटूंब तयार होते असे नाही. तर जी माणसे आपल्याला आपल्या क्षमतेनुसार उठण्यास वाव देतात किंवा प्रोत्साहित करतात, कोणत्याही स्थितीत आपल्याला एकटे पडू देत नाहीत आणि आपल्यावरचे त्यांचे प्रेम कधिही कमी होत नाही ते आपले जीवलग मित्र. त्याचबरोबर आपण जोपासलेली प्रेमाची नातीही असतात. ज्यांच्या सान्निध्यात आपण मोकाळेपणाने श्वास घेतो. ते आयुष्यभर आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात.
आपण असे जागरूक कुटूंब बनले पाहिजे जे सदैव आपल्या माणसांवरचा आपला विश्वास दृढ ठेवेल. त्यांना विचारांचे स्वातंत्र्य प्रदान करेल. मोकळेपणाने बोलण्याची संधी देईल. त्याचबरोबर आपल्या माणसांच्या होरपळलेल्या मनावर मायेची फूंकर घालून उपचार करेल.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)