
मी एक पन्नास वर्षीय स्त्री असून एका छोट्याश्या गावातील मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण बालवयात मायबोलीचा उत्तम सराव झालेला असल्याने आज मी एक लेखिका बनू शकले. मी कविता व चारोळ्या लिहू शकते. माझे विविध विषयावरचे लेख माझ्या ”सुगंधा” ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. खरेतर मी आयुष्यभर गृहिणी बनून जगले. मात्र हृदयात कोठेतरी लेखनाचे बीज माझ्या मराठी शाळेनेच माझ्याही नकळत रोवले असावेत. त्यामुळे माझ्यातील लिखाणाच्या छंदाला वय देखील थांबवू शकले नाही. वयाची पन्नाशी म्हंटले कि निवृत्तीचे वय म्हणून सर्वसाधारण दिनचर्येत स्वत:ला गुंतवून धन्यता मानणाऱ्या गृहिणी ह्या पेशात मी अनेक वर्ष आहे. तरीही स्वत:ला दररोज नियमित लिखाण करण्याची सवय लावली. आज facebook वरच्या वेगवेगळ्या साहित्यिक समूहांच्या उपक्रमांमध्ये सक्रीयरीत्या सहभागी होवून मी माझ्यातील ह्या उल्लेखनीय कौशल्यास आणखी तीक्ष्ण करण्यासाठी सातत्याने झटत आहे. ज्यामधून मला अतुलनीय समाधान लाभतं. त्यामुळे मी एका मराठी शाळेची विद्यार्थिनी राहिले असल्याचे गर्वाने सांगावेसे वाटते. असाच एक नव्याने प्रदर्शित ”क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम” हा मराठी चित्रपट पाहण्यास मी माझ्या लेकाबरोबर जवळच्या चित्रपटगृहात हजेरी लावली. चित्रपटाच्या सुरवातीलाच अमेय वाघने साकारलेल्या ”बबन” ह्या पात्राच्या डोळ्यातील त्याच्या शिर्के गुरुजींसाठीचा आदर व त्याचे त्यांच्याशी असलेले हृदयानजीकचे नाते पाहून माझ्या डोळ्यांना अक्षरशा धारा लागल्या. अलगद जुन्या तारा छेडल्या गेल्या अन मन अगदी भरून आले. त्याचक्षणी माझ्या मराठी शाळेतील सन्माननीय गुरुजनांची मला प्रकर्षाने आठवण सुद्धा झाली. तेव्हाचे जग तंत्रज्ञानापासून अबोध असल्याने माणसांच्या स्वभावाला साधेपणाची झालर होती. जी आमच्या गुरूजनांमध्ये आवर्जून बघायला मिळायची. त्याशिवाय ते कडक शिस्तीचे असायचे. शिक्षक म्हंटले कि समाजासाठी एक आदर्शवादाचे जिवंत उदाहरण मानले जायचे. त्यामुळे शिक्षकी पेशातील इसमास समाजात विशेष बहुमान देखील होता. कारण समाजाला घडविण्याच्या श्रेष्ठ कार्यास त्याचा हातभार लागायचा. म्हणूनच तेव्हाचे शिक्षक स्वत:ला व्यसनांपासून व वाईट प्रवृत्तींपासून जाणीवपूर्वक लांब ठेवत असत. अशाप्रकारे एक माणूस म्हणून देखील विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी सम्मान आणखी वाढत असे. जो आजीवन तसाच टिकून राहत होता. हा चित्रपट पाहतांना त्या उच्च कोटीच्या सम्मानाची मला आवर्जून जाणीव झाली. गाण्याच्या माध्यमातून गुरूजींना लावलेले ”कल्पतरू” हे विशेषण अगदी यथायोग्य होतं. शिक्षकांचे आपल्या शाळेप्रती व विद्यार्थ्यांप्रती असलेले असे एकनिष्ठ अजोड प्रेमच विद्यार्थ्यांना आजीवन शाळेशी जोडून ठेवत असतं. त्यामुळेच शाळा हा आजही आमच्यासाठी भावनिक विषय आहे. शाळेला दुरून जरी न्याहाळले किंवा आजही शिक्षकांच्या पुढ्यात उभे राहिलो तरी आमचे शिष आपोआप नतमस्तक होते. तसेच डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. भूतकाळातील त्या सुरेख आठवणी व गुरुजनांबरोबरचे जीवाभावाचे नाते माझ्या आयुष्याची बहुमूल्य पुंजी आहे. सचिन खेडेकर सरांनी साकारलेल्या शिर्के गुरुजींच्या पात्रातून मला माझ्या अशाच कितीतरी शिक्षकांचे मनोमन दर्शन झाले. ह्या चित्रपटाने मला एक अद्भूत अनुभव दिला. कारण तेव्हाचे शिक्षक वेतनापुरती नोकरी व शिक्षणाचा बाजार करत नव्हते. म्हणूनच त्यांच्या देखरेखीत घडलेले विद्यार्थी केवळ ज्ञानार्जनच करत नसत तर सुसंस्कृतही घडत होते. मात्र आज दुर्दैवाने अशा आपल्या संस्कृतीचा कणा असलेल्या मराठी शाळा अक्षरशा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण आपण त्यांची तुलना महागड्या इंग्रजी शाळांशी करू लागलो आहोत. आपल्याला आपली मुलं मायमराठीतून संवाद साधणारी नको आहेत. तर शेजाऱ्यांच्या मुलांसारखी फाड फाड इंग्रजी बोलणारी हवी आहेत. आई वडील म्हणून आपणच जर हे तुलनेचे रानटी गवत जोमात फोफावू दिले. तर येणारा समाज मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ राहणार नाही. मराठी शाळा अस्तित्वात राहिल्या नाही तर महाराष्ट्राची संतपरंपरा थोरांचा इतिहास जो युगानुयुगे ध्रुव ताऱ्यासारखा समाजाला दिशा दाखवत आला. त्याला खंड पडल्याशिवाय राहणार नाही. मराठी भाषेत झालेली सरमिसळ तिला शुद्ध राहू देणार नाही. मग आईशिवाय समाजाचे भवितव्य असभ्य असंस्कृत अविचारी दुराचारी घडले तर त्यात काहीच द्विमत नाही. ”क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम” ह्या चित्रपटाने मला पोट धरून हसविले. त्याशिवाय भावनिक करून खूप रडविले सुद्धा. त्यामधून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. ह्या चित्रपटाद्वारे समाज प्रबोधनास नक्कीच मदत होईल. प्रत्येक पात्राने मन अगदी जिंकून घेतले. ह्या चित्रपटाने एका सुंदर अनुभवासोबत हळूहळू आपल्या विस्मरणात चाललेल्या आपल्या मायबोलीच्या आपल्याला आणखी जवळ आणले. मराठीशी असलेले आपले नाते पुन्हा एकदा घट्ट केले. आज ह्या प्रगत जगात टिकून राहण्याकरिता नवीन तंत्रज्ञान नवनवीन भाषा आत्मसात करणे अनिवार्य आहे. मात्र त्याला थेट आपल्या आत्मसम्मानाशी जोडणे योग्य नाही. आत्मसम्मान तर आपल्या मातीशी आपल्या भाषेशी एकनिष्ठ राहिल्याने वाढतो. मुळांपासून विलग होवून कितीही आकाशात उडण्याचा आनंद येत असला तरी कधीनाकधी त्या मुळांनी आजवर दिलेल्या पोषणाचा अभावही आपल्याला जाणवणारच. प्रगती त्यालाच म्हणतात जी काहीही मागे सुटू देत नाही. तर जे आहे त्यात अतिरिक्त भर घालत जाते. ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या मराठी शाळांसाठी त्यांनी उचललेले हे पाउल खरच खूप वाखाणणीय आहे.
Categories
- आत्मप्रेम (19)
- जनरल (42)
- मानसिक स्वाथ्य (28)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (15)
- होममेकर (9)