संयम राखणे अनिवार्य आहे

 सृष्टीतील सुक्ष्म जीवजंतूंपासून ते पशु-पक्ष्यांपर्यंत सर्वांवर आपण दृष्टीकटाक्ष टाकल्यास आपल्याला सर्वत्र संयम आणि चिकाटीची प्रचीती येते. आकाराने अगदी छोटीशी असलेली मुंगी परंतू तिची कार्यक्षमता आणि चिकाटी बघून आपण अचम्भीत होतो. कारण अनेकदा खाली घसरूनही ती आपला संयम न सोडता प्रयत्नशील राहते. तसेच तिला जिथे पोहचायचे असते तिथे पोहोचल्याशिवाय ती शांत बसत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या पक्ष्याच्या जोड्याला सुर्य मावळताच घरट्याकडे वळणे त्याचबरोबर सुर्योदय होताच घरट्याबाहेर पडणे ठाऊक असते. त्याचप्रमाणे दिवसभर ते त्यांच्या जीवनाशी निगडीत कामे अथक परिश्रमाने करत असतात. .घरट्यातील अंड्यांमधून पिल्लू बाहेर पडण्याची चाहूल लागताच त्यांच्या सुरक्षेसाठी मऊ गालिचा तयार करतात. त्यासाठी वणवण भटकून तहानेने आणि भूकेने व्याकूळ होवून मऊ कापुस गोळा करतात. अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर त्याच्या कोवळ्या चोचीत अन्न भरवतात. पिल्लू स्वत:हा घरट्याबाहेर पडून अन्न शोधू लागे पर्यंत त्यांचे हे कार्य न थांबता सुरूच असते. इथेही आपल्याला कोणत्याही गोष्टी पुर्ण होण्यास लागणारा कालावधी आणि त्यासाठी ठेवला जाणारा संयम बघावयास मिळतो. तसेच आपण जमीनीत एखादे बि लावतो तेव्हा लगेच दुसर्‍या दिवशी फळांची अपेक्षा करू शकत नाही. कारण तो आपला मुर्खपणा ठरेल.

  त्यासाठीही आपल्या ला योग्य तो कालावधी जावू द्यावा लागतो. संयम ठेवावा लागतो. त्या बियाण्या पासून येणार्‍या रोपाची योग्य निगराणी करावी लागते. खतपाणि द्यावे लागते. त्या झाडाची योग्य ती वाढ होईस्तोवर वाट बघावी लागते. तेव्हा कूठे आपल्याला झाडाची गोड फळे चाखायला मिळतात..आपल्यात मात्र बर्‍याचदा संयमाची कमतरता जाणवते आणि आपण गोष्टींच्या परिणामांसाठी अधीर होवून जमीनीवर आपले पाय आपटू लागतो. परंतू जर आपण मेहनतीने आणि मन लावून कोणतेही काम केलेले आहे तर शांत मनाने त्याच्या परिणामांची वाट पाहिली पाहिजे. कारण त्या कामातून नक्की काही तरी उत्तम निष्पन्न होईल ह्यावर दृढ विश्वास ठेवण्यालाच संयम म्हणतात. परंतू जेव्हा आपण आपल्या जीवनात संकटांचा सामना करत असतो तेव्हा विचारांच्या माध्यमातून अनेक गोष्टींची चिंता करून घाबरून जातो. त्याचप्रमाणे अशावेळी आपल्याला सर्वकाही असंभव वाटत असते. परंतू त्याचवेळी संयम राखणे गरजेचे असते. कारण ती नियतीने आपल्या संयमाची घेतलेली कठोर परीक्षा असते. त्यावेळी मात्र आपली संयम व चिकाटीने कठोर परीश्रम घेण्याची प्रवृत्तीच योग्यवेळ आल्यावर आपल्यातील आंतरीक शक्तीचा उलगडा करते आणि आपण आपल्या कर्तव्यदक्षतेच्या मार्गावर झळाळून निघतो. ह्याचा अर्थ हा होतो कि कोणत्याही गोष्टीची वाट बघण्याच्या काळात अधीर होवून चालत नाही. याउलट चिकाटी आणि सद्द्यपरिस्थीतीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मनाचा हट्ट ह्यांचीच खरी गरज असते. काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर आपल्या हे लक्षात येते की आपण संयम ठेवल्यामुळेच आपल्याला जिथे पोहचायचे होते तिथे आपण पोहोचू शकलो. ती जर नोकरी असेल तर आपल्या बुद्धीमत्तेच्या आधारे हवे ते पद आपण मिळवीलेले असते.  

   जर ते आपले कुटूंब असेल तर आपला संयम आणि प्रेमाने केलेल्या पालनपोषणाने एक मानसिक शांतता असलेले कुटूंब आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेली आपली जिव्हाळ्याची माणसे आपल्याला लाभली असतील. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा संयम राखल्यानेच आपल्या शारिरीक आणि मानसिक आजारावरही उपचार होत असतात. त्याचप्रमाणे जीवनात कोणतीही परिस्थिती कायम टिकून राहत नाही. कारण आपला प्रवास हा वाईटा कडून चांगल्या कडे, दु:खाकडून सुखाकडे तसेच कमीकडून जास्तकडे निरंतर सुरू असतो. अशाप्रकारे आपले जीवन परिवर्तनाच्या दिशेने झेप घेत असते. तेव्हा आपल्याला आलेले आजारपणही योग्य सुश्रूषेने काही काळानंतर निघून जाते आणि आपण पुर्णपणे बरे होतो. हीच खात्री आपण आपल्या मनात सर्वच बाबतीत बाळगली तर सृष्टीने आपल्याकरीता ठरविलेल्या हेतूशी आपण आजीवन संरेखीत राहतो, त्याचबरोबर काळानुसार येणाऱ्या परिवर्तनास स्वीकारत जातो.  

1. संयमाने स्वत:वरचा विश्वास दृढ होतो

     जीवनातील ध्येय पुर्ण करण्यासाठी कामाच्या प्रती आपला समर्पणाचा भाव आणि अडथळ्यांना पार करत चालत राहणे आपली शक्ती द्वीगुणीत करतात. कारण आपल्या जाणिवेच्याही पलिकडे आपली इच्छा शक्ती प्रबळ असते. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसल्या तरिही संयम ठेवला आणि चिकाटीने काम करीत राहिलो तर आपला स्वत:वरचा विश्वास दृढ होतो. विपरीत परिस्थितीतही संयम राखणे म्हणजे स्वत:चीच कठोर परिक्षा घेण्यासारखे असते. जेव्हा आपण त्या परिक्षेत उत्तीर्ण होतो तेव्हा  आपण निर्धारीत केलेले ध्येय गाठणे आपल्याला  सहज शक्य होते.

2. संयमाने जीवनातील लढाया जिंकू शकतो

    संयमाने आपली आंतरीक शक्ती वाढते आणि आपल्यात प्रवाहाच्या विरूद्धा पोहोण्याची हिंमत येते. कधि कधि आपल्या जीवनात इतकी उलथापालथ होत असते कि सर्व काही अशक्य वाटू लागते. परंतू अशावेळी संयमानेच मनाचे संतूलन राखले जाते आणि आपण कठीन वेळांवरही मात करू शकतो. त्याचप्रमाणे आपली संपुर्ण उर्जा ध्येयावर केंद्रीत करून चिकाटीने वाटचाल करत राहिलो तर दुसर्‍या किनार्‍यावर आपल्यासाठी काहितरी उत्तम ठेवलेले असते. अशाप्रकारे आयुष्यात वादळ उठले असतांना संयमाने आपल्या जीवनरूपी नौकेस पार करावे. सृष्टीने आपल्यासाठी काहितरी उत्तम ठरविले असणार ह्या विश्वासाने आपली कर्तव्ये पार पाडावित. त्यामुळे आपल्याच संयमी व धैर्यवान स्वरूपाचे आपल्याला दर्शन घडेल. 

3. संयमाने श्वासाचे महत्व कळते

    आपण आपल्या जीवनप्रवासात इतके दंग असतो की आपल्या शरिराला एक यंत्र समझू लागतो आणि शरिराप्रति निष्काळजी करू लागतो. कधि स्वत:बरोबर एकांतात वेळ घालविला तर आपल्याला आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू येईल व आपल्या श्वासांचे मोल कळेल. आपला निरंतर चालणारा श्वास  आपण जीवंत असल्याचे चिन्ह आहे. जर आपल्या श्वासांना मुल्य प्राप्त व्हावे अशी जर आपली मनापासून इच्छा असेल तर प्रत्येक श्वासा बरोबर आपल्यात परोपकाराची भावना जागृत करावी. जेव्हा आपण संयमाने आणि सेवाभावाच्या हेतूने कर्तुत्व करतो तसेच आपल्या कर्तुत्वाने प्राणिमात्रास लाभ होतो, तेव्हा आपल्या जीवंत असण्याला महत्व प्राप्त होते.

4. संयमाने अडथळे पार करत पुढे जातो

   ज्या घराची आपण स्वप्ने पाहिली असतात ते आपले स्वप्नशिल्प आपल्या मिळवीण्याच्या अगदी टप्प्यात असते. आपल्या स्वप्नातले कूटूंब आपल्या सभोवताल वावरतांना दिसते. आपण आपले जीवन व्यापन करण्यासाठी जी नोकरी किंवा व्यवसाय करण्याची कल्पना केली होती ते आपले स्वप्न पुर्ण होण्याच्या मार्गावर असते. आपल्याला पाहिजे असलेली जीवनशैली तसेच आपला मित्र परिवार स्वत:हून आपल्या दिशेने चालत येतो. परंतू त्यासाठी संयम राखला पाहिजे त्यासोबत कठोर मेहनतही केली पाहिजे. जीवन प्रत्येक वळणावर आपली परीक्षा घेत असते. जीवनाच्या मार्गावर काटेगोटे असणे ही खरी परिस्थिती असते व फुलांचे गालिचे अंथरलेले असणे म्हणजे स्वप्नातले जग असते. कारण जीवनात काहिही सहज मिळत नाही. परंतू संयम राखल्यास स्वप्नातले जग सत्यात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शेवटी सगळे आपल्या मनासारखे होते.

   आपला जीवनप्रवास काहिही झाले तरी निरंतर असाच सुरू ठेवावा. जीवनात पुढे जाण्यासाठी रोज एक नवी गोष्ट करावी.. सर्वकाही आपल्या आतच आहे फक्त ते बाहेर काढण्यासाठी कायम प्रयत्नशील राहावे. आपल्या इच्छा शक्तीच्या रॉकेट्ला संयमाचे इंधन घालून. जीवनात हवी ती उंची गाठावी. आपलीही वेळ येईल ह्यावर विश्वास ठेवावा. आपले जीवन प्रकाशाने उजळून निघेल. नेहमी हे लक्षात ठेवावे. जीवनात अंधकार असला. तरी चांदण्यांची भेटही लाभली आहे. तसेच काळोखातच चांदण्या जास्त उठून व चाकाकातान्ना दिसतात. चांदण्या म्हणजे आपली वैशिष्ट्ये असतात. जी जीवनातील कठिण काळातच जास्त उजागर होतात. हाच संयमाचा काळ असतो. त्या काळात स्वत:वर जास्तीत जास्त काम केल्यास उजाडल्यावर आपले बदललेले व सर्वोत्तम रूप जगासामोर येते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *