स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे

काळाच्या गरजेनुसार आजच्या युगात स्त्रियाही मोठ्या प्रमाणात उंबरठ्याबाहेरच्या जगात  प्रगती करतांना दिसतात. त्यामुळे जगात नोकरदार स्त्रियांचा वर्ग दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यासोबतच अशाही स्त्रिया आहेत ज्या गृहिणी आहेत तरीसुद्धा काही कारणास्तव घराचा चरितार्थ चालविण्यास आपल्या कुटूम्बास आर्थिक  मदत करत असतात. त्यासाठी त्या छोटी-मोठी जसे मोलकरीण टेलर स्वयंपाकीण अशा प्रकारची कामे करतांना दिसतात. त्याचप्रमाणे काही स्त्रिया घरात राहून फक्त गृहिणीचे कर्तव्य निभावणार्‍याही असतात. ज्या घरातील सगळ्या जबाबदार्‍या अत्यंत समर्पणाने पार पाडतात. गृहिणी हा असा पेशा आहे ज्यासाठी संपुर्ण घराने त्याचे ऋणी असले पाहिजे. कारण ह्या कर्तव्यदक्ष पेशात स्त्रिया दिवसाचे चोवीस तास व वर्षाचे तीनशे पाशष्ठ दिवस निरंतर गुंतल्या असतात. त्यात त्यांना रजा घेण्याचीही मुभा नसते. त्याचबरोबर नावाने फक्त गृहिणी असलेल्या ह्या पेशात स्त्रिया एक काळजी घेणारी, प्रथमोपचार करणारी, आपल्या खास दिवसाची मनापासून तयारी करणारी, मनापासून ऐकुण घेणारी व कधी गरज पडल्यास स्वत:कडे कमीपणा घेवून थोरपणाची मानकरी ठरणारी अशा अनेक महत्वपुर्ण कामांना न्याय देत असतात. परंतू ह्या कामांमधून त्यांना महिन्याअखेरीस पैसा कमविता येत नसल्याने त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर सखोल नकारात्मक परीणाम होत असतो. परंतू तरीही अंतर्मनातून त्या समाधानी असतात. अशा स्त्रियांकडे घरातले सर्वकाही आटोपल्यावर बराच रिकामा वेळ असतो आणि तो त्यांचा व्यक्तीगत वेळ असतो. त्यांना तो वेळ त्यांच्या मर्जीप्रमाणे हवा तसा घालविता येवू शकतो.

    आपण बर्‍याचदा बघतो कि अशा ज्या कर्तव्यदक्ष गृहिणी आहेत त्या त्यांच्या रिकाम्या वेळेला  निरर्थक गोष्टी मध्ये  वाया घालवत असतात. दुपारच्या वेळी त्या किटीपार्टी महिलामंडळाच्या भेटीगाठी करतांना दिसतात. त्याचबरोबर दुपारची झोप किंवा टी.व्ही. सिरीयल बघणे अशा गोष्टींमधे त्यांचा वेळ जातो. किंवा घरात लहान मुले असली तर त्यांच्या मागे त्या आपला संपुर्ण दिवस घालवतात. एकंदरीत त्यांच्या वेळेला शिस्त नसते कारण त्यांचे व्यक्तीगत पातळीवर  कोणतेही ध्येय नसते. त्यामुळे घरातील सदस्यांच्या दिनचर्येत त्या स्वत:ला पुर्णपणे गुंतवून घेतात. अशाप्रकारे प्रत्येकाला दररोज सारखाच वेळ मिळतो त्याचे जर आपण योग्य नियोजन केले नाही आणि वाटेल तसा दिवस ढकलला तर पुढे त्याची खुप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. त्यानंतर पश्चाताप करण्यापलिकडे आप[आल्या हाती काहिही उरत नाही. म्हणून जेव्हा ह्या गोष्टीची जाणीव खास करून गृहिणी असलेल्या स्त्रियांना होते त्याच क्षणी त्यांनी स्वत:च्या सुरक्षित व स्वतंत्र भवितव्यासाठी  निर्णय घेतला पाहिजे. कारण गृहिणींनी आपल्या रिकाम्या वेळेसाठी घेतलेला एक निर्णय अनेकांना मदत उपलब्द्ध करून देवू शकतो.  ज्यामुळे त्यांना आपला वेळ उत्पादनक्षमही बनवीता येईल आणि त्याचे त्यांना मानसिक समाधानही लाभेल.

1. स्वत:ला सकारात्मक ठेवावे.

   स्त्रिया ह्या भावनाशील असतात. तशाच त्या सोशिकही असतात. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात अनेक अग्नीदीव्याला सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. तरिही जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक  ठेवावा लागतो. तेव्हाच त्यांच्या आयुष्याला अर्थ निर्माण होतो. जर त्यांनी आपला रिकामा वेळ स्वत:वर प्रेम करण्यात, स्वत:ची सर्वतोपरी काळजी घेण्यात, आणि स्वत:ची प्रगती करण्यासाठी खर्ची घातला तर त्यांच्या प्रगती सोबतच एक कुटूंब आणि समाजातील वंचीत  वर्गासही त्यांच्या मार्फत मदत मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्त्रिया ह्या समाजाचा महत्वपुर्ण हिस्सा असतात. म्हणूनच जेव्हा त्या स्वत:कडे सकारात्मकतेने बघू शकतील तेव्हाच त्या आपल्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम बनविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहतील.

2. विनामुल्य शिकवण्या घ्याव्या.

    आपण राहत असलेल्या ठिकाणाच्या आस-पास अशा वस्त्या असतात. जिथे राहणार्‍या लहान मुलांना काही कारणांनी शिक्षणापासून वंचीत रहावे लागते. त्याचबरोबर आपल्या घरी घरकामास येणार्‍या स्त्रियांची मुले असतात जी आई-वडील घरी नसतांना चुकीच्या संगतीत फसून वाईट मार्गाला लागतात. जर गृहिणींनी स्वत:शी पक्का निर्धार केला व त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करण्याचे ठरविले तर अशा अनेक मुलांच्या शिकवण्या त्या  आपल्या रिकाम्या वेळेत घेवू शकतात. त्यामुळे त्या मुलांना शिक्षणाचा लाभही मिळेल त्याचबरोबर ते वाईट संगतीत फसण्यापासूनही वाचतील. अशाप्रकारे गृहिणींना त्यांचा रिकामा वेळ उत्पादंनक्षम झाल्याचे व सत्कारणी लागल्याचे समाधान होईल आणि मुलांना मदतही मिळेल.  समाजाच्या कल्याणासाठी आपला खारीचा वाटा देण्यासाठी आपल्या व्यक्तीगत वेळेचे योगदान देण्याची संधी गृहिणींना प्राप्त होण्याइतका त्यांच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग आणखी कोणता असू शकतो.

3. अनाथाश्रमांना भेटी द्द्याव्या आणि श्रमदानही करावे.

    समाजातील वंचीत वर्गास तसेच गरजवंतांना गरजेच्या वस्तू पोहोचविणे, अन्न आणि वस्त्र पोहोचविणे, हे मोलाचे काम करणार्‍या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन  असतात. त्यासाठी त्यांना पुढे सरसावून श्रमदान करण्याची इच्छा दाखविणार्‍याची फार गरज असते. गृहिणींनी स्वत:मध्ये त्याविषयी जागृकता निर्माण करावी. सर्वप्रथम अशा संस्थांना भेटी देवून त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी जाणून घ्यावे आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याची इच्छा असल्यास सोयिस्कर वेळेनुसार श्रमदानाची इच्छा व्यक्त करावी. ह्या कामातूनही गृहिणींना मोठे समाधान लाभू शकते. तसेच त्या आपला रिकामा वेळ परोपकारासारख्या  उत्तम कामात गुंतवू शकतात.

4.  छंद जोपासावे आणि नवे तंत्रज्ञान शिकावे. 

    बर्‍याचदा आपल्या मोठ्या होण्यासोबतच अनेक जबाबदार्‍या आपल्या खांद्द्यांवर पडल्यामुळे  लहानपणापासून मनात जपलेल्या आवडी-निवडी व स्वप्न काळासोबत मागे पडत जातात. अशावेळी गृहिणींनी त्यांचा रिकामा वेळ कधी स्वत:बरोबर एकांतात घालवावा आणि आपल्या आवडीनिवडी व इच्छा ह्याविषयी जाणून घ्यावे. तसेच स्वत:शी पक्का निर्धार करून आपल्या रिकाम्या वेळेचा त्यांची ज्या गोष्टी शिकन्याची प्रबळ इच्छा आहे त्यासाठी उपयोग करून घ्यावा. ज्यात संगणक शिकणे, वाहन चालविणे शिकणे, एखादी नवी भाषा शिकणे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी त्यांनी स्वत:ला प्रवृत्त केले पाहिजे. त्यामुळे नविन पिढीशी जुळवून घेतांना त्यांना कोणताही कमीपणा वाटणार नाही.  त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडेल. त्याचबरोबर त्यांचा व्यक्तीगत रिकामा वेळही उत्पादन क्षम होईल.

      काळासोबत प्रगती करणे ही आजची गरज आहे. ज्याला वेळेचे महत्व कळले तो कधिही आपला वेळ वाया जावू देणार नाही. वेळेचा सदुपयोग केल्याने आपली उत्पादनक्षमताही वाढते. खाली डोके भूताचे घर असे म्हणतात म्हणून आपल्या डोक्याला चांगल्या विचारांनी आणि आपल्या वेळेला चांगल्या कृतींनी सुपीक बनविले पाहिजे. त्यामुळे आपोआपच आपला रिकामा वेळ निश्चितपणे उत्पादनक्षम होत जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *