
हक्क हा गाजविण्यासाठी नाही, हक्क मागण्यासाठी नाही, हक्क ओरबाडून घेण्यासाठी नाही, किंबहुना हक्काचा गैरवापर करणेही योग्य नाही. विवाहोत्तर बंधनात तर हक्क ह्याचा अर्थ काहीही करण्याअगोदर दोघांचीही परस्पर संमती असणे _ असा होतो. हक्क ह्याचा अर्थ सहचर सहचारिणीतील गोड नवलाई _ जी त्यांच्यातील प्रेम हळूहळू वृद्धींगत होण्यास मदत करते. कधी कधी एकमेकांना हक्काने रागवीन्यामागेही प्रेमच दडलेले असते. हक्काला मायेची व काळजीची जोड दिली गेली, तर एका अतूट बंधनांची गोड सुरवात होते. परंतू जर हक्काला अहंकाराची जोड दिली, तर मात्र नातं मीपणाच्या तालावर नाचू लागतं. त्यातून व्यक्तीस्वातंत्र्य हिरावलं जातं. जोडीदाराच्या क्षेत्राची, इच्छांची व होकार – नकाराची सुद्धा त्याच्या मनाविरुद्ध पायमल्ली केली जाते. तसा हक्क फक्त धाक व भीतीच निर्माण करत असतो. हा मालकी हक्क- जेव्हा एक पती आपल्या पत्नीवर गाजवितो, तेव्हा तो तिची एक माणूस म्हणून किंचितही किंमत करत नाही. वाटेल तेव्हा, वाटेल ती मागणी त्याने तिच्यापाशी करावी _ आणि तिने ती काहीही आक्षेप न घेता निमूट पूर्ण करावी, एवढंच त्याला कळत असतं. तिची इच्छा, तिचे मन, तिच्या भावना, तिचा होकार किंवा नकार ह्या सर्वांची त्याच्या लेखी शून्य किंमत असते. अशा नात्यात असंतुलन निर्माण होतं. पत्नी कायम पतीच्या दडपणाखाली वावरत असते. दोघात कधीही सामंजस्य व मैत्री निर्माण होत नाही. पत्नीवर आपल्या हक्काचा गैरवापर करणं, हा पतीला एकप्रकारे आपला पुरुषार्थ वाटत असतो. जो चारचौघातही तो गर्वाने मिरवतो. पत्नीची भावनिक कोंडी करणे, इतरांदेखत तिला खजील करणे, एकांतातही तिला अपमानीत करणे व तिच्या मर्जीशिवाय तिचे शारीरिक शोषण करणे, ह्या सर्व अमानवीय गोष्टी करून त्याला राक्षशी आनंद होत असतो. ‘पतीचा हक्क’ ह्या नावाखाली असंख्य स्त्रिया आयुष्यभर ‘वैवाहिक बलात्कार’ सहन करत असतात. कारण ह्यावर कोणताही कायदा नाही.
स्त्रियांना समाजातील विकृतीपासून संरक्षण मिळावे _ म्हणून विवाहाला एक पवित्र बंधन समजून, स्त्रियांसाठी मर्यादेची सीमारेषा आखून दिली जाते. त्या रेषे बाहेर गेल्यावर स्त्री सुरक्षित नाही _ असं आपल्याला हमखास वाटत असतं. परंतू रेषेच्या आत तरी ती कितपत सुरक्षित आहे, हे जाणून घेण्यात कोणालाही रस नसतो. घर नावाच्या चार भिंतीतील तिच्या किंकाळ्याना सर्रास अमान्य करण्यात येते. कारण ते हक्काचं ठिकाण असतं. तिथं कमीजास्त, वरखाली होणं हे तिनं घेवूनच चालायचं असतं. त्यावर तिनं आवाज उठवणं म्हणजे निर्ल्लजतेची सीमा पार करणं. कोणापाशी मदत मागणं म्हणजे नात्यांचं उल्लंघन करणं. अशा चाकोरीबद्ध चौकटीत समरस करून _ तिला अक्षरशा मुर्खात काढलं जातं. तिच्यावर कुटूम्बाची मानहानी केल्याचे आरोप केले जातात. त्याचबरोबर तिला एकटंही पाडण्यात येतं. कधी कधी तर पतीपत्नीचे खाजगी आयुष्य म्हणून त्यावर जाणूनबुजून कायमचा पडदा सुद्धा टाकण्यात येतो. किंवा मग शारीरिक संबंधासारख्या विषयावर बोलणेच टाळले जाते. घरातील स्त्रियांना सुद्धा अशा पिडीत स्त्रीची व्यथा कळत नाही. आजही रूढी परंपरांच्या नावाखाली तिच्या मनातील घालमेल समजून न घेता, तिला सर्रास त्यात ढकलून देण्यात येते. विवाहानंतर एक स्त्री आपल्या शरीरावरचाही हक्क गमावून बसते, ही चुकीची समजूत समाजात रुजवली गेली आहे. लग्न म्हणजे स्त्रीने तनमनधन समर्पित करणं असतं _ असा शब्दश: अर्थ काढून तिची त्या संज्ञेखाली अतोनात पिळवणूक केली जाते. मात्र एका स्त्रीचं शरीर ‘आईची’ उबदार कुसही असते. तेव्हा तिचा स्वत:वरचा पहिला हक्क हा कायम अबाधित राहिला पाहिजे. तिच्या मर्जीशिवाय पतीने आपली मर्यादा ओलांडू नये. एका स्त्रीचा सुद्धा तो माणूस म्हणून हक्क आहे.
विवाहानंतर पतीपत्नीस शारीरिक संबंधांसाठी समाजाकडून परवाना मिळतो. त्या गोष्टीला गैर मानले जात नाही. उलट त्याप्रीत्यर्थ ‘मधूचंद्राची रात्र’ ही प्रथा सुद्धा प्रचलीत आहे. त्यासाठी एका पेक्षा एक सरस योजना विवाहोपरांत आखल्या जातात. देशविदेशात जावून हनीमून साजरा करण्यात येतो. काही प्रसिद्ध ठिकाणंही त्याकरीता ठरविलेली असतात. मात्र त्या अगोदर मनाच्या मिलनाचे काय? पतीपत्नी आयुष्यभरासाठी एकत्र आलेले असतांना, प्रथेच्या नावाखाली कोणत्याही गोष्टीची इतकी घाई कशाला हवी? आपला वेळ घेवून, एकमेकांच्या अडचणींचा व होकार-नकाराचा सम्मान राखून, माणूस म्हणून परस्परांना समजून घेत _ ह्या सुरेख नात्यात दोघांनीही एक एक पाउल अलगद पुढे टाकले पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीची योग्य सुरवात ही, कालांतराने ती गोष्ट आणखी गुणवत्तापूर्ण होण्यास महत्वपूर्ण ठरत असते. नातं दोघांनाच निभवायचं असल्यामुळे त्यात इतरांचा हस्तक्षेप कमीत कमी राहील, ह्या गोष्टीचे भान नक्कीच राखले पाहिजे. नात्यात हक्काच्या नावाखाली आपल्याच जोडीदाराशी गैरवर्तन करण्यापेक्षा सामोपचाराने व संवाद साधून योग्य निर्णय घेतला पाहिजे. कारण मन आणि विश्वास ह्या दोन गोष्टी जिंकल्याशिवाय थेट शरीरसुखाकडे वळणे म्हणजे जोडीदाराच्या भावनांचा अनादर करण्यासारखे असते.
1. विवाहाअगोदर व्यवसायिक समुपदेशन घ्यावे
बरेचदा विवाहानंतर होणाऱ्या ह्या शारीरिक संबंधांना घेवून पतीपत्नी दोघांनाही अगोदरच उत्सुकता, मनाची घालमेल व अस्वस्थता ही असतेच. अशावेळी ते आपल्या मित्रपरिवारात त्याविषयी चर्चा करतात. जिथे त्यांना कधीकधी आणखीच भडकविणारे व उलटसुलट सल्ले दिले जातात. पुरुषांच्या तर पुरुषार्थालाच आव्हान केले जाते. जे एका नवविवाहित दाम्पत्यासाठी विस्फोटक ठरू शकतं. म्हणून आपल्या मनात उसळणाऱ्या ह्या विषयावरच्या प्रश्नांच्या लाटेला योग्य ठिकाणी मांडणं महत्वाचं असतं. जोडीदारासोबतच्या आपल्या नात्यास आणखी सर्वोत्कृष्ठ बनविण्यासाठी व्यावसायिक समुपदेशनाचा चा मार्ग निवडणे अगदी यथायोग्य आहे. ज्याच्या सहाय्याने आयुष्यातील त्या सोनेरी क्षणांना आयुष्यभराकरीता स्मरणीय बनविता येवू शकतं. अन्यथा हक्काचा गैरवापर केल्यामुळे पहिल्या रात्रीनंतर जुळण्यापूर्वीच दोन मनांच विभाजन झाल्याशिवाय राहत नाही.
2. आपल्या जोडीदाराला जाणून घ्यावे
दोन व्यक्तीमधील उत्कृष्ट संवाद, त्यांना आपसात मोकळं करण्यास सर्वात उपयोगी मार्ग आहे. एक स्त्री विवाहोपरांत केवळ आपलं शरीर घेवून पुरुषाच्या आयुष्यात पदार्पण करत नाही. तर आपलं मन, आपला भूतकाळ, आपलं बालपण, आता पर्यंतच्या आयुष्यात घेतलेले चांगले वाईट अनुभव _ तिला आपल्या जोडीदाराशी वाटायचे असतात. जेणेकरून दोघांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावं. दृढ विश्वासाच्या भक्कम पायावर नात्याची सुरवात व्हावी. परंतू जर पुरुषाने तिच्यावर आपला पुरुषी हक्क गाजवीन्याच्या नादात तिला मनाने मोकळं होण्याची संधीच दिली नाही, तर मात्र ती दडपणाखाली वावरू लागते. ज्यामुळे पतीबरोबरच्या संबंधांमध्ये ती भावनिकरीत्या पूर्णपणे सहभागी होवू शकत नाही. मग ती फक्त तिच्या शरीरावर केलेली बळजबरी ठरते, ज्यात कोठेही तिचा आत्मा हजर नसतो.
3. जोडीदाराच्या जागेवर स्वत:ला ठेवून बघा
आयुष्य बटन दाबल्यासारखं क्षणात इथं बंद तर तिथं सुरू करता येत नाही. एक स्त्री आपलं मायेचं विश्व मागे सोडून, फक्त आपल्या पतीच्या विश्वासावर सर्वस्वी नवीन माणसांमध्ये आपलं पाउल ठेवत असते. तिथ आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी तिला पतीच्या प्रेमाची व सहकार्याची आवश्यकता असते. आपल्या माणसांपासून लांब होणं तिच्यासाठी वाटतं तितकं सोपं नसतं. तिच्या अशा अत्यंत भावनिक परिस्थितीत _ जर तिचा पतीच आपला पुरुषी हक्क गाजवत तिच्यावर तुटून पडला, तर तिची काय अवस्था होत असावी. त्यातल्या त्यात आपल्या मनातील घालमेल सांगण्या इतपत तिची घरातील इतर स्त्रियांशी घनिष्ठ ओळखही झालेली नसते. तेव्हा कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीस मानसिकरीत्या स्थिर होण्यास काही काळ द्यावा. कारण बाकी गोष्टी करण्यासाठी पुढ्यात आयुष्य पडलेलं असतं.
4. जोडीदाराला मैत्रीचा हात द्या
विवाहोपरांत हनिमून सारख्या संकल्पना त्यासाठीच प्रचलित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून एका नव दाम्पत्याने पतीपत्नी म्हणून एकमेकांचा तनामनाने स्वीकार करण्याअगोदर, एकमेकांस माणूस म्हणून जाणून घ्यावे. आपल्या जोडीदारासमोर सर्वस्वी पारदर्शक व्हावे. नात्यास स्वीकारण्यापूर्वी आपसात मैत्री करावी. त्यासाठी त्यांना काही काळ फक्त एकमेकांसोबत , जगाच्या कोलाहलापासून लांब एकांतात घालविता यावा. परंतू बऱ्याचदा हनिमून ह्या गोष्टीला फक्त शारीरिकसंबंधांशी जोडून, त्यावरून नवदाम्पत्याची चेष्टा करण्यात येते. खरेतर ह्या सोनेरी काळात जोडप्याने एकमेकाना मैत्रीचा हात द्यावा. परस्परांना जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे. पतीने आपल्या हक्काची बळजबरीने मागणी करून कधीही नववधूच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नये.
एक स्त्री दोन परिस्थितीत स्वत:हून सर्वस्वी समर्पित होत असते. जेव्हा तिच्या मनात आपल्या जोडीदारासाठी खूप आदर असतो. किंवा, जेव्हा जोडीदार तिच्या भावनांना समजून घेवून, त्यांना पहिले प्रादान्य देतो. पुरुषांनीही स्त्रियांच्या ह्या दोन्ही पडताळणीवर खरे उतरूनच, त्यांचे मन जिंकले पाहिजे. तसेच आपल्याशी विश्वासाने जुळलेल्या त्या स्त्रीस सन्मानाने स्वीकारले पाहिजे. कारण त्याने तिला एकांतात दिलेला सम्मान ती कायम लक्षात ठेवत असते. परंतू पुरुषी अहंकाराला मात्र स्त्रीवर मालकी हक्क दाखवून _ तिला बळजबरीने मिळवायचे असते. तिच्यावर आपले अधिपत्य स्थापित करायचे असते. पुरुषांच्या ह्या राक्षशी प्रवृत्तीला कधीही स्त्रीच्या समर्पणाची महती कळत नाही. तिला ओरबाडूनच त्यांना अघोरी आनंद होत असतो. परंतू स्त्रियांनी ह्याविषयी वाच्यता करणे थांबवू नये. कारण पुरूषांचा हा हक्क स्त्रियांचे जगणे नकोसे करून टाकतो. आपल्या आत्मसम्मानावर त्यांच्या मनात दररोज प्रश्नाचिंह उठत असतात. माणूस म्हणून घराच्या चार भिंतीतच नियमित होणारी ही मानहानी मग एके दिवशी ठिणगी बनते _ आणि अनर्थाचे कारण बनते. म्हणून हा विषय नजरेआड करण्यासारखा नाही. त्यावर घराघरात जागरूकता आली पाहिजे. स्त्रीचे शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच तिची आत्मप्रतिमा, मानवीजीवनाचा बळकट कणा आहेत. त्याच्या रक्षणार्थ पाउल उचलले गेलेच पाहिजे.
Categories
- आत्मप्रेम (19)
- जनरल (42)
- मानसिक स्वाथ्य (28)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (29)
- स्पेशल पोस्ट (15)
- होममेकर (9)