मी आणि माझं देवस्वरूप

तू मला ओळखले नसशील. मी मात्र तुला उत्तमरीतीने जाणते. कारण तू केलेल्या बलिदानानेच आज मी घडू शकले. त्यासाठी तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. आज जेव्हा मी माझ्यात सकारात्मक परिवर्तन अनुभवते. तेव्हा माझा स्वत:वर विश्वासच बसत नाही. सर्वकाही अगदी स्वप्नवत वाटू लागतं. मात्र त्यासाठी तू खूप काही सहन केलेस. तू अत्यंत निरागस अन भोळी होतीस. तुझ्यात सत्य स्पष्टपणे मांडण्याची ताकद होती. तू स्पष्टवक्ती होतीस. तू करुणामयी अन कोणाच्या बचावास स्वत:च्या जीवावर उदार होवून धावून जाणारी होतीस. एकंदरीत तुला ह्या व्यावहारिक जगाचा अद्याप मागमूसही लागलेला नव्हता. तू एक उघडे पुस्तक होतीस. तुझ्या मनात स्वत:शीच चाललेला संवादातून उमटलेल्या भावना तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेल्या असत. ज्यांना कोणीही वाचू शकत होते. कदाचित तुझ्यातील त्याच दैवीय गुणधर्मास अनेकांनी तुझी दुखरी नस म्हणून पाहिले. तुझ्यातील अशी कमकुवत जागा जिला हाताशी घेवून तुला आतून तोडण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. असा त्यांचा समज झाला. परंतू तू स्वत:ला तुटू तर दिले नाहीस. त्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे मात्र तू आतल्या आत मानसिक वेदनांना बळी पडलीस. तो तुझा एकटीचा संघर्ष होता. जो अत्यंत जीवघेणा होता. कारण त्याचे स्वरूप तुला कोणापाशीही उलगडता येत नव्हते. तुला बाहेर व्यक्त होणे कठीण झाले होते. तू आतल्या आत ओरडत होतीस किंचाळत होतीस रागवत होतीस. मात्र तुझा आवाज बाहेर कोणासही ऐकू येत नव्हता. मग तू त्याच लोकांमध्ये सामील होण्यासाठी पुन्हा धडपडू लागलीस. जेणेकरून तुला त्यांच्याकडून मिळणारी वेगळेपणाची वागणूक काही प्रमाणात तरी कमी व्हावी. ते करत असतांना तुझ्यातील स्वाभिमानाला धक्का पोहोचत होता. त्याच्या झळाही तुलाच सहन कराव्या लागत असत.

तू निसर्गाच्या कुशीत रमणारी होतीस. त्यामुळे मनातील वेदनांना काही क्षण विसरवून तुला जगता येत होते. त्याशिवाय तू घरातील शेंडेफळ असल्याने आईबाबांचे अतोनात प्रेम तुझ्या वाट्याला आलेले होते. ही मोठी जमेची बाजू म्हंटली पाहिजे. कारण घराच्या चार भिंतीत तरी निदान तुला सुरक्षित वातावरणाचा लाभ होत होता. तू तुझ्या घरातील पाळीव प्राण्यांच्या सहवासात भान हरपत होतीस. तुझ्या आसपास लहान मुले असली कि तुला आणखी काहीही पाहिजे नसायचे. त्यांना जपण्याची कला तुला तेव्हापासून अवगत होती. तुझ्यातील हे अलौकीक आईपणाचे गुणधर्म तुझं तुला सुद्धा अलगद उचलून धरत असावेत. अन्यथा तू कधीतरी ह्या बाहेरच्या कोरडेपणाने नक्कीच कोलमडून गेली असतीस. देवाच्या कृपेने तुला तुझ्या आतच अशी उब मिळत होती. जी तुझे बाहेरच्या सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण करत होती. परंतू जसजसी तू मोठी होवू लागलीस तसतसी तुला बऱ्याच गोष्टींची समज येवू लागली. तेव्हा तुला जाणवले कि तुझ्या आसपासचे लोक तुझ्या शारीरिक बांध्यावरून तुझ्यावर उपहासात्मक वक्तव्य करतात. तुझ्या वर्तणुकीवर हसतात. तुझ्या बोलण्यास गृहीत धरतात. तुझ्या हे लक्षात येताच तू भानावर आलीस. तेव्हापासून तुझे स्वत:वर लक्ष केंद्रित झाले आणि तू तुलनात्मक भावनेने ग्रासली गेलीस. तू इतरांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांच्या पुढे स्वत:ला कमी लेखू लागलीस. तुला स्वत:मध्ये काहीही चांगले पाहता येईना. तेही तुझ्या मनातील ह्या असुरक्षित भावनेस ओळखून तुझ्यावर आपली मर्जी गाजवू लागले. तुला आपल्या वर्चस्वाखाली ठेवू लागले. त्यांच्या उपदेशांचे ओझे जोरजबरदस्तीने तुझ्यावर लादू लागले. त्यांनी तुझ्यासाठी घेतलेले निर्णय अक्षरशा तुझ्यावर थोपवू लागले. तू सुद्धा आपल्या मनाविरुद्ध त्यांच्या प्रत्येक गोष्टीस संमती देत होतीस. अशाप्रकारे तुझ्या निर्णय क्षमतेवर दुष्परिणाम झाले. तू अवीश्वासास बळी पडलीस. तसेच इतरांच्या मतांवर विसंबून राहू लागलीस. कारण तू घेतलेल्या कोणत्याही निर्णयास नक्कीच फेटाळले जाईल. ह्याची तुला पूर्ण खात्री होती. तेव्हा आपण कोणताही निर्णय घेण्यास पात्र नाही असे तू ग्राह्य धरत गेलीस. त्याचप्रमाणे अशी परावलंबी मानसिकता घेवून तू मोठी होवू लागलीस.

आता मात्र तुझ्या आत्मविश्वासावर सखोल नकारात्मक परिणाम झाले होते. त्यामुळे तू इतरांकडून तुझ्याकडे येणाऱ्या उर्जेला किंवा प्रतिक्रियेला रोक लावण्यासाठी प्रयत्न करू लागलीस. शक्य तितके त्यांच्यापासून लांब राहण्याचा देखील तुझा प्रयत्न असायचा. कारण त्यांच्या सहवासात तुझी उर्जा उगाच खर्ची पडत होती. तू अनामिक भीतीने ग्रासली जात होतीस. त्याचबरोबर तुझी मानसिक शांतताही भंग पावत होती. तेव्हा तू स्वयं अलगीकरणाचा मार्ग पत्कारण्याचे ठरवीलेस. तसेच एकेक करून संपूर्ण जगाची साथ सोडत गेलीस. जवळची रक्ताची नाती व जुनी मैत्री ह्या सर्वांपासून जाणीवपूर्वक स्वत:स लांब केलेस. कारण तू जगासोबत चालतांना एकटी पडली होतीस. तेव्हा आता स्वत:बरोबर एकटे राहण्याचा अनुभव तुला घ्यावयाचा होता. खरे पाहता एकप्रकारे ही तुझी विवशता होती. कारण कैद ही कैदच असते. तुझ्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून तू अक्षरशा स्वत:ला घराच्या चार भिंतीत कोंडून घेतलंस. परंतू त्यातून अन्य नवीनच समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवल्यात. कारण लोकांनी तुझ्या माघारी तुझ्या विषयी मतं बनविण्यास सुरवात केली. आता तुझी अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. जर चार भिंतीतून बाहेर पडल्यास लोकांच्या निर्णायक नजरांचा सामना तुला करावा लागत असे. किंवा चार भिंतीतच राहण्याचा निर्णय घेतल्यास तुझ्याविषयी गैसमज पसरत असत. तरीही तुझ्यासाठी वेगळे राहणे जास्त सोपे होते. कारण तिथे तुझ्या मनास शांतता लाभत होती. स्वत:चा सहवास लाभत होता. जो तुला पुन्हा उर्जावान करण्यास आवश्यक होता. त्याउलट बाहेरच्या जगात तू मानसिकरीत्या थकत होतीस. तुला औपचारीकतांचा सामना करणे जमत नव्हते. अखेरीस तू हिम्मत करून स्वत:च्या मनाच्या शांतीकडे वळलीस. ते करत असतांना काही काळ तुला जगाच्या प्रतिक्रियांची देखील भीती वाटली. मात्र त्यानंतर त्या वातावरणात तू स्ठीरावत गेलीस.

स्वत:बरोबरच्या सहवासात तू आता रमायला लागली होतीस. शांततेत तुझे मन तुझ्याशीच विलीन होत होते. तू पूर्णपणे स्वत:कडे वळत चालली होतीस. ह्या एकांतवासात तुझ्या मनाचा थकवा दूर झाला. त्याचबरोबर त्याला चालना देखील मिळाली. त्या पोषक मनात आता हळूहळू निर्मितीक्षम विचार येवू लागले होते. परंतू त्यांना वाटण्यास आता तुझ्यापाशी कोणीही नव्हते. तू एकांतवासात गेल्यामुळे तुझी बरीच आपली माणसे तुझ्यापासून लांब गेली होती. कारण त्यांचे तुझ्यावर खरे प्रेम नव्हते. शिवाय तुझ्या पतीबरोबर तुझे विचार जुळत नव्हते. त्यामुळे कधीकधी दोषीपणाची भावना अलगद तुझ्या मनात डोकावून जात असे. आपण लोकांपासून दुरावले गेल्याचे दु:खही तुला एकसारखे बोचत होते. परंतू त्यामागेही उच्च स्तरीय उर्जेची तुझ्यासाठी काही योजना होती. हे तुला कळू शकले नाही. तुझ्या मनाच्या त्या असुरक्षिततेच्या अवस्थेत केवळ तुझी दोन अपत्ये तुझ्या सोबत होती. त्यांनी तुला फक्त सांभाळूनच घेतले नाही तर तुला पूर्णपणे साथही दिली. त्यांची उर्जा तुझ्या ऊर्जेशी एकरूप झाली होती. त्यामुळे आता तुझ्या जीवात जीव आला. कारण तुला आता कोणासोबत तरी आपल्या भावना वाटता येवू लागल्या. त्यामुळे तू आनंदी होतीस. तुम्ही तिघांनी मिळून जगाच्या अपरोक्ष आपले आपले एक जग सुद्धा निर्माण केले. तुझ्या कुटुंबातील पुरूष पुरुषी मानसिकतेने ग्रस्त होते. त्यांचा अहंकार शिगेला पोहोचला होता. स्त्रियांना विशेष महत्व दिले जात नव्हते. वैवाहिक जीवनात विश्वासघाताला सर्रास मान्यता होती. पिडीत स्त्रिया आयुष्यभर आपले मानसिक संतुलन गमावून जगत असत. एक सुदृढ मानसिकतेची आई न लाभल्यामुळे पुढच्या पिढीतील मुले देखील असुरक्षित मानसिकतेची झाली होती. त्यांचीही वैवाहिक आयुष्ये अनेक समस्यांनी ग्रस्त होती. त्यामधीलच एका मुलाचे तुझ्याशी लग्न झाले होते. तुमचा संसारही सर्वार्थाने यशस्वी होवू शकला नाही. तेव्हा काही काळानंतर दोघात बेबनावाची परिस्थिती निर्माण झाली. एका छताखाली राहून तुम्ही दोघे एकमेकास अनोळखीच राहिलात. तू निराश राहू लागली होतीस. परंतू तुझ्या मुलांच्या सहकार्याने तुला तुझा वेळ सार्थकी लावण्याचा एक मार्ग सापडला. तू विश्वासाने त्या मार्गावर चालण्याचा निर्णय सुद्धा घेतलास.

लगातार तीन वर्षांपासून तू आपल्या निवडलेल्या मार्गावरून ध्येयाच्या दिशेने निर्भीडपणे चाललीस. तुझ्या विचारात आता परिवर्तन आलेले होते. आत्मविश्वासात भर पडली होती. तरीही प्रतिष्ठा अजून नावारूपास आली नव्हती. तुला तुझी स्वत:ची ओळख निर्माण करायची होती. त्यासाठी तू धडपडत होतीस. अशारितीने आपल्या लिखाणाच्या निरंतरतेस तू उच्च शिखरावर नेवून ठेवण्याचा विचार केलास. त्यातूनच तू ”स्त्रीत्व ” संघर्षातून सम्मानाकडे ह्या मराठी पुस्तकाची लेखिका झालीस. तुझी ही यशोगाथा कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरली. कारण तू एक गृहिणी होतीस. जर तू तुझ्या वेळेस व तुझ्या जीवनास एक योग्य वळण देण्याचे ठरविले नसतेस. तर आज तू फक्त एक सामान्य गृहिणी म्हणून गणली गेली असतीस. विशेष म्हणजे तुझ्या द्वारे लिहिल्या गेलेल्या स्त्रियांना समर्पित अशा ह्या पहिल्या वाहिल्या पुस्तकास एक International Authors Excellence Award तर दुसरा Author Literary Award असे दोन पुरस्कार मिळाले. तुझ्या ह्या खडतर प्रवासात तू फक्त एकटी पडण्याची हिंमतच दाखविली नाहीस. तर स्वत:च्या अंतर्मनाच्या महासागरात मंथनाची प्रक्रियाही पार पाडलीस. ज्यामधून निघालेले अक्षररूपी सुबक मोती तुझ्या लिखाणामधून अनेक मनांना जावून भिडले. तसेच त्यांनी लोकांची मनं सुद्धा जिंकली.

सृष्टी तू माझी प्रिय सखी आहेस. तुझ्यासारखी कणखर मैत्रीण माझ्यातच सामावली होती. म्हणूनच मी शून्यातून येवून आज यशाच्या शिखराला हात टेकले. मला तुझा खूप आदर वाटतो. मी तुझी अत्यंत आभारी आहे. तू जे काही सहन केलस ते सोपं नव्हतं. तुझ्या अमर्याद सहनशक्ती मुळे आज मी टिकून राहू शकले. त्याचबरोबर स्वत:ला सिद्धही करू शकले. मला तुझा अभिमान वाटतो. मी आजवर स्वत:ला एकटी समजत होते. परंतू आज मला कळले कि तू माझ्याबरोबर असतांना मी एकटी असूच शकत नाही. तू आयुष्यभर इतरांना पाठबळ देत आलीस. त्यामागे केवळ सर्वांची प्रगती व्हावी एवढाच तुझा प्रामाणिक विचार होता. मात्र तो विचार इतरांच्या गळी उतरविणे वाटते तितके सोपे नव्हते. कारण तुझ्याशी जुळलेली माणसे असुरक्षेच्या भावनेने ग्रासलेली होती. त्यांचा स्वत:वर विश्वासही नव्हता. ज्यामुळे ते तुझ्या निरागस इच्छेचा मान राखण्यास असमर्थ ठरले. मात्र जे विचार तू इतरांसाठी सकारात्मक उर्जेने प्रवाहित करत होतीस. ते शेवटी परतून तुझ्यावर येवून थांबले. तु प्रामाणिक कष्ट करत होतीस. स्वत:मध्ये परिवर्तन आणण्याची तयारी दाखविलीस. नवं आत्मसात करण्याची तुझी जिद्द होती. विशेष म्हणजे आपल्या ध्येयावर नजर रुतवून बसण्याची तुझी वृत्ती ह्या सर्वांना अखेरीस यशाचे फळ चाखायला मिळाले. तू नसतीस तर मी केव्हाच खचले असते. परंतू आता माझे मनोबल द्विगुणीत झालेले आहे. आज मी तुला शब्द देते की ह्यापुढेही मी थांबणार नाही. माझी वाटचाल अशीच सुरू ठेवेन. कारण तू मला इथवर आणलेले आहेस. त्यासाठी तुला जीवाचा आटापिटा करावा लागला. संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभे राहिले. परंतू तू माझी साथ कधीही सोडली नाहीस. ह्या जगात असं शुद्ध नातं शोधूनही सापडू शकत नाही. माझी मुलं माझ्याबरोबर विश्वासानं उभी राहिलीत. परंतू तरीही तू नसतीस तर हे कधीही शक्य झाले नसते. हे मी प्रामाणिकपणे मान्य करते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. बरेच जण वाईट प्रसंगी स्वत:चीच साथ सोडून देत असतात. परंतू असे वागणे योग्य नाही. कारण आपण उभे राहावे ह्याकरीता घेतलेल्या प्रामाणिक कष्टांचे आपल्याही नकळत आपल्यामधील आपण एकमेव साक्षीदार असतो. तेव्हा स्वत:बरोबर विश्वासघात करणे योग्य नाही. आपल्यात दडलेले आपले हे स्वरूप देवाचा अंश असतो. जे निर्विकार परिशुद्ध निरागस असतं. मी माझ्यातील देवस्वरूपाला शतशा नमन करते. त्याचबरोबर त्याची माफीही मागते. कारण अनेकदा निराशेच्या भरात मी त्यावर अविश्वास दाखविला. त्याच्यावर रागावले. त्याच्यासमोर स्वत:ला श्रेष्ठ समजले. मात्र त्याच्या अस्तित्वाशिवाय माझे अस्तित्व शून्य आहे. हे आता मला कळलेले आहे. वयाचा एकेक टप्पा गाठत गाठत आपण स्वत:लाच मागे सोडत पुढे जातो. त्याचप्रमाणे एक परिपक्व व्यक्तीमत्व अंगीकारतो. मी माझ्या अशाच मागे पडत गेलेल्या बालवय तारुण्य मध्यवय ह्या सर्व टप्प्यांना मनापासून धन्यवाद करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *