
‘स्त्री ही बंदिनी’, ‘स्त्री जीवना तुझी कहाणी’ अशाप्रकारची हृदयाला भिडणारी वाक्ये स्त्रियांसाठी का उच्चारली गेली असावीत? हा असा प्रश्न स्त्रियांना सुद्धा का कसा कधी पडला नाही. कारण युगानु युगे ह्या वाक्याप्रमाणेच स्त्री जीवन घडत गेलेलं आहे. एका स्त्रीची तशी मानसिकताच बनत गेली, स्वत:ला स्वत:हून अगदी हौसेने बंधनात बांधून घेण्याची. त्या मानसिकतेने स्त्रीला आदर्शवादाच्या पिंजऱ्यात नेवून बसवलं. मग स्त्रीला त्या पिंजऱ्याचा देखील मोह झाला. तिला ते अडकणं कधीच वाटलं नाही. उलट त्यात ती स्वत:लाच हरवून बसली. पिंजऱ्यातील आयुष्य जर तिनं स्वत:हून स्वत:साठी निवडलंय, तर त्यावर इतकी भावनिक व्याख्याने कशाला हवीत? मात्र हो नक्कीच, स्त्रियांनी भूमिका, जबाबदाऱ्या, कर्तव्य, हक्क ह्या व्यतिरीक्त आपल्या ‘व्यक्ती स्वातंत्र्याचा’ देखील आवर्जून विचार केला पाहिजे.
स्त्रियांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा, त्यांच्यासाठी एक नवं आव्हान घेवून आलेला असतो. ज्यात त्यांचं विवाहोत्तर जीवन तर नावापासून ते त्यांच्या आयुष्यातील माणसांपर्यंतच्या बदलाची नांदी घेवून येतं. ज्याठिकाणी त्या अंकुरीत होवून नाजूक रोप बनतात; तेथून उपटून एका अपरिचित ठिकाणी त्यांचं पुन्हा रोपण केलं जातं. त्या अनोळखी जागी त्यांनी सर्वतोपरी फलद्रूप व्हावं, अशी अपेक्षाही बाळगली जाते. समाजाची ही कठोर रीत खरेतर स्त्रियांच्या मनावर झालेला पहिला मोठा आघात असतो. त्या आघाताला सोसून, समजून व पचवून एका स्त्रीमध्ये बाईपणाची जाणीव निर्माण होते. तसेच कालांतराने एक स्त्री त्या नव्या विश्वाला मनापासून आपलंसं सुद्धा करते. स्त्रियांचा हा प्रवास मात्र भावनिक गुंतागुंतीचा असतो. कारण आपल्या अनेक भूमिकांना न्याय देत त्यांना जगायचं असतं. मग स्त्री नोकरीपेशा असली तरी तिची ह्या सर्वातून सुटका नसते. उलट तिच्यावर तर दुप्पट जबाबदाऱ्या असतात. मात्र स्त्रियांमधील मातृत्वाचे गुणधर्म त्यांना अनोखे आंतरिक सामर्थ्य बहाल करत असतात. म्हणूनच म्हणतात _ एक स्त्री भलेही हार मानेल, तिच्यातील ‘आई’ मात्र कधीही हार मानत नाही. स्त्रीची महतीही तिच्यातील आईपणामुळेच आजवर गाईली गेलेली आहे.
कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्या सर्वांच्या गराड्यात स्त्रिया स्वत:कडे कधी मनापासून लक्षच देत नाहीत. घरात हसरा चेहरा ठेवून वावरणं, कोणी नावे ठेवू नये म्हणून वरवर नीटनेटकं राहणं _ ह्या गोष्टीही त्या बळे बळे पण अगदी सराईतपने करू लागतात. त्यांच्या मनाच्या खोलीत मात्र निराशेने जळ पकडलेले असते. असुरक्षा, तुलना, भीती, अतिविचार ह्या सर्वांमुळे अक्षरशा आंतरिक हलचल झालेली असते. शरीर वेळोवेळी काही म्हणत असतं, तरीही त्याकडे त्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात. खरेतर त्यांच्या त्या अस्वस्थ काळात आपल्या माणसांनी प्रेमानं सांभाळावं, समजून घ्यावं _ अशी त्यांची माफक अपेक्षा असते. अशाप्रकारे समर्पकतेने आयुष्य जगलेली ‘ती’ आता एका परिपक्व वृक्षाप्रमाणे झालेली असते. आजीवन सर्वांनी वाटेल तेव्हा तिला हलविलेले असते. कधी फुलांचा वर्षाव करवून घेण्यासाठी, तर कधी फळं पाडून घेण्यासाठी. तिने कधीही एक माणूस म्हणून स्वत:साठी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केलेला नसतो. स्वत:चं व्यक्तीगत क्षेत्र जपलेलं नसतं. आयुष्यभर फक्त इतरांचा विचार करणं, इतरांच्या पसंतीला प्रादान्य देणं, इतरांना प्रोत्साहन देणं, इतरांना ऐकूण घेणं, इतरांचे सोहळे स्वत:चे समजून साजरे करणं, आयुष्याचा फक्त एवढाच अर्थ कळालेली ‘ती’ _ आतामात्र काहीशी हरवील्या सारखी वाटू लागते. कारण तिचं शरीर देखील तिला निवृत्तीची जाणीव करून देवू लागलेलं असतं. निसर्गानं बाईला बहाल केलेला ‘मासिकधर्म’ हा साज आता उतरवून ठेवण्याची वेळ आलेली असते. वार्धक्य पुढ्यात असतं _ अन एक उदासीन रिकामं झालेलं मनाचं घरटं असतं.
आयुष्यानं आता प्रौढत्वाकडे वळण घेतलेलं असतं. ते सुद्धा तारुण्यात आलेली मुलं आणि घरातील वडीलधारी मंडळी ह्यांच्यात वाटलेलं असतं. त्यामुळे ते केवळ नावापुरतं निवृत्त होणं वाटतं. कारण जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची ओझी अजूनही तितकीच अवजड असतात. तरीही तरुण मुलांना डोळ्यासमोर बघून तिला दिलासा मिळतो. त्यांची आयुष्य घडविण्याची धडपड पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. फक्त मुलांमुळेच आता घराचं घरपण टिकून असतं. घरात थोडीफार चहलपहल असते. कारण मुलं मोठी जरी असली, तरी ती आई भोवतीच रेंगाळत असतात. अजूनही जेवण झाल्यावर आईच्या पदराला हात पुसतात. आईलाही ते खूप आवडत असतं. मुलांच्या आवडीनिवडी जपणं, हे तर आईचं आवडीचं काम असतं. खरेतर मुलांमुळेच ‘ती’ किमान अजून उरलेली असते. मात्र आता घरटं रिकामं होण्याची वेळ येवून ठेपते. मुलं नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. आयुष्याच्या पथावर पुढे सरसावू लागतात. नवी नाती बनवितात. ओघाओघाने आई पासून लांब होत जातात. बाहेर पडून त्यांना एक नवं आकाश मिळतं. इकडं आईचं आकाश मात्र त्यांच्या विना सुनं होतं. हा निसर्गाचा नियम असला तरी फारच वेदनादायी असतो. पिल्लं लहानाची मोठी होतात. घरटं सोडून स्वतंत्र भराऱ्या घेवू लागतात. आईसाठी ह्याहून मोठा आनंद नसतो. मात्र त्याच क्षणी त्यांचं आपल्यापासून लांब जाणं, हे दु:ख ती कशी पचवू शकेल? तिचं जगच अक्षरशा ओकंबोकं होवून जातं.
आयुष्यातली ही ‘पानगळ’ एका स्त्रीसाठी अतिशय जीवघेणी ठरते. तिला मानसिकरीत्या कोलमडून टाकणारी असते. ह्या काळात बहुतेक स्त्रिया खिन्नतेच्या शिकार होतात. कारण त्यांना प्रेमानं जपणारं, विचारपूस करणारं, हक्क गाजविणारं कोणीही त्यांच्या आसपास नसतं. प्रौढ स्त्रियांच्या आयुष्यात ही निर्माण झालेली पोकळी त्यांचा अक्षरशा घास घेते. मात्र स्त्रियांनी ठरविलं तर त्या, ह्या दु:खावर मात करून पुढील आयुष्य ‘व्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ’ समजून घेवून समाधानानं जगू शकतात. प्रत्येक स्त्रीनं ते करावं असच मला वाटतं. कारण कोणीही आयुष्यभर कोणास पुरत नाही. तेव्हा आपलीच सोबत आपल्याला जगण्यासाठी पुरेशी कशी ठरेल, हे समजणे खूप महत्वाचे आहे. तेव्हाच स्त्री ही बंदिनी नाहीतर ‘स्त्री एक माणूस’, स्त्री जन्मा तुझी कहाणी नाहीतर ‘स्त्री जन्म एक वरदान’ असे सकारात्मक विचार स्त्रीचं अवघं आयुष्य उत्साही घडवतील. तिला खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्याचं समाधान देतील.
- बदल स्वीकारता आले पाहिजे
स्त्रियांनी ‘बंदिनी’ हे आयुष्य मनापासून स्वीकारलेलं असतं. मग त्यांच्या शरीराचा तो मासिकधर्म असो, त्यांच्यावर विसंबून असलेलं घर असो, किंवा त्यांच्या मागे पुढे करणारी त्यांची मुलं असोत. ह्या सर्वांमुळे त्यांना स्वत:मध्ये अनामिक सामर्थ्य जाणवत असतं. आपल्या माणसांच्या आयुष्यात आपण महत्वाचे आहोत, ही गोष्ट त्यांना सर्वाधिक सुखावणारी असते. एका स्त्रीची ही भावनिक ओढ घरांना, नात्यांना एकसंध नक्कीच ठेवत असते. मात्र तिला व्यक्ती स्वातंत्र्याच्या अर्थापासून लांब नेत असेल तर भविष्यात तिचं आयुष्य अवघड करण्यास कारणीभूत देखील ठरू शकते. कारण तिच्यासाठी आयुष्यात येणारे बदल स्वीकारणं _ त्यामुळे कठीण होवून बसतं. ह्या व्यतीरीक्तही आपलं आयुष्य उरलेलं आहे, ह्याची जाणीव स्त्रियांना स्वत:हून असली पाहिजे. जी बंधनं आजवर त्यांना मनासारखं जगण्यापासून थांबवत होती _ ती आता कालांतराने नाहीशी झालेली आहेत. तेव्हा आता ‘मी बंधनमुक्त आयुष्याचा आनंद घेण्यास तयार आहे’ _ असे प्रत्येक प्रौढ स्त्रीला स्वत:स सांगता आले पाहिजे.
2 .व्यक्तीगत क्षेत्र सन्मानानं जपता आलं पाहिजे
स्त्रियांनी आयुष्यात अनेकदा स्वत:चे अपमान सहज पचवीलेले असतात. कारण आपल्या माणसांनी केलेल्या टाकाऊ वर्तनाला त्या मुळात अपमान मानतच नाहीत. उलट त्यांना तो हक्कच वाटत असतो. त्यासाठी त्या स्वत:हून तत्पर असतात. स्त्रियांची ही सोशिक वृत्ती मात्र त्यांचं व्यक्तीगत क्षेत्र धोक्यात आणते. मात्र प्रत्येक प्रौढ स्त्रीने आपलं व्यक्तीगत क्षेत्र सन्मानानं जपण्याचा निर्धार केला पाहिजे. मग ती आयुष्यभर एक गृहिणी म्हणून जगली का असेना _ आता मात्र कोणीही कशीही दिलेली वागणूक तिने सहन करू नये. ती आयुष्यभर आर्थिकरीत्या विसंबून का असेना _ पण घरात आयुष्यभर दिलेलं प्रामाणिक योगदान तिनं कधी विसरू नये. आजवर तिला स्वत:साठी वेळ काढता आला का नसेना _ पण आता मात्र स्वत:साठी आवाज उठवता आला पाहिजे. आजवर तिने भूमिकांना महत्व दिलं का असेना _ पण आता मात्र माणूस म्हणून स्वत:कडे पाहता आलं पाहिजे.
3. एखादं कौशल्य स्वबळावर मोठं करता आलं पाहिजे
स्त्रियांची आपल्या मुलाबाळांप्रती असलेली भावनिक ओढ _ ही त्यांना त्यांचं घरटं रिकामं होत असतांना, आतून अक्षरशा खचवून टाकत असते. ही तर जगाची रीतच आहे कि _ काल आपण आपल्या घरट्यापासून लांब आलो होतो, तर आज आपली मुलं घरट्यापासून लांब जात आहेत. तरीही त्यामुळे उठणारी ताटातूटीची वेदना तितकीच जीवघेणी असते. खरेतर मनातली ही हुरहूर केव्हा पासून आपण टाळत आलेलो असतो. तेव्हापासूनच आपण दूरदृष्टीनं सुरवातीला फक्त विरंगुळा म्हणून _ आपलं एखादं कौशल्य हाताळण्यास घेतलं, तर मुलांचं आपल्यापासून दुरावण्याचा काळ सांभाळू शकतो. नंतर त्या कौशल्याला मोठं करणं, हे आपल्या उर्वरीत आयुष्याचं एक ध्येय देखील बनू शकतं. एकमेकांवरची भावनिक निर्भरता ही लांब जावूनही आपल्याला जखडून ठेवत असते. मात्र आपण आपल्या भावना एखादं कौशल्य मोठं करण्यावर लावल्या, तर व्यक्ती स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगता येतो. आयुष्याला सुंदर वळण देता येवू शकतं.
4. जगता आलं पाहिजे
स्वत:शी दुरावलेलं आपलं नातं पुन्हा दृढ करता आलं पाहिजे. तरच आपण इतरांना आपल्यापासून दूर जाण्याची परवानगी देवू शकतो. इतक्या वर्षांच्या सहवासात आपण सगळेच परस्परांवर विसंबून जगत असतो. मग अचानक हे माणसांचं आयुष्यातून लांब जाणं सोपं नसतंच मुळी. तरीही कोणासाठी जगणंच सोडणं, हा तर स्वत:वर केलेला खूप मोठा अन्याय आहे. चला तर मग एकट्याने जगण्यासाठी काही उत्पादनक्षम योजना आखूयात. ज्याही गोष्टी करण्यात रस असेल, त्यांची यादी तयार करा. टप्प्या टप्प्याने योजना अंमलात आणण्यास सुरवात करा. जसजसे त्यात मानसिकरीत्या व्यस्त व्हाल, तसतसा जगण्याचा आनंद द्विगुणीत होईल. जीवन क्षणिक आहे. तेव्हा कोणत्याही कारणाने हा जीवनानुभव वाया जावू देणे योग्य नाही. आपल्या भावनांची मक्तेदारी स्वत:वर घेणे, हेच खरे स्वावलंबन आहे. आपल्या माणसांवर, त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहूनही निर्विकार प्रेम करता येवू शकतं. हीच जगण्याची रीत असली पाहिजे.
आजवर घरटं इमानेइतबारे सांभाळलं. त्यास मउ आणि उबदार ठेवण्यात आयुष्य घालवलं. मात्र आता ह्या घरट्याचा मोह सोडून स्वत:कडे वळलं पाहिजे. कारण माझं माझं करत आपण बाहेर इतका पसारा घातला कि _ त्याचा आपल्यालाच मोह आवरेनासा झाला. त्यातूनच ह्या वेदनांचा उगम झाला, पण जगण्याचा अर्थ काही कळला नाही. आज जर आयुष्यानं बंधनमुक्त होवून जगण्याची एक संधी दिली आहे _ तर स्वत:ला शोधा. आयुष्याच्या संध्याकाळीही स्वत:मध्ये काही नवं सापडेल. त्याला ध्येय बनवायचे कि नाही _ हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण त्यातून जगण्यासाठी भक्कम आधार नक्कीच मिळेल.
Categories
- आत्मप्रेम (19)
- जनरल (42)
- मानसिक स्वाथ्य (28)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (28)
- स्पेशल पोस्ट (15)
- होममेकर (9)